उसाच्या अंतिम दराकडे शेतकर्‍यांचे डोळे

0

हंगामाच्या समारोपाला ऊस दरावरून गदारोळाची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी) – साखर कारखान्यांचा गाळप हंगाम एप्रिल-मे मध्ये संपला. आता गेल्या आर्थिक वर्षाचे हिशोबपत्रके तयार करून वार्षिक सभा घेण्याची तयारी सुरू आहे. सहकारी कायद्यानुसार दरवर्षी सप्टेंबर संपण्यापूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे सहकारी कराखान्यांवर बंधनकारक आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांना सरुवात झाली असून यात उसाचा भाव हाच प्रमुख मुद्दा चर्चेत आहे. यामुळे कोणता कारखाना आता किती अंतिम दर देणार याकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या नजरा आहेत. एरवी हंगामाच्या सुरुवातीला ऊस दरावर होणारा गदारोळ हंगामाच्या समारोपाला होण्याची शक्यता गेल्या हंगामात जिल्ह्यात दमदार पावसामुळे उसाच्या उत्पादनात मोठी वाढ होऊन सर्वच कारखान्यांच्या क्षेत्रात उसाचे सरासरीपेक्षा जादा उत्पादन झाले.

यात मुळा, ज्ञानेश्‍वर, अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त उसाचे उत्पादन झाले. मात्र, अतिरिक्त ऊस उत्पादनाचा काही कारखान्यांकडून फायदा घेण्यात आला. त्यांनी शेतकर्‍यांच्या उसाला कमी भाव देत आपले उखळ पांढरे करून घेतले. जिल्ह्यात अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस उपलब्ध झाल्याने त्यांचा गळीत हंगाम लांबताना दिसला. यात मुळा, ज्ञानेश्‍वर, अशोक हे कारखाने गाळप हंगाम संपेपर्यंत सुरू होते. विशेषत: नेवासा तालुका हा इतर कारखान्यांच्यादृष्टीने स्वस्तात ऊस खरेदीचे प्रमुख केंद्र बनल्याचे दिसले.

हंगामाच्या सरुवातीला बाजारात साखरेचे दर चांगले होते. ते विचारात घेऊन सर्व कारखान्यांनी उसाचा भाव जाहीर केला. पण उसाच्या एकरी उत्पादनात वाढ झाल्याने व साखरेचे भाव कोसळल्याने काहीचे गणित चुकू लागताच सरुवतीला जाहीर केलेल्या दरात कपात करण्याची वेळ त्यांच्यावर आली. अतिरिक्त ऊस झालेल्या नेवासा तालुक्यात ज्ञानेश्‍वर कारखान्याने सुरुवातीला जाहीर केलेला दोन हजार 500 रुपयांचा दर दोन हजार 300 रुपये व त्यानंतर दोन हजार 100 पर्यंत खाली आणला. मुळा कारखान्याने सुरुवातीला जाहीर केलेला दोन हजार 300 रुपये दर शेवटपर्यत कायम ठेवला. संगमनेर, अशोक, वृध्देश्‍वर कारखान्यांनीही त्यांचे सुरुवातीचे दर कायम ठेवले होते. ज्यांनी दरात कपाती केल्या ते कारखाने त्यांचे अंतिम दर कसे फायनल करतात हे मात्र, समोर आलेले नाही. मात्र, लवकरच हिशोबपत्रके अंतिम करून वार्षिक आढावा घ्यावयाच्या असल्याने हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचेही डोळे आता अंतिम भावाकडे लागले आहेत.

केंद्र सरकारनेही साखरेचे दर निश्‍चित केले आहेत. ऊस पुरवलेल्या शेतकर्‍यांचे डोळे आता कारखान्यांच्या वार्षिक सभांकडे लागले आहेत. अपवाद वगळता बहुतेकांकडे बायप्रॉडक्टचे कारखाने आहेत. ज्या कारखांन्यानी ऊस दरात नंतर कपात केली. त्यांचा देखील अंतिम ऊसदर किती जाहीर होणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. ऊसदराचा गदारोळ हंगामाच्या सरुवातीला होत असतो. मात्र, आता हंगाम संपल्यावरही तो होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकर्‍यांचा ऊस इतर खाजगी व सहकारी कारखान्यांनी नेला त्यापैकी काही कारखान्यांनी अद्यापही पूर्ण पेमेंट केलेले नाही. तर काहींनी कबूल केल्यापेक्षा कमी दराने पेमेंट केल्याचे समजते. हे पेमेंट कधी मिळते यांच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

मुळा व ज्ञानेश्‍वर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातून जवळपास दोन ते अडीच लाख टन ऊस बाहेर गेला आहे. युटेक, गंगामाई, प्रसाद, नगर तालुका (पीयूष), अगस्ती, संगमनेर, राहुरी, कन्नड, रामेश्‍वर या कारखान्यांनी हा ऊस नेला.

या हंगामात कमी दराने ऊस देण्याची नामुष्की ओढवलेल्या शेतकर्‍यांचे टनामागे 300 ते 500 रुपयांपर्यंत नुकसाने झाले. वास्तविक ऊस दराच्या बाबतीत सभासद व बिगर सभासद असा फरक करता येत नाही. दोघांनाही सारखाच ऊस दर द्यावा लागतो. तसे बंधन कारखान्यांवर होते. मात्र ते पाळले जात असल्याचे दिसत नाही. काही सहकारी साखर कारखान्यांनी तर खाजगी कारखान्यांनाही याबाबतीत मागे टाकल्याचे दिसते. स्वत:च्या क्षेत्रात गाळपासाठी पुरेसा ऊस असतानाही स्वस्तात मिळतो म्हणून दुसर्‍या ठिकाणाहून ऊस खरेदी केला. शेतकर्‍यांशी बांधिलकी वगैरे जपण्यापेक्षा त्यांनी व्यावसायिक बाजूलाच पसंती दिल्याचे दिसले.

नेवासा तालुक्यातील अतिरिक्त ऊस खरेदीसाठी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील जवळपास 15 कारखान्यांची यंत्रणा सरसावली होती. मात्र, यात चित्र वेगळेच होते. एरवी कारखान्याचे अधिकारी शेतकर्‍यांच्या दारात चकरा मारण्यात दंग असतात. मात्र यंदा शेतकरीच अधिकार्‍यांच्या मागे फिरताना दिसले. पूर्वी शेतकरी त्यांच्या उसाचा दर सांगायचा. यावेळी मात्र, अधिकारी सांगतील तोच दर मान्य होत होता.

LEAVE A REPLY

*