Type to search

Featured आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या सार्वमत

ऊस उत्पादकांना अनुदान, 75 नवे मेडिकल कॉलेज

Share

60 लाख टन साखर निर्यात होणार 15 हजार 700 डॉक्टरांची भरती

नवी दिल्ली- केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 60 लाख मेट्रिक टन निर्यातीवर सबसिडी देण्याचा आणि साखर निर्यातीचं अनुदान थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच देशात 75 नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा आणि 15 हजार 700 डॉक्टरांची मेगा भरती करण्याचा निर्णयही आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

2019-20 या साखर हंगामासाठी, साखर कारखान्यांना, प्रती मेट्रिक टन 10,448 रुपये एक रकमी निर्यात अनुदान म्हणून द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मान्यता दिली आहे. यासाठी 6268 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 60 लाख मेट्रिक टनापर्यंतच्या निर्यातीसाठी विपणन खर्च, इतर प्रक्रिया खर्च, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक खर्च यासाठी हे निर्यात अनुदान पुरवले जाईल.

विशेष म्हणजे शेतकर्‍याला देय असलेल्या ऊसाच्या रक्कमेपोटी साखर कारखान्याच्यावतीने शेतकर्‍याच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाईल. यातून काही शिल्लक राहात असल्यास, ती रक्कम, कारखान्याच्या खात्यात जमा होईल.  2019-20 या साखर हंगामात, 142 एलएमटी साखरेच्या साठ्याने, सुरवात होईल अशी अपेक्षा आहे, तर अंतिम साठा 162 एलएमटी राहील अशी अपेक्षा आहे.

162 एलएमटी या अतिरिक्त साठ्याचा, हंगामात साखरेच्या किंमतीवर प्रतिकूल दबाव, येऊन त्याचा साखर कारखान्याच्या रोकड सुलभतेवर परिणाम होऊन शेतकर्‍यांची ऊसाची रक्कम देण्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, सरकारने, 1 ऑगस्ट 2019 पासून एक वर्षासाठी, 40 एलएमटी साखरेचा साठा निर्माण केला आहे.

बाजारात 20 रूपयांची तेजी
केंद्र सरकारने 60 लाख टन साखर निर्यातीचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजारात 15-20 रूपयांची तेजी पहायला मिळाली. पुढील महिन्यात कसा कोटा ठरविला जातो यावर साखरेचे भाव अवलंबून राहणार आहेत. पुढे साखरेला मागणीचे दिवस आहेत. त्यात साखर निर्यात होणार असल्याने साखरेच्या भावात मंदी राहणार नाही. शिवाय अनुदानापोटी शेतकर्‍यांनाही पैसे मिळतील.
-पियूष कर्नावट, साखर व्यापारी,श्रीरामपूर

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!