Type to search

कमी दरात साखर विक्री करणार्‍या कारखान्यांवर सरकार कारवाई करणार

Featured सार्वमत

कमी दरात साखर विक्री करणार्‍या कारखान्यांवर सरकार कारवाई करणार

Share
भेंडा (वार्ताहर) – केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव 2900 रुपये दिलेला असतानाही काही साखर कारखाने यापेक्षा कमी दराने साखर विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर जो कारखाना कमी दराने साखर विक्री करेल त्याची चौकशी करून कारखान्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय अन्न व पुरवठा नागरी राज्यमंत्री रामविलास पासवान यांनी दिले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री पासवान यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील काही साखर कारखाने केंद्राने ठरवून दिलेल्या भावापेक्षा कमी दराने साखर विकत असल्याची तक्रार खासदार शेट्टी यांनी केली. त्याची दखल घेत पासवान यांनी मंत्रालयाचे सचिव रविकांत यांना कारवाईचे आदेश दिले. साखर उद्योग सध्या अडचणीत आहे.

केंद्र सरकारने किमान 2900 रुपये भाव दिला असला तरी तो साखर कारखान्यांना परवडणारा नाही. तरीही साखर कमी दर्जाची असल्याचे दाखवून त्यापेक्षा कमी दराने कारखाने विक्री करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे साखरेच्या होलसेल दरात आणखी घट होत आहे. ऊस उत्पादकांना देण्यात येणारा एफआरपीचा दर जास्त आहे. त्यामुळे त्या साखर कारखान्यांना कमी दरात साखर विकणे परवडत नाही. परिणामी शेतकर्‍यांची एफआरपीची मोठ्या प्रमाणात थकबाकी राहण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बसत आहे. केंद्राने तातडीने कमी दरात साखर विकणार्‍या साखर कारखान्यांची चौकशी करून कडक कारवाई करावी, तसेच 2900 रुपये हा भाव गेल्या वर्षीची एफआरपी डोळ्यासमोर धरून केला आहे. यंदा वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेता यावर्षी साखरेच्या विक्रीचा दर किमान 3400 रु. प्रति क्विंटल करावा अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

साखरेचे भाव वाढविण्याचा सरकार विचार करत असून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री पासवान यांनी स्पष्ट केले. तसेच जे साखर कारखाने कमी दरामध्ये साखर विकतील, त्यांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्यात यावी, असे आदेशही दिले. खासदार राजू शेट्टी यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव रविकांत यांची भेट घेऊन त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली. सचिव रविकांत यांनीही त्याची गंभीर दखल घेत, कमी दरामध्ये साखर विकल्याचे आढळून येणार्‍या कारखान्यांचा विक्रीचा कोटा त्वरित रद्द करण्यात येईल असे आश्वासन दिले. कमी दरामध्ये साखर विकलेल्या कारखान्यांची माहिती पुराव्यानिशी देत असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार शेट्टी यांनी यावेळी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!