Wednesday, April 24, 2024
Homeनगरन्याय्य मागण्यांसाठी कामगारांचे संघटन महत्त्वाचे – काळे

न्याय्य मागण्यांसाठी कामगारांचे संघटन महत्त्वाचे – काळे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- साखर कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी सर्व कामगारांची एकजूट महत्त्वाची आहे. साखऱ कामगारांचे जोपर्यंत संघटन होत नाही. तोपर्यंत कामगारांचे प्रश्‍न सुटणार नाहीत. यापुढील काळात जिल्हानिहाय साखर कामगारांची ताकद वाढवावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यातील कामगारांनी 15 दिवसांमध्ये समन्वय समिती स्थापन करण्याचे आवाहन राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केले.

येथील गुजराती मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व राज्य साखर कामगार महासंघाच्यावतीने आयोजित साखर कामगार मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. याप्रसंगी साखर महासंघाचे अध्यक्ष पी. के. मुंडे, मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले, महासंघाचे सरचिटणीस सुभाष काकुस्ते, कार्याध्यक्ष राऊ पाटील, सरचिटणीस अंनतराव वायकर, शिवाजी औटी, प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, खजिनदार व्ही.एम. पतंगराव, साखर कामगार सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, रविंद्र तांबे, मच्छिंद्र फोपसे, भरत पेरणे आदींसह जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

काळे पुढे म्हणाले की, साखर कामगार अनेक सुविधांपासून वंचित आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे व कारखाना प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या प्रश्‍न व मागण्यांची सोडवणूक करायची असेल तर त्यांचे संघटन महत्त्वाचे आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कामगार विरोधी लोकप्रतिनिधींना संघटनेने चांगला धडा शिकविला आहे. पुढील काळात कोणत्याही कारखान्याच्या संदर्भात कामगारांचा प्रश्न निर्माण झाल्यास संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी पुढील काळात जिल्हानिहाय साखर कामगरांची समितीची उभारणी करण्यात येणार आहे. समितीच्या माध्यमातून कामगारांच्या विविध प्रश्‍नांसंदर्भात एकजुटीने लढा देण्यात येणार असल्याचे काळे म्हणाले.

शंकरराव भोसले म्हणाले की, सर्वसामान्य साखर कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर अन्याय होत आहे. आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी संघटनात्मक शक्तीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अनेक साखर कामगारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या