कारखान्यांच्या वजनकाट्यांची होणार तपासणी

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – यंदा 1 नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतला. दरम्यान, गाळपादरम्यान कारखाना व्यवस्थापनाकडून वजनकटा मारला जात असल्याच्या तक्रारी शेतकरी संघटनांनी केल्या होत्या.
त्याअनुषंगाने नगरमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील 14 कारखान्यांतील वजनकाटा तपासणीसाठी भरारी पथके तयार करण्यात आले आहेत. या पथकात महसूल विभाग, वैधमापन शास्त्र विभाग, पोलीस, प्रदेशिक सहसंचालक (साखर) यांच्या प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे.
नगरसह राज्यभर गाळप हंगामात साखर कारखाना व्यवस्थापनाकडून शेतकर्‍यांच्या उसाचे वजन करताना काटा मारला जात असल्याची तक्रार शेतकरी संघटनांकडून करण्यात येत होती. या तक्रारीची दखल साखर आयुक्तांनी घेतली असून यंदापासून जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून त्या समितीच्या माध्यमातून भरारी पथकामार्फत हंगामात अचानक कारखान्याचा वजन काट्याची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय तपासणी पथकामध्ये शेतकर्‍यांचे प्रतिनिधीत्व म्हणून प्रत्येक ठिकाणी एका शेतकर्‍यांचा सामावेश असणार आहे.
त्यांची यादी शेतकरी संघटना प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडून प्रसिद्ध केली जाणार आहे. हे पथक संबंधित साखर कारखान्यांवर अचानक तपासणी करणार आहे. वजनकाटा व पावती अशा अनेक बाबींची तपासणी करुन त्यात विसंगती आढळल्यास त्याच ठिकाणी फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. हे अधिकारी आपला दैनिक अहवाल तयार करून तो प्रादेशीक सहसंचालक साखर विभाग नगर यांच्याकडे सादर करणार आहेत. यावर पुणे साखर आयुक्त यांचे नियंत्रण असणार आहेत.
नेवासा तालुक्यातील मुळा व ज्ञानेश्‍वर साखर कारखान्यांचा वजन काटा तपासणीसाठी अजित मुठे व बी.के.बेंद्रे, बी.पी.मुंढे (राहुरी), नेवासा तहसिलदार, पोलीस निरीक्षक प्रविणकुमार लोखंडे यांची नियुक्ती केली आहे.
राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे व प्रसाद शुगर कारखाना वांबोरी येथे आर. एफ. निकम, बी. के. बेंद्रे, बी. पी. मुंढे, राहुरी तहसिलदार व राहुरी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची नेमणुक करण्यात आली आहे.
श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखाना येथे बी. के. बेंद्रे, वैद्यामापन शास्त्र देसले (श्रीरामपूर विभाग), श्रीरामपूर तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व युटेक साखर कारखाना कोठेमलपूर येथे अजित मुठे, आर. एफ. निकम, वैद्यामापन शास्त्र डोलारे (संगमनेर), संगमनेर तहसिलदार, तालुका पोलीस निरीक्षक यांची नेमणुक करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना येथे आर. एफ. निकम, वैद्यामापन शास्त्र डोलारे (संगमनेर), अकोले तहसिलदार, अकोले पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांची नेमणुक करण्यात आली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे, कुकडी व साईकृपा येथील साखर कारखान्यावर आर. एफ. निकम, बी. के. बेंद्रे, वैद्यामापन शास्त्र चित्ते, श्रीगोंदा तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांचे पथक असणार आहे.
पारनेर येथील क्रांती शुगार येथे अजित मुठे, वैद्यामापन शास्त्र कल्याण दराडे, तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोपरगाव येथे काळे व संजीवनी साखर कारखाना येथे अजित मुठे, घुगे, कोपरगाव तहसिलदार व पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांचे पथक असणार आहे.
राहाता येथील डॉ. विखे व गणेश साखर कारखाना येथे आर. व्ही. निकम, देसले, घुगे, राहाता तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांचे पथक असणार आहे. वाळकी येथील पियुष शुगर कारखान्यात बी.के बेंद्रे (तृतीय विशेष लेखा परिक्षक), वैद्यामापन शास्त्राचे चित्ते, नगरचे तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांची नेमणुक करण्यात आली आहे.
पाथर्डी येथील वृद्धेश्‍वर कारखाना येथे अजित मुठे, एम. एम. जोर्वेकर, पाथर्डी तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांचा पथकात सामावेश असणार आहे. शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखाना येथील वजन काट्याची तपासणी करण्यासाठी अजित मुठे, एम. एम. जोरवेकर, शेवगाव तहसिलदार व पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांचा पथकात सामावेश असणार आहे.
कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखाना येथे बी. के. बेंद्रे, वानखेडे, कर्जत तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांना नियुक्त करण्यात आले आहे. जामखेड तालुक्यात जय श्रीराम हाळगाव येथील साखर कारखाना येथे वजनकाट्यांची तपासणी आर. एफ. निकम, वैद्यामापन शास्त्र वानखेडे, स्थानिक तहसिलदार व पोलीस निरीक्षक या पथकात असणार आहे.

शेतकर्‍यांना विश्‍वासात घ्या
गुरुवारी (दि. 16) आम्ही आंदोलन केेले होते. त्यावेळी वजनात काटामारीबाबत पथके नेमण्याची मागणी केली होती. त्यावर प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे त्यांचे आभार. आता पथके नेमली. मात्र शेतकर्‍यांचे प्रतिनिधी नेमताना शेतकर्‍यांना विश्‍वासात घ्यावे. या पथकांच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या मालाची काटामारी थांबेल अशी अपेक्षा आहे. सुकाणू समितीचे हे यश आहे.
– डॉ. अजित नवले (सुकाणू समितीचे अध्यक्ष)

 

 

 

LEAVE A REPLY

*