कारखान्यांमध्ये ऊस दराची होणार स्पर्धा

0

चारा व बेण्यासाठी विक्रीमुळे

तेलकुडगाव (वार्ताहर)- कार्यशेत्रातील उसासह गेटकेन ऊस मिळवून येणारा गळीत हंगाम यशस्वी करून दाखविण्याचा दावा साखर कारखाने करत आहेत. मात्र बेणे व चार्‍यासाठी मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याने आगामी हंगामात जो कारखाना जादा दर देईल त्यांनाच ऊस शेतकरी देणार असून ऊस दराची त्यामुळे स्पर्धा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रत्यक्षात हंगाम सुरू होईपर्यंत कारखाने मांडत असलेल्या गणिताप्रमाणे ऊस मिळण्याची शक्यता कमीच आहे. ऊस बेणे व जनावरांसाठी 2800 ते 3000 रुपये प्रतिटन एवढा दर मिळत असल्याने शेतकरी कारखान्याचा विचारच करायला तयार नाहीत. कारखाने सुरू होईपर्यंत शेतकरी थांबतील का? हा प्रश्‍न आहे.

नेवासा-शेवगाव तालुक्यात चालू अवस्थेत 4 कारखाने असून उसाची जी लागवड झाली आहे ती अजून जमिनीलगतच लोळत आहे. जी लागवड आहे ती देखील बेणे व जनावरांसाठी ऊस विकण्याचा सपाटा शेतकर्‍यांनी लावला आहे.
अजून पावसाने अपेक्षित साथ दिलेली नाही. कुकाणा येथे एका खाजगी वजन काट्यावर जिल्ह्यासह बाहेरून ऊस खरेदी-विक्री होत असल्याने या ठिकाणी दररोज लाखोंची उलाढाल होत आहे.

गळीत हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होईल असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात दिवाळी झाल्याशिवाय उसतोडणी कामगार कारखान्याकडे फिरकत नाही. त्यामुळे गळीत हंगाम नोव्हेंबरमधेच वेग घेईल. मध्यंतरीच्या अडीच-तीन महिन्याच्या कालावधीत बेणे व जनावराच्या चार्‍यासाठी मोठ्या प्रमाणात ऊस जाण्याची शक्यता आहे.

ऊस उत्पादकांचे स्पर्धेकडे लक्ष –
ज्ञानेश्‍वर, मुळा, वृद्धेश्‍वर आणि गंगामाई कारखान्यांना तेलकुडगाव, देडगाव, जेऊर, दहीगाव, शिरसगाव, नेवासा, प्रवरासंगम, पानेगाव तसेच तालुक्याच्या पूर्व भागातून ऊस मिळतो. हे कार्यक्षेत्र ज्ञानेश्‍वर व मुळा या दोन कारखान्याचे असल्याने यासह बाहेरून ऊस आणण्यास कारखान्यांची यंत्रणा, शेतकी अधिकारी अनेक दिवसांपासून बाहेर आहे. कारखान्याचे संचालक मंडळ आत्तापासूनच गावोगावी दौरे करत असून आपला कारखाना टिकवायचा असेल तर बाहेर ऊस देऊ नका, असे आवाहन करत आहेत. कारखाना गेटकेन मिळवण्यासाठी सपर्धा करणार असल्याने यात जादा दर देणार्‍या कारखान्यांना यश मिळणार आहे. येणार्‍या हंगामात होणार्‍या स्पर्धेकडे ऊस उप्तादक शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. 

LEAVE A REPLY

*