‘बाहेरी’ल कारखाने राहुरीत उतरले! : ऊस तोडणी जोमात; ‘तनपुरे’ काय करणार?

0
राहुरी (तालुका प्रतिनिधी) – गेल्या तीन वर्षापासून बंद असलेल्या राहुरीचा डॉ. तनपुरे कारखाना सुरू करून कामगारांच्या चुली पेटण्याबरोबरच तालुक्याची कामधेनु नवसंजीवनी मिळून पुन्हा गतवैभवास येईल या भावनेतून राहुरी तालुका कारखानाचे गाळप सुरू होण्याची वाट पहात असताना आज मात्र तनपुरेचे गाळप सुरू होई पर्यंत राहुरीत ऊस शिल्लक राहील का? असा प्रश्‍न जाणकार शेतकर्‍यातून विचारला जात आहे.
डॉ. तनपुरे कारखान्याचे कर्जाचे पुर्न:गठण होऊन जिल्हा बँकेने पुन्हा कारखान्यास कर्जपुरवठा करण्याचे मान्य केले. आज कारखाना जवळपास 250 ते 300 कोटी रूपये कर्जात आहे. कारखान्याचे बॉयलर अग्नीप्रदिपन पार पडले. त्याचवेळी कारखान्याचे सर्वेसर्वा डॉ. सुजय विखे यांनी एकवेळ प्रवरेला ऊस देऊ नका. परंतू राहुरीचा ऊस गाळपास द्यावा, असे आवाहन करतानाच मी माझा शब्द पुरा केला, आता जबाबदारी येथील ऊस उत्पादकांची, असे सांगून कारखान्याची उर्वरीत जबाबदारी ऊस उत्पादकांवर टाकली आहे.
डॉ. तनपुरे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण जवळपास 10 लाख टन ऊस उभा असल्याचे सांगीतले जाते. कारखाना कार्यक्षेत्रात आज मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील कारखान्यांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. त्याच बरोबरीने काही प्रगत कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्रानेही जोमात जोमात ऊस तोडणी सुरू केल्याने आज तालुक्यात जिकडे तिकडे ऊसाने भरलेले ट्रॅक्टर, ट्रक आदी वाहनातून ऊस वाहतूक दिसत आहे. कारखाना कार्यक्षेत्रात प्रवरेता विखे कारखाना, शंकरराव काळे कारखाना, संजीवनी कारखाना, संगमनेर, दौंड शुगर, युटेक शुगर, मुळा, ज्ञानेश्‍वर, अशोक, कुकडी, अगस्ती, पारनेर, नगर आदी कारखाने राहुरी तालुक्यातील ऊस तोडणीच्या कामाला जोमाने लागले आहेत.
प्रवरेला ऊस देणारा शेतकरी वर्ग ठरलेला असून प्रवरा कारखाना हक्काचा दोन लाख टन ऊस नेणारच, असे डॉ. सुजय विखे यांनी या पुर्वीच स्पष्ट केले आहे. या शिवाय तालुक्यातच असणारा प्रसाद शुगर कारखाना सुरू होऊन जवळपास 30 हजार टनांपर्यंत गाळप झाल्याचे समजते. प्रसाद शुगरचे 4 लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट असून त्या दृष्टीने तोडणी मजूर व ऊसाचे करार असल्याची माहीती व्यवस्थापनाकडून मिळते.
मग प्रवरेचा दोन लाख टन, प्रसादचा 4 लाख टन, व उर्वरीत कारखान्यांनी नेल्याल्या ऊसाचा हिशोब केल्यास राहुरी कारखान्याच्या वाट्याला ऊस राहणार का? असा प्रश्‍न जाणकार शेतकर्‍यांना पडलेला दिसत आहे. इतर कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कमी टोळ्या ठेऊन तनपुरेच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात यंत्रणा कामाला लावलेली असताना मात्र तनपुरे कारखाना सुरू झाला तरी चालेल का?
गाळप अपेक्षीत होणार का? कारखान्याची सत्ता भोगलेले तरी कारखान्यास ऊस देतील का? असा सवाल आहे. आज ऊस उत्पादक कामधेनू, आपला कारखाना, या विचारामधुन दुर गेलेले असताना स्वत:चे अर्थकारण पहात आहेत. जो कारखाना चांगला भाव देईल त्यास ऊस देऊ, अशी प्रतिक्रिया बर्‍याच ऊस उत्पादकांकडून व्यक्त होते.

 

LEAVE A REPLY

*