डॉ. तनपुरे कारखान्याच्या संचालकांचा अडीच एकर ऊस शॉर्टसर्कीटमुळे खाक

0
विजेच्या तारा उसाच्या पिकालगत लोंबकळल्याने दत्तात्रय ढूस यांचा उसाच्या पिकासह ठिबक संचही जळून खाक झाले.
देवळाली प्रवरा (वार्ताहर)- डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय आसाराम ढूस यांच्या देवळाली प्रवरा शिवारातील गवळ्याचे माळ येथील शेतातील गळीतास असलेला अडीच एकर आडसाली ऊस 132 के.व्ही टॉवर लाईनच्या तारांच्या शॉटसर्किटमुळे आग लागून ठिबक संचासह जळून खाक झाला. या दुर्घटनेत सुमारे साडे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. या प्रकाराने महापरेषण चा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून ढूस यांनी संबंधित विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

संचालक दत्तात्रय ढूस यांची नगर-मनमाड रोडलगत शेती आहे. या ठिकाणी अडीच एकर गळीतास असलेला उभा ऊस आहे. या उसावरून महापरेषणची 132 केव्हीची टॉवर लाईन जात आहे. या लाईनच्या तारा खूपच खाली म्हणजे जमिनीपासून सुमारे 15 ते 20 फूट खाली आल्या असल्याने या ठिकाणी पूर्वीही अपघात झाला आहे. याबाबत महापरेषणला वेळोवेळी तक्रार अर्ज देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने काल मंगळवार दि.11 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास उसाच्या वाढ्याला वार्‍यामुळे तारा खेटल्याने शॉटसर्किट होऊन आगीचा लोळ उसात पडला. दुपारी असणारे रणरणते उन व वारा यामुळे उसाने क्षणात पेट घेतला. यावेळी स्वत: दत्तात्रय ढूस व शेतमजूर शेतावर काम करत होते . त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाना व देवळाली प्रवरा नगरपरिषदेला आगीचा बंब पाठविण्याची मागणी केली. दोन्ही आगीचे बंब येईपर्यंत अडीच एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला होता. मात्र, इतर ऊस वाचविण्यात यश आले.

ही टॉवर लाईन सुमारे पन्नास वर्ष जुनी झाली असून सध्या कडक उन्हाळा असल्याने व विजेचा दाब असल्याने दुपारच्यावेळी या लाईनच्या तारा वितळतात व खाली येतात. आधीच खाली आलेल्या या तारा आणखी खाली येतात. या तारांची उंची जमिनीपासून साधारणपणे पंधरा ते वीस फूट असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. यातूनच हा प्रकार घडला आहे. याबाबत शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

याबाबत भाजपाचे किसान मोर्चाचे प्रांतसदस्य आसाराम ढूस यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे जाऊन त्यांच्या दालनात भेट घेऊन त्यांना या टॉवर लाईनबाबत लेखी निवेदनही दिले होते. यावेळी त्यांच्या स्वीय सहायकाने बाभळेश्‍वर ता. राहाता येथील अधिकार्‍यांना तातडीने या तारा ओढून वर घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर अधिकार्‍यांचे एक पथक येऊन पाहणी करून गेले. मात्र, त्यानंतर काहीच कारवाई न झाल्याने हा प्रसंग ओढवला आहे. हा परिसर सर्व बागायती असून या ठिकाणी कायम शेतकरी व शेतमजूर शेतीची कामे करत असतात. वेळीच तारा वर ओढून न घेतल्यास गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे. यापूर्वीही उसाने भरलेला ट्रक या तारा खालून जात असताना विजेचा शॉक लागून पेटल्याची घटना घडली आहे. परंतु त्यावेळीही नागरीकांच्या मदतीने हा ट्रक विझविण्यात आला होता. तरीदेखील त्याचे टायर जळाले होते. या प्रकारातूनही संबंधित अधिकार्‍यांना शहाणपण सूचले नाही हे विशेष!

LEAVE A REPLY

*