उसाचे मळे ‘मावा-पाकोळी’च्या विळख्यात

0
राहुरी (तालुका प्रतिनिधी) – उसावरील मावा व पाकोळी रोगाने राहुरी तालुक्यात थैमान घातले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे कमी पाऊस असतानाही जपलेले उसाचे पीक करपलेले पाहून ऊस उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. तरीही कृषी विभाग, कृषी विद्यापीठ याबाबत व्यवस्थित मार्गदर्शनही करीत नाही. सल्ला देत नसल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
राहुरी तालुक्यात यावर्षी जवळपास 9 लाख टन उसाचे उत्पादन अपेक्षित होते. मागील दोन-तीन वर्षांच्या दुष्काळामुळे अगोदरच अनेक शेतकर्‍यांनी मोठा खर्च करून ठिबक संच बसवून त्यावर उसाची लागवड केली आहे. मे महिन्यापर्यंत काटकसरीच्या पाण्यात ऊस जगविताना जूनमध्ये आलेल्या पावसाने मोठी आशा निर्माण झाली.
उसाची पिकेही दुष्काळात जमिनीला विश्रांती मिळाल्याने जोमदार होती. परंतु त्यानंतर पावसाने जवळपास अडीच महिन्यांपासून दडी मारल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यातच श्रावण महिन्यात पिकांना कालव्याचे पाणी देऊन पिके जगविण्यात येत आहेत. कालव्याच्या पाण्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, उसावरील पांढरा मावा व पाकोळी रोगाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतातील हिरवागार असलेल्या उसाची पाने वरपासून लाल होण्यास सुरूवात झाली आहे. त्यानंतर पूर्णपणे वाळून खाली गळून पडत आहेत. मोठ्या दाट वाढलेल्या उसात तर फवारणी कशी करावी? अशीही अडचण शेतकर्‍यांपुढे आहेच!
पूर्वी कारखान्यामार्फत या रोगांसाठी हवाई फवारणी होत असे. त्यानंतर शेतकर्‍यांच्या उसाच्या पेमेंटमधून फवारणीचे पैसे कपात केले जात असे. मात्र, आता तीही सुविधा नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. कृषी अधिकारी, कृषी व्यावसायिक आदींना याबाबत शेतकरी मार्गदर्शन मागत आहेत.
या रोगामध्ये उसाच्या पानाच्या मागील बाजूस पांढरे व काळे माव्यासारखे ठिपके दिसत असून त्या ठिकाणचा रस शोषून पूर्ण पाने पिवळी पडत आहेत. पूर्वी केवडा रोग असल्याप्रमाणे उसाचा रंग होतो. या रोगाबाबत जैवकीड नियंत्रण करता येईल का? यावरही शेतकरी चाचपणी करीत आहेत.
तरी या रोगाबाबत शेतकर्‍यांना कृषी विभाग व कृषी विद्यापीठाने मार्गदर्शन करावे, तसेच सामूहिकरित्या यासाठी काही नियंत्रण करता येईल का? याबाबतही मार्गदर्शन करण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*