शेवगाव हत्याकांड : संशयित अमोल पिंपळेचा पोलीस कोठडीत गळफास

0

तपास सीआयडीकडे 

नेवासा (का. प्रतिनिधी) – शेवगाव येथील हत्याकांडातील तसेच घरफोड्यांचे अनेक गुन्हे दाखल असलेला अमोल ईश्‍वर पिंपळे याने मंगळवारी रात्री नेवासा येथे पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
अमोल संतोष ऊर्फ ईश्‍वर पिंपळे (वय 21) रा. गिडेगाव ता. नेवासा हा घरफोडीच्या गुन्ह्यासंदर्भात नेवासा पोलिसांच्या ताब्यात होता. 24 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनवलेली होती.

मंगळवारी रात्री त्याने टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतला. दरम्यान बुधवारी दुपारी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी औरंगाबादला पाठविण्यात आला. त्याच्यावर नेवासा, शेवगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव व पिंपळगाव येथे चोरी, घरफोड्या व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. या अंतर्गत त्याला 5 वेळा अटक झालेली आहे. तर नेवासा पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. व या सर्व गुन्ह्यात तो फरार होता अशी पोलिसांनी माहिती दिली.

नेवासा पोलिसांनी अमोलच्या गळफास प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. फिर्यादीत म्हटले की, अमोल संतोष ऊर्फ ईश्‍वर पिंपळे नेवासा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर फर्स्ट 273/2017 भारतीय दंड विधान कलम 457, 380 या गुन्ह्यात अटकेत पोलीस कोठडीत होता. नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारातील पोलीस लॉकअप क्र. 3 मध्ये त्याला ठेवले होते. तिथे पहाटे साडेपाच वाजेपूर्वी बाथरुम जवळील जाळीला टॉवेलने बांधून त्याने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.

नेवासा पोलीस ठाण्याअंतर्गत 2017 मधील 273 क्रमांकाच्या गुन्ह्यात (कलम 457 व 380) त्याला 18 ऑगस्ट रोजी नेवासा पोलिसांनी अटक केली होती. त्याआधी 5 ऑगस्ट 2016 रोजी आर्म अ‍ॅक्ट 3/25 नुसार 5 जुलै 2016 रोजी त्याला अटक केली होती. शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान 396 अंतर्गत त्याला 23 जुलै 2017 रोजी व त्यानंतर नांदगाव (नाशिक) पोलीस ठाण्याअंतर्गत कलम 39?5 अंतर्गत 27 जुलै 2017 रोजी अटक केली होती.

पिंपळगाव (नाशिक येथील कलम 395 व 397 अंतर्गत त्याला 2 ऑगस्टला अटक करण्यात आली होती.
नेवासा पोलीस ठाण्याअंतर्गत 457 व 380 कलमान्वये दाखल 9 गुन्ह्यांमध्ये तो फरार दाखविलेला असून त्यापैकी 8 गुन्हे 2017 मधील तर एक गुन्हा भारतीय दंड विधान कलम 394 व आर्म अ‍ॅक्ट 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल असून या सर्व प्रकरणांत तो फरार दाखविलेला आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार अमोल याने कारागृहातील बाथरूम जवळ कठड्याच्या वरील बाजूस जाळीला टॉवेल बांधून गळफास घेतल्याचे दिसून आले. याठिकाणी गार्ड अंमलदार असणारे ज्ञानेश्‍वर देवकाते यांनी खबर दिली आहे. त्यांचेबरोबर पोलीस कॉन्स्टेबल ए. व्ही. खिळे आणि एस. पी. नागरगोजे तसेच सोनईचे पोलीस कॉन्स्टेबल बी. एन. तागड हे होते.

 

अधिकार्‍यांच्या भेटी;
तपास सीआयडीकडे!     ,    
नेवासा (तालुका प्रतिनिधी) – नेवासा पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या कारागृहातील खोली क्र. 3 मध्ये हा प्रकार घडला याच खोलीमध्ये इतर गुन्हेगार असतांनाही हा प्रकार कसा घडला याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील, पोलीस अधीक्षक रमेशकु मार गायकवाड (सीआयडी, नाशिक), पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी भेट दिली. याप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल झाल्याबरोबर सदरच्या केसचा तपास सीआयडीकडे गेला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक दिलीप पवार व उपअधीक्षक अभिजीत शिवथरे दिवसभर ठाण मांडून होते. दरम्यान सायंकाळी सीआयडीचे वरिष्ठ पथक पोलीस उपअधीक्षक कृष्णा यादव (सीआयडी, अहमदनगर), पोलीस उपअधीक्षक हरिभाऊ जाधव (सीआयडी, अहमदनगर), उपअधीक्षक सोनाली कदम हेही नेवाशात दाखल झाले.

मयत अमोल उर्फ संतोष ईश्‍वर पिंपळे हा तालुक्यातील गीडेगावचा राहणारा असून त्याच्यावर नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये एक गुन्हा आर्म अ‍ॅक्टचासुद्धा दाखल आहे. सध्या तो नेवासा पोलीस स्टेशनला 11 ऑगस्ट रोजी माळीचिंचोरा येथील रवींद्र शेंडे यांच्याकडे झालेल्या घरफोडीमध्ये अटक करण्यात आला होता.

विशेष म्हणजे त्याला 18 ते 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. ती वाढवून 24 पर्यंत मिळाली होती. त्याने या प्रकरणात कबुली देऊन अर्धा तोळ्याचा मालही काढून दिला होता. या प्रकरणात अमोल शिवाजी भोसले व सुंदर शिवाजी भोसले हे त्याचे साथीदार फरार आहेत.

अमोल पिंपळेच्यामागे आई, बायको व मुले असा परिवार आहे. मंगळवारी त्याला नेवासा पोलिसांनी तपासकामी गावात आणले होते. त्याने स्थानिक सोनाराकडे सोने विकल्याचेही सांगितले होते.

संशयाला जागा –
ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे कारण या कारागृहाची उंची जवळपास 10 फूटाच्या आसपास असून आत्महत्या कशी होऊ शकते? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

 

LEAVE A REPLY

*