राहुरी : दोन मुलींसह आईची आत्महत्या

0

 कोणाला जबाबदार न धरण्याचे लिहिले चिठ्ठीत

उंबरे (वार्ताहर) – डाळिंबाच्या बागेत जाऊन येते, असे आपल्या पतीला सांगून घराबाहेर पडलेल्या महिलेने आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास राहुरी तालुक्यातील खडांंबे खुर्द येथील कल्हापुरे वस्तीवर ही घटना घडली. आपल्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये असे विवाहितेने चिठ्ठीत लिहिले आहे.
सुवर्णा प्रशांत कल्हापुरे (वय-30), अक्षता प्रशांत कल्हापुरे (वय-9) व आराध्या प्रशांत कल्हापुरे (वय-6) असे त्या दुर्दैवी मायलेकींची नावे आहेत. प्रशांत शांताराम कल्हापुरे हे कर्जत तालुक्यातील राशीन येथे एका बँकेत नोकरीला आहेत. सौ. सुवर्णा यांचे माहेर राहुरी तालुक्यातील टाकळीमिया नजीकच्या मोरवाडी येथील आहे. त्यांचे वडील आजारी असून ते राहुरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना भेटण्यासाठी हे दांपत्य आपल्या अक्षता व आराध्या मुलींसह शुक्रवारी (दि. 24) खडांबे खुर्द येथे आले होते.
काल शनिवारी रुग्णालयात उपचार घेणार्‍या आपल्या वडिलांसाठी भेटायला जाताना सुवर्णा यांनी जेवणाचा डबाही तयार केला होता. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास डाळिंबाच्या बागेत ज़ाऊन येते, असे पतीला सांगून त्या आपल्या दोन मुलींसह नजीकच्याच बागेत गेल्या. बराच वेळ झाला तरी पत्नी व दोन मुली घरी परतल्या नसल्याने प्रशांत कल्हापुरे यांनी त्यांचा बागेत शोध सुरू केला.
पण त्या आढळून आल्या नाहीत. त्यांचा शोध घेत असतानाच त्यांचे लक्ष विहिरीकडे गेले. त्यावेळी त्यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना विहिरीतून मुलीचा मृतदेह वर आलेला आढळून आला. मृतदेह पाहताच त्यांनी आरडाओरड करून जवळच राहणार्‍या नातेवाईकांना मदतीसाठी बोलावले.

ही घटना वार्‍यासारखी पसरताच ग्रामस्थांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. विहिरीत जादा पाणी असल्याने मृतदेह काढण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. मदतकार्यात खडांबेचे सरपंच कानिफनाथ कल्हापुरे, प्रभाकर हरिश्‍चंद्रे, दिलीप जठार, गणेश पारे, सुनील हरिश्‍चंद्रे, छबू पठाण यांनी विहिरीतून मृतदेह वर काढण्यासाठी सहकार्य केले.

या घटनेची खबर मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेहाचे राहुरी येथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर खडांबे येथे मायलेकींवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विहीर शांताराम कल्हापुरे यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुवर्णा या धामोरीचे सरपंच मच्छिंद्र सोनवणे यांची भाची होती. राहुरी पोलीस ठाण्यात खडांबे येथील पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुवर्णा यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात ‘मुलगा होत नाही म्हणून आत्महत्या करीत आहे याबाबत घरच्यांना त्रास देऊ नये’ असा मजकूर आढळून आला.

LEAVE A REPLY

*