Type to search

Featured मार्केट बझ

एज नो बार…

Share
एज नो बार..., Success Story A Velumani Thyrocare

माझा जन्म कोईमतूरपासून 26 किलोमीटर दूर अंतरावर असणार्‍या एका छोट्याशा गावात भूमीहीन शेतकरी कुटुंबात झाला. माझे वडील गरीबीमुळे कुटुंबाची जबाबदारी पार पाडू शकत नव्हते. त्यामुळे माझ्या आईने कौटुंबिक जबाबदार्‍या पेलण्याचा विडा उचलला आणि दोन म्हशी खरेदी केल्या. त्या दोन म्हशींच्या दुधातून दर आठवड्याला 50 रुपयांची कमाई होत होती. त्याच 50 रुपयांच्या साप्ताहिक कमाईवर कुटुंबाची गुजराण होत असे आणि जवळपास पुढील दहा वर्षे असाच सिलसिला सुरु होता. माझे कुटुंब इतके गरीब होते की माझ्यासाठी चपलांचा एक जोडाही खरेदी करण्याची त्यांच्यात आर्थिक क्षमता नव्हती.

कौटुंबिक परिस्थिती एका बाजूला इतकी बिकट असतानाही माझे शिक्षण सुरु होते. वयाच्या 19 व्या वर्षी मी बीएस्ससीची पदवी संपादित केली. पण पदवी मिळूनही मला कुठेच नोकरी मिळेना. बराच काळ फिरल्यानंतर कोईमतूरमधील एका छोट्याशा औषध कंपनीमध्ये 150 रुपये मासिक वेतनावर मला काम करण्याची संधी मिळाली. तो काळच असा होता की, पदवीधराला एखाद्या चौकीदारापेक्षा – वॉचमनपेक्षाही कमी पगार मिळायचा. मला मिळणार्‍या 150 रुपयांपैकी 50 रुपये मी स्वतःकडे खर्चासाठी ठेवून घ्यायचो आणि उर्वरित रक्कम घरी पाठवत असे. जवळपास चार वर्षे मी त्या कंपनीमध्ये नोकरी केली. पण असे लक्षात आले की अशा प्रकारे मी माझे एकही उद्दिष्ट साध्य करु शकणार नाही. आयुष्यभर असाच नोकरी करत तडजोड करत आयुष्य जगावे लागेल. अखेर मी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरीसाठी अर्ज दाखल केला.

मला जेव्हा मुलाखतीसाठी मुंबईला बोलावण्यात आले तेव्हा जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. पण उधारीवर पैसे घेऊन मी मुंबईला गेलो. बीएआरसीमध्ये मला 880 रुपये मासिक पगारावार नोकरी मिळाली. तेथे आठ तास काम केल्यानंतर उर्वरित वेळ माझ्याकडे मोकळाच असायचा. त्याचा सदुपयोग करण्यासाठी मी चार ट्युशन्समध्ये शिकवण्यासाठी जाऊ लागलो. त्यातून मला 800 रुपयांची अतिरिक्त कमाई होऊ लागली. त्यातील 1200 रुपये मी माझ्या आईला पाठवून द्यायचो. मला 2000 रुपये पगार आहे असे मी तिला खोटे सांगितले होते.

कारण केवळ 800 रुपयांच्या पगारासाठी तिने मला गाव सोडण्याची परवानगी दिली नसती. नंतरच्या काळात माझा विवाह स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करणार्‍या सुमतीशी झाला. विवाहानंतर मी नोकरी करत करत थायरॉईड बायोकेमिस्ट्रीमध्ये पीएचडी मिळवली आणि शास्रज्ञ म्हणून दर्जा मिळवला. त्यानंतर बीएआरसीच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील रेडिएशन मेडिसीन सेंटरमध्ये मी काम करु लागलो. जवळपास 15 वर्षे सरकारी नोकरी केल्यानंतर मनात एक अस्वस्थता जाणवू लागली. मी ज्यांना थायरॉईडचे परीक्षण करण्यास शिकवले होते ते भरभक्कम कमाई करत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्याच वेळी मी मात्र सरकारी पगारावर खुश होऊन इथेच रमलो आहे याची जाणीवही झाली.

ही अस्वस्थता वाढत गेली आणि एके दिवशी मी सरकारी नोकरी सोडली आणि 2 लाख रुपयांच्या भांडवलावर थायरोकेअर नावाची कंपनी स्थापन केली. आज आमच्या कंपनीचा टर्नओव्हर 350 कोटी इतका आहे आणि येणार्‍या दोन वर्षांमध्ये 600 कोटींच्या उलाढालीचे आम्ही लक्ष्य ठेवले आहे. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, कठोर परिश्रम, जिद्द आणि आपल्यातील कौशल्यक्षमतांच्या जोरावर वयाच्या-आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर नवी सुरुवात करता येते आणि त्यामध्ये यशस्वीही होता येते.

नवा व्यवसाय किंवा कोणतीही नवी सुरुवात करण्यासाठी वयाची बंधने कधीच असू शकत नाहीत किंवा असता कामा नयेत हे मी माझ्या उदाहरणावरुन सांगू शकतो. कारण बरीच वर्षे सरकारी नोकरी केल्यानंतर आणि तिथे चांगल्यापैकी बस्तान बसवल्यानंतरही अचानक मी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि 2 लाख रुपयांच्या भांडवलावर थायरोकेअर नावाची कंपनी स्थापन केली. आज आमच्या कंपनीचा टर्नओव्हर 350 कोटी इतका आहे

ए. वेलुमणी

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!