पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे पुणतांबा येथील सबस्टेशनचा कारभार रामभरोसे

0

पुणतांबा ( वार्ताहर ) – महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाच्या पुणतांबा येथील वीज उपकेंद्रात गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे या केंद्राचा कारभार सध्या रामभरोसे चालला आहे. परिसरातील अंदाजे तीन हजार वीज ग्राहकांना सध्या विजेच्या अडचणी सोडविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उपकेंद्रात चार ते पाच कर्मचारी कायमस्वरूपी असून इतर कर्मचारी आऊटसोर्सिंगमार्फत कार्यरत आहेत. पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे हे कर्मचारी सहजासहजी वीज ग्राहकांना भेटत नाहीत.

ज्यांच्याकडे या उपक्रेंदाचा अतिरिक्त कार्यभार आहे, ते अधिकारी त्यांच्या सोयीप्रमाणे पुणतांबा उपकेंद्रात येतात व जातात. मंगळवारी पुणतांबा व चांगदेवनगर येथील अनेक शेतकरी कृषिपंपाचे बिल भरण्यासाठी उपकेंद्रात गेले असता तेथे विजेच्या बिलाचे हप्ते पाडण्यासाठी कार्यरत असणारा कर्मचारी नव्हता. तसेच इतरही कर्मचारी नव्हते. ऑपरेटरशिवाय कार्यालयात शुकशुकाट होता. प्रभारी अधिकारीही येणार नसल्यामुळे अनेक वीज ग्राहकांना हेलपाटे मारावे लागले. उपकेंद्राचा दूरध्वनी एक वर्षापासून बंद आहे, त्यामुळे त्याचा फटका वीज ग्राहकांना बसत आहे. एकूणच कार्यालयाच्या कारभाराबाबत वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

LEAVE A REPLY

*