डॉ.आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे डबा बंद आंदोलन

0
निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा निषेध
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बालिकाआश्रम रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी डबा बंद आंदोलन करुन, वसतिगृहात असलेल्या गैरसुविधेबद्दल निषेध व्यक्त करत सुविधा देण्याची मागणी केली.
समाजकल्याण अधिकारी वाबळे यांनी वसतिगृहास भेट देवून, विद्यार्थ्यांची समजूत घालत प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले. आंदोलनात किरण केदार, गणेश आल्हाट, अविनाश पाखरे, गणेश ओमासे, अजय मोहिते, सचिन दळवी आदीसह वसतिगृहातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
गेल्या चार महिन्यांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अनेक अडी-अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वसतिगृहातील अधिक्षक व कर्मचारी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देत नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले. दोन तास चाललेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी वसतिगृहा बाहेर ठिय्या देवून निदर्शने केली.
गिझर असून सुध्दा विद्यार्थ्यांना आंघोळीला गरम पाणी दिले जात नाही. वॉटर फिल्टर मशीन असून ती बंद असल्याने मुलांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळणे कठीण झाले आहे. मेस कॉन्ट्रॅक्टर मार्फत खराब फळे व निकृष्ट दर्जाचे जेवण येत असल्याने अनेक वेळा तक्रार करुन देखील वसतिगृह अधिक्षक दखल घेत नाही.
तोंडावर परिक्षा आल्या असताना इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अद्यापि पुरविण्यात आलेले नाही. लोडशेडींगमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी इन्व्हर्टर ची सोय नाही. वसतिगृहात अस्वच्छतेने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, फॅन व कॉटची व्यवस्था नसल्याने हाल होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणने आहे. तसेच प्रश्‍न सोडविण्यासाठी वसतिगृह अधिक्षक उपलब्ध होत नसल्याचा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*