Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

हो..हो ही कुठली इंग्लिश मेडियम नाही, तर येवला तालुक्यातील पिंपळखुटे ३ रे येथील जिल्हा परिषद शाळा आहे

Share
हो..हो ही कुठली इंग्लिश मेडियम नाही, तर येवला तालुक्यातील पिंपळखुटे ३ रे येथील जिल्हा परिषद शाळा आहे, students listen via interactive board at pimpalkute 3rd zp school yeola

इंटरअॅक्टिव्ह बोर्डवर विद्यार्थी घेतायेत शिक्षण

मुलांना चांगले शिक्षण केव्हा मिळू शकते. आपण सहजपणे सांगतो शिक्षण हे कृतियुक्त असावे. तरच प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकते. शिक्षणात जेव्हा शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया समाविष्ट होते, तेव्हा मुलांची शिकण्याची गती वाढते.

विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना समजण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव आवश्यक असतो. तेव्हा विद्यार्थ्याच्या दृढीकरणाचा वेग वाढतो. आणि वेळी कमी लागतो. हाच विचार करून आपणही असा प्रयोगशील उपक्रम राबवू शकतो का? तर यासाठी आपल्या शाळेत डिजिटल वर्ग असावा. परंतु यातून पुन्हा एकमार्गी शिक्षण प्रक्रिया होणार ज्यात पारंपारिक पद्धतींमध्ये डिजिटल साधनांचा वापर करणे.

इतकाच हेतू साध्य होणार, म्हणून काहीतरी वेगळे आपल्या शाळेने राबवावे. विद्यार्थ्यांना स्वतः आनंददायी शिक्षण घेता येईल. म्हणून इंटरअॅक्टिव्ह बोर्ड कसा असतो हे सुरुवातीला समजून घेतले. आता कुठे योग्य पर्याय सुचला. परंतु ते सगळे शाळेच्या आवाक्यात नव्हते.त्यासाठी जिल्हा परिषद किंवा शासनही शाळांना निधी देत नाही.

शेवटी पर्याय राहतो तो लोकसहभाग म्हणून आपणही लोकसहभाग घेण्यासाठी प्रयत्न करावा या भूमिकेतून सुरुवात केली आणि लोकसहभागातून इंटरअॅक्टिव्ह डिजिटल साधनांनी परिपूर्ण अशा वर्गात विद्यार्थी शिकू लागली. तेव्हा शाळेतील ‘समजा’ हा शब्दच हळूहळू विलय पावत चालला.

इंटरअॅक्टिव्ह बोर्डमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी असल्याने विद्यार्थ्यांनी सुरुवातीला इंटरअॅक्टिव्ह बोर्डला हात लावणे टाळले. व इंटरअॅक्टिव्ह बोर्ड बघण्यातच धन्यता मानली. व मी जे शिकवेन त्यातच समाधान मानले. मलासुद्धा प्रत्येक बाब पूर्णपणे समजण्यात जवळजवळ वर्ष कसे संपले. हेही कळले नाही. आज आम्ही तीन वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून इंटरअॅक्टिव्ह डिजिटल संच वापरत आहोत. सहजपणे तीन वर्षांचे सिंहावलोकन केले असता मला स्वतःला जो संच वापरण्याविषयी साशंकता होती. तो संच विद्यार्थीही सहजपणे हाताळू लागली.

विदयार्थी गुणवत्तेसाठी आवश्यक मेहनत प्रामाणिकपणे मी करतच असून परंतु आता पालकांची शाळेकडून बदलणाऱ्या अपेक्षा ओळखून मराठी व गणित विषयांबरोबर इंग्रजी विषयात ‘वाचन’ ही बाब महत्त्वाची आहेतच याबरोबर मुलांना लहान-लहान इंग्रजी संभाषण, इंग्रजीत मुलाखत, वर्गातील एखाद्या वस्तूवर वाक्य बनवणे. आणि त्या वस्तूवर इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही मुले छान प्रकारे देतात. तसेच इंग्रजीमधील एखाद्या क्रियापदाचा वापर करून वाक्य बनवून ते वाक्य वाढवत जाणे. इंग्रजीतील सर्वनामांचा वापर करून वाक्य तयार करणे.अशा नाविन्यपूर्ण बाबी आता पालकांना खूपच प्रभावित करत आहेत.

सुरुवातीला इंटरअॅक्टिव्ह बोर्डवर सेन्सर पेनचा वापर करताना थरथरणारी बोटे आज सहजपणे सेन्सरपेन वापरू लागली. भौमितिक आकृत्या यांचे आरेखन करून त्यात रंग भरू लागली. अचूक भौमितिक आकृत्या यांची निवड करून त्यांना नावे देणे. सेन्सर पेनचा रंग बदलणे. पानांची निवड करणे. चुकीचा भाग खोडराबरचा वापर करून खोडणे. कंपासद्वारे वर्तुळ काढणे. रेषा, रेषाखंड, किरण, कोन यांचे आरेखन करू लागली. आकृतीद्वारे अपूर्णांक दाखवणे. इंग्रजी लेखनासाठी चार रेघी पानांची निवड करून त्यात इंग्रजी विषयाचा सराव करू लागली.

गणिते सोडवण्यासाठी चौकटच्या पानांचा वापर करू लागली. ई- बुक चा आवश्यक भाग स्कॅन करून इंटरअॅक्टिव्ह बोर्डच्या सहाय्याने समजून घेऊ लागली. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील सर्व घटकांची माहिती चांगल्या प्रकारे समजल्याने त्यांच्या ज्ञानाचे दृढीकरण होण्यास मदत झाली.

इंटरअॅक्टिव्ह बोर्डच्या सहाय्याने शिकवलेला एखादा घटक जतन करून मुलांना पुन्हा दाखवता येतो. त्यामुळे मुलांचा त्या घटकाचा चांगला सराव होतो. मराठी,गणित आणि इंग्रजी या विषयांचे अनेक साहित्य PDF स्वरुपात उपलब्ध असून त्यांचा आवश्यक भाग स्कॅन करून विद्यार्थ्यांना समजून सांगितल्याने अवघड वाटणारा घटक सराव करून घेतल्याने समजणे सोपे झाले.

इंटरअॅक्टिव्ह बोर्ड इंटरनेटला सहजपाने जोडता येत असल्याने मुलांना कोणताही घटक शिकवणे शक्य झाले.त्यामुळे मुलांच्या दृष्टीने अमूर्त कठीण असणाऱ्या संकल्पना यांचा मूर्त स्वरुपातील अनुभव देणे शक्य झाले. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आनंददायी तसेच मनोरंजक करण्यास इंटरअॅक्टिव्ह बोर्ड खूपच प्रभावी साधन ठरत आहे.

आमच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे आजही अॅण्ड्राईड मोबाईल नसतानाही ती मुले जेव्हा इंटरअॅक्टिव्ह बोर्ड सहजतेने हाताळताना आम्ही बघतो तेव्हा मी खात्रीने सांगू शकतो, अॅण्ड्राईड मोबाईलचा वापर करणारेही इंटरअॅक्टिव्ह बोर्ड सहजपणे हाताळू शकत नाही. परंतु शाळेतील चिमुकली जेव्हा इंटरअॅक्टिव्ह बोर्ड सहजतेने हाताळतात तेव्हा मनाला सुखद अनुभव मिळतो.

नामांकित इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत इंटरअॅक्टिव्ह बोर्डच्या साहाय्याने जसे शिकायला मिळते तेच जर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळखुटे ३ रे येथे मिळत असेल तर शिक्षक म्हणून होणारा आनंददायी प्रवास हा पुढील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
दुष्काळी भागात असणारे पिंपळखुटे ३ रे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी चांगल्या दर्जाच्या खाजगी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे इंटरअॅक्टिव्ह बोर्डच्या साह्याने अध्ययन करू लागली. निश्चितच स्वप्नवत असणारा प्रवास. लोकसहभागातून किमया साधलेल्या शाळेची प्रेरणादायी कहाणी.

प्रविण विंचू, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

पिंपळखुटे ३ रे , ता. येवला, जि. नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!