ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना मिळणार मोफत पास

0
जळगाव । दि.16 । प्रतिनिधी – जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शिक्षणासाठी शहरात येण्यासाठी राज्य परिवहन मंडळातर्फे अहिल्याबाई होळकर योजना सुरु करण्यात आली आहे.
या विद्यार्थीनींना मोफत दिली जाणार आहे. तसेच परिवहन मंडळातर्फे जादा बसेस सुरु करण्यात आल्या असून जिल्ह्यात दररोज सुमारे अडीच हजार बसेसच्या फेर्‍या सुरु करण्यात आल्या आहे.
शहरात शिक्षण घेण्यासाठी जिल्हाभरातून दररोज सुमारे हजारोच्या संख्येने विद्यार्थी येत असतात. तसेच शहरात येणार्‍यासाठी ते खाजगी व राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करीत असतात.

परंतू विद्यार्थ्यांकडून खाजगी वाहनातून प्रवास अधिक प्रमाणात करीत असल्याने राज्य परिवहन मंडळाला यंदा सुमारे 36 कोटी 51 लाख 83 हजारांचा तोटा सहन करावा लागला आहे.

ग्रामीण भागातील होतकरु विद्यार्थीनींसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अहिल्याबाई होळकर योजना राबविण्यात आली आहे. या योजनेतून विद्यार्थीनींना मोफत पास दिली जाणार असल्याचे राज्य परिवहन मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगीतले.

विद्यार्थ्यांना मिळणार 67 टक्के सवलत
जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये सुरु झाले असून शहरात शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.

विद्यार्थ्यांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांना 1 महिना, 3 व 6 महिने याप्रमाणे पास वितरीत केल्या जात असतात.

यंदा विद्यार्थ्यांना पासमध्ये 67 टक्के सवलत मिळणार असून त्यांना पास काढण्यासाठी केवळ 33 टक्के रक्कम अदा करावी लागणार आहे.

शाळांमध्ये मिळणार बसची पास
राज्य परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी मासिक पसेस दिल्या जात असतात. ही पास घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यलयांना दांडी मारुन पास घेण्यासाठी महामंडळाच्या आगारामध्ये थांबावे लागते. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते.

त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यंदा आगारातील कर्मचारी व शिक्षक यांच्या द्वारे शाळेमध्येच विद्यार्थ्यांना पास वितरीत करण्याच्या सुचना सर्व आगारप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार येत्या काही दिवसातच विद्यार्थ्यांना शाळेतच पास मिळणार असल्याचे विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी सांगीतले.

 

LEAVE A REPLY

*