Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

विद्यार्थी-पालकांचा रूद्रावतार ‘आयुष’चे भुमिपूजन गुंडाळले

Share

खासदारांवर जागेची पाहणी करून परतण्याची नामुष्की

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल शेजारी असलेल्या आयुष रुग्णालय उभारणीच्या मुद्यावर मंगळवारी शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी व पालकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. विद्यार्थी-पालकांच्या रूद्रावतारामुळे प्रशासनावर भुमिपूजन गुंडाळण्याची वेळ आली. त्याऐवजी दक्षिणेच्या खासदारांनी जागेची पाहणी करून वेळ मारून नेली.

माजी खासदार दिलीप गांधी यांच्या पाठपुराव्यामुळे नगर शहरात 30 खाटांचे आयुष हॉस्पिटल बांधणीसाठी 8 कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी असे एकत्रित उपचार या हॉस्पिटलमध्ये होणार आहेत. साडेतीन हजार स्केअर फुटाचे हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. सिव्हील हॉस्पिटलसमोरच तारकपूरकडे जाणार्‍या रोड लगत असलेल्या शासकीय जागेवर हे हॉस्पीटल उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमीपूजन मंगळवारी सकाळी दक्षिणेतील भाजपा खासदारांच्या हस्ते होणार होते.

याच ठिकाणी सेंट विवेकानंद शाळा आहे. त्याठिकाणी मोकळ्या मैदानाचा वापर शाळेकडून क्रीडांगणासाठी करण्यात येत होता. हॉस्पीटल झाल्यास विद्यार्थ्यांचे क्रीडांगण अडवले जाणार आहे. हॉस्पिटल बांधतांना त्यांची दिशा बदलण्याची मागणी शाळा, विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही भुमिपूजनाचा घाट घालण्यात आल्याने संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी मंगळवारी सकाळी 9 वाजेपासून मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले.

ही जागा माजी खासदार दिलीप गांधी यांनी सुचविली असल्याने आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी गांधी विरोधी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, नगरसेवक योगीराज गाडे, महापालिकेतील भाजपचे गटनेते स्वप्निल शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. अभय आगरकर, शहर सरचिटणीस अमित गटणे, नाट्यकर्मी अमोल खोले, ज्ञानेश शिंदे दाखल झाले. आंदोलनाचे स्वरूप वाढल्याची जाणीव होताच भुमिपूजन करण्यासाठी सरसावलेल्या प्रशासनाची बोबडी वळली.

यावेळी हॉस्पिटल बांधतांना शाळा आणि विद्यार्थ्यांचा विचार व्हावा, ही शाळा सिंधी एज्युकेशन सोसायटी असून 50 वर्षापासून येथे आहे. पाच एकर सरकारी जागा असतानाही शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होईल, अशा पध्दतीने आयुष हॉस्पिटल बांधले जाणार आहे. दक्षिण-उत्तर बांधली जाणारी इमारत पूर्व-पश्‍चिम बांधावी या मागणीसाठी संस्थेचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यांनी होकार दर्शविला. मात्र, त्यानंतरही प्लॅन बदलला नाही. आयुष हॉस्पिटल बांधणीला विरोध नाही, पण ते बांधताना शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी माफक मागणी विद्यार्थी-पालकांनी केली. अखेर खासदारांनी जागेची, हॉस्पिटलच्या बांधकामाच्या कागदपत्रांची पाहणी केली आणि आंदोलनकर्त्यांच्या मागणीपुढे नमते घेत भूमीपूजन कार्यक्रमाऐवजी जागेची पाहणी करत वेळ मारून नेली. तसेच हॉस्पिटलच्या बांधकामाचा दिशा बदलण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा, अशा सुचना अधिकार्‍यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, या गुंडाळलेल्या भुमिपूजनाची चर्चा दिवसभर नगरच्या राजकीय वर्तुळात होती.

सुडबुध्दीने शाळेला अडचण होईल, अशा पध्दतीने हॉस्पिटल इमारत बांधली जात आहे. इमारत बांधणीला विरोध नाही तर फक्त इमारतीची दिशा बदलावी, अशी आमची मागणी आहे. एका बाजूला नाला, दुसर्‍या बाजुला निवासी इमारत अन् तिसर्‍या बाजूला हायवे असताना चौथ्या बाजूला हॉस्पिटलची भिंत बांधली तर मुलांची गैरसोय होईल. म्हणून शाळेची गैरसोय होणार नाही, अशा पध्दतीने हॉस्पिटल बांधावे.
– दामोधर बठेजा, सचिव, अहमदनगर सिंधी एज्युकेशन सोसायटी.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!