Friday, May 3, 2024
Homeनाशिकएसटी चालकास मारहाण करणार्‍यास सश्रम कारावास

एसटी चालकास मारहाण करणार्‍यास सश्रम कारावास

नाशिक । प्रतिनिधी

एसटी बस चालकास मारहाण करणार्‍या आरोपी रिक्षाचालकास एक वर्षाचा सश्रम कारावास व 3 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी ठोठावली.

- Advertisement -

अनिल पांडुरंग कोरडे (26, रा. शिवाजीवाडी, नासर्डी पुलाजवळ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना डिसेंबर 2009 मध्ये घडली होती. नाशिक शहर एसटी बस सेवेत चालक म्हणून कार्यरत असलेले सुभाष रामू देवकर हे 11 डिसेंबर 2009 रोजी सकाळी शालिमार ते देवळाली कॅम्प या मार्गावरुन शहर एसटी बस घेऊन जात होते. त्यावेळी एमएच 12 झेड 7649 क्रमांकाच्या रिक्षावरील चालक अनिल कोरडे याने रिक्षा रस्त्यात आडवी लावल्याने त्यास रिक्षा पुढे घे असे देवकर यांनी सांगितले.

याचा राग आल्याने कुरापत काढून कोरडे याने सुभाष देवकर व वाहक राजू डगळे यांना मारहाण करीत धमकावले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक आर. बी. रसेडे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे आर. वाय. सूर्यवंशी यांनी युक्तीवाद केला. साक्षीदार, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी आरोपी अनिल कोरडे यास दोषी ठरवत 1 वर्षाचा सश्रम कारावास व 3 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक टी. ई. लभडे, पोलीस शिपाई आर. आर. जाधव यांनी कामकाज पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या