Type to search

दिवाळी - प्रवास वर्णन

…’ती’ होतीच फार अवखळ, चंचल आणि उर्जस्वल

Share

एके दिवशी नवल घडलं.

आभाळाला हात पोहोचलेल्या एका उंचच उंच पर्वताच्या कुशीत ‘तिचा’ जन्म झाला.

‘ती’!

‘ती’ होतीच फार अवखळ, चंचल आणि उर्जस्वल! जन्माला आली तेव्हा एवढीशी होती, बोटभर आकाराची. हळूहळू ती वाढू लागली, ऐसपैस पसरू लागली. तिला पर्वतावर थांबवेना. खाली जाण्याचा हट्ट करू लागली. तिने पर्वताला विचारले, “बाबा, जाऊ का मी? मला तुमच्या पायथ्याशी  मुक्त बागडायचं आहे. आजवर न बघितलेलं जग बघायचं आहे.” तिच्या पर्वतपित्याला हे अपेक्षित होतंच.

तो जड अंतःकरणाने म्हणाला, “जा बाळ, तुझा प्रवास तुला करावाच लागणार आहे. तू येथून जाऊ नयेस असं मला कितीही वाटलं तरी मी तुला रोखून धरू शकणार नाही. माझ्यात तेवढी ताकद नाही. तू शक्तिचं मूर्तिमंत रूप आहेस. जगाच्या कल्याणासाठी तुला जावंच लागणार आहे.”

“पण बाबा माझा प्रवास सुखाचा होईल ना? मला काही त्रास तर होणार नाही ना?” ती काळजीने म्हणाली.

“आयुष्याच्या प्रवासात त्रास कोणाला टळला आहे बेटी? ज्यांना पुढेपुढे जायचे आहे त्यांना त्रास तर होणारच. माझ्या खांद्यावर बसून तुला माझ्या पायथ्याशी दिसणारे लहान-लहान तलाव बघ. त्यांना नाहीय काहीच त्रास. पण त्यांच्या आयुष्यात ना काही नावीन्य आहे ना काही गती आहे. दुर्गंधी येते त्यांच्या स्थितीशील आयुष्याला कालांतराने.

तू नदी आहेस, चैतन्याचं साक्षात रूप!

तुझ्या प्रवासात तुझ्यावर पुष्कळ संकटं येतील. पण तू थांबू नकोस, प्रवाही रहा. तू कितीही दूर गेलीस तरी माझ्याशी तुझं नाळेचं नातं आहे, ते तुटणारं नाही. जा बाळ, माझे आशीर्वाद आहेत तुला!”

पर्वतपित्याचा आशीर्वाद घेऊन ती निघाली.

अज्ञाताच्या प्रवासाला.

ती.

ती नदी.

पर्वतपित्याच्या खांद्यावरून एखाद्या प्रपातासारखी ती वेगाने कोसळू लागली. दऱ्याखोऱ्यांतून, निबिड अरण्यातून आपला मार्ग शोधत ती वेगाने पुढे जाऊ लागली. तिच्या वेगवान प्रवाहाने आपला एक नवा मार्ग निर्माण केला. महाकाय पर्वत तिच्या मार्गात आडवे आले, पर्वतांना वाटलं, ‘झालं, संपला हिचा प्रवास. ही आता कसली पुढे जाते?

नदी कोणाला उत्तरं देण्याचं भानगडीत पडलीच नाही मुळी!

वाटेतल्या अडथळ्यांना वळसा घालून शांतपणे नदी पुढे गेली. मोठ्या कातळांनी, शिळांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा वेग एवढा होता की त्या शिळांचे तुकडे तुकडे झाले आणि तिच्या प्रवाहात ते घरंगळत पुढे निघाले.

ओहो!

इतक्या दिवसांच्या परिश्रमानंतर तिला एकदाचा सपाट पठारी प्रदेश लागला. मैलोगणती पसरलेली मोकळी मैदानं, चहूकडे पसरलेली काळीभोर मऊशार माती. नदीने स्वतःशी हुश्श केलं! “चला आता आपला प्रवास सुखाचा होणार. आता ना कोणते अडथळे, ना कसला त्रास. वेगाने पुढे निघता येईल.” नदी मनाशी म्हणाली.

नदीच्या आगमनाने पठार खूष झालं.

आता आपलं कल्याण होणार! आपलं भाग्य उजळणार! पठार मनोमन आनंदलं. त्याने प्रेमाने नदीचं स्वागत केलं.

नदी हरखली.

केवढा विसावा मिळाला होता तिला!

पठारावर माया करत नदी वाहू लागली.

नदीच्या सहवासाने पठार फुललं, बहरलं. पठारावर एक नवाच उत्सव सुरू झाला होता जणू!

नदीही खूष होती मनोमन.

पण,

हळूहळू नदीला तिच्यात काही बदल घडताना जाणवायला लागले.

तिच्यातला अवखळपणा, तिचा वेग आणि तिची ऊर्जा हरवत चालली होती.

नदीला संथपणा आला होता.

आपलं अंग जडजड झाल्यासारखं वाटत होतं तिला दिवसेंदिवस.

नदीनं स्वतःकडे एक दिवस नीट निरखून पाहिलं. तिचं स्फटिकासारखं निर्मळ पाणी आता गढूळ दिसायला लागलं होतं. कठीण कातळांना भेदून पुढेपुढे जाणारं तिचं वेगवान पाणी आता पात्र सोडून बाहेर इतस्ततः पसरू लागलं होतं. मार्गावरचा ‘फोकस’ हरवत चालली होती नदी स्वतःचा.

पठारावरच्या मऊशार जमिनीत तिचं भरपूर पाणी झिरपत होतं.

नदीच्या लक्षात यायला लागलं –

तिचा संघर्ष संपला, सुखासीन जीवन सुरू झालं तेव्हा तिचा वेगही आपोआप मंदावला, ती सुस्तावली जणू! पठारावरच्या मातीनं नदीही सलगी केली खरी, पण नदीला पुढे जायला मदत करण्याऐवजी तिने स्वतःचं हित साधून घेतलं आधी. नदीनं मातीला ‘जीवन’ दिलं, पण मातीच्या सहवासानं मात्र नदीला दिला तो गढूळपणाच!

नदीला पुन्हा शहाणपण सुचलं, पठाराची माया दूर सारत ती पुढे दगडधोंड्यांच्या प्रदेशात जाऊन पोहोचली. नदीनं अंग ठणकवणाऱ्या  दगडधोंड्यांना पाहून नाक मुरडलं.

मात्र दगड ओबडधोबड असले, कुरूप असले तरी त्यांना नदीविषयी फारच आपुलकी वाटत होती.

दगडांनी विचारलं, “नदीबाई तू कोठून आलीस आणि कोठे आहेस चालली?”

“मी आले आहे आभाळाला हात टेकलेल्या एका उंच पर्वतावरून आणि निघाले आहे दूरच्या प्रवासाला, जेथे सगळ्याच नद्या जातात म्हणे शेवटी.” नदी भाव खात उत्तरली.

“आम्ही करू का काही मदत तुझ्या प्रवासात?”

दगडांनी काळजीपोटी विचारलं, तेव्हा नदीला गंमतच वाटली जरा. ही ओबडधोबड मंडळी काय बरं मदत करणार आपल्याला?

पण तरीही त्यांचा मान राखत नदी म्हणाली, “मदत नको मला काही, पण सोबत चला काही पावलं, कंटाळलात की थांबून घ्या.”

दगडधोंडे अगदी सहकुटुंब आणि मित्रपरिवारासह निघाले, नदीला सोबत म्हणून.

दिंडी पुढे निघाली.

दगडधोंडे, लहानसहान वाळूचे कण नदीच्या प्रवाहात घरंगळत पुढे निघाले. त्यांचं अंग अगदी तासून निघालं त्या प्रवासात, त्यांची सगळी टोकं घासली जाऊन मुलायम झाली. दगडांच्या जीवनात अधिक सौंदर्य आलं. छोट्या वाळूच्या कणांनी नदीचं ‘शोषण’ करण्याचा प्रयत्न न करता तिच्या गढूळ पाण्याला स्वच्छ करण्याचं काम केलं.

नदी आता पूर्वीसारखी वाहू लागली वाटेत येणाऱ्या कुठल्याही संकटाला न जुमानता अगदी स्वतःच्याच धुंदीत जगण्याचा आनंद लुटत, पृथ्वीवरील चराचराला जगण्याची कला शिकवत!

– मनीषा उगले, 8805334026

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!