वादळाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

0

नाशिक । ओखी वादळामुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने केलेल्या पिकांच्या हानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले असून उद्या शुक्रवारपासून कृषी व महसूल खात्याच्या वतीने पंचनाम्यांना सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र मागील महिन्यात ज्या शेतींचे पंचनामे करण्यात आले त्यांचे फेरपंचनामे पुन्हा करण्यात येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

ओखी चक्रीवादळाने अरबी समुद्रात शिरकाव केल्यामुळे त्याचे पडसाद नाशिक जिल्ह्यातही उमटले. सोमवारपासून जिल्ह्यातील हवामानात अचानक बदल झाला व मंगळवारी सकाळी आकाशात ढगांची गर्दी होऊन दिवसभर अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. विशेषत: काढणीवर आलेल्या द्राक्षबागा धोक्यात आल्या. वादळामुळे आलेल्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात कांदा भिजल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. रिमझिम पाऊस आणि थंड हवेमुळे कांदा खराब झाला.

या वादळाचा द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे पूर्ण अवस्थेतील द्राक्षमण्यांना तडे जाऊ लागले आहेत. भुरी रोगाचा वाढता प्रादुर्भाव शेतकर्‍यांची डोकेदुखी ठरत आहे. तर उशिरा द्राक्ष हंगाम घेणार्‍या शेतकर्‍यांचा बाग फुलोरा स्टेजमध्ये असल्याने गळ होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांनी खळ्यावर काढून ठेवलेला मका, कांदा, सोयाबीनचे पीक भिजले.

अवघ्या बारा तासांत जिल्ह्यात सुमारे 175 मिलीमीटर पावसाची नोंद यावेळी करण्यात आली. मात्र शासन निर्देशानुसार 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास पंचनामे करण्याचा निकष असल्याने प्रशसनाने यासंदर्भात कोणतेही आदेश यंत्रणेला दिले नव्हते. त्यातच शेतात पाणी असल्याने शेतमाल भिजून आणखी खराब होण्याचा धोका असल्याने शेतकर्‍यांनी गेल्या दोन दिवसांपासून आवरासावर केली.

मात्र आज शासनाने वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळीने 377 गावांतील 19 हजार शेतकर्‍यांचे नुकसान झाले. या नुकसानीचा अहवाल दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाला प्राप्त झाला अजून मागच्या नुकसानीचीच मदत मिळालेली नसताना शेतकर्‍यांवर पुन्हा आस्मानी संंकट कोसळले आहे.

फेरपंचनामे नाही : ज्या पिकांचे ऑक्टोबरच्या अवकाळी पावसात नुकसान झाले होते त्यांचे फेरपंचनामे करण्याची गरज नसल्याचे शासनाने या आदेशात म्हटले आहे. शासनाच्या निकषानुसार 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्यास मदत दिली जाते. मात्र एखाद्या शेतकर्‍याचे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले असेल आणि ओखी वादळामुळेही जर 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असेल तर त्यांचे पंचनामे करण्यात येणार आहेत.

सहकार्य करावे : उद्या शुक्रवारपासून कृषी व महसूूल खात्याकडून पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत. याकरिता शेतकर्‍यांच्या बांधावर अधिकारी येऊन पाहणी करणार आहेत. याकरिता शेतकर्‍यांनी सहकार्य करावे जेणेकरून कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*