नातेवाईकांचा हस्तक्षेप थांबवा अन्यथा अपात्रतेचा प्रस्ताव पाठवू

0

नेवासा नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांची
नगरसेवकांना पत्राद्वारे तंबी

नेवासा (का. प्रतिनिधी)- आपले नातेवाईक व हितसंबंधितांचा नगरपंचायतीच्या कामकाजात होणारा हस्तक्षेप थांबवा अन्यथा शासन नियम व नगरपंचायत अधिनियमांतील तरतुदीनुसार आपणाविरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येईल अशी तंबी नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी सर्व नगरसेवकांना पत्र पाठवून दिली आहे.

नेवासा नगरपंचायतीची निवडणूक होऊन पहिलीच नगरपंचायत स्थापन झाली. या नगरपंचायतीत निवडून आलेल्या सदस्यांबरोबरच नातेवाईक व हितचिंतकांनाही मोठा आनंद झाला. जणू आपणच नगरसेवक झालो आहोत या थाटात नगरपंचायतीत त्यांची ये-जा वाढली. कर्मचार्‍यांना वेगवेगळ्या कामासाठी धमकीवजा इशारेही सुरू झाले. काही नगरसेविकांचे पती, नगरसेवकांच्या नातेवाईकांचा जाच कर्मचार्‍यांना होऊ लागला. ऐकावे कोणाचे? असा प्रश्‍न त्यांना पडल्याने कामे खोळंबू लागली.

राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांचे मोठे कार्यकर्ते, त्यांचे सहाय्यक यांच्याबरोबरच नगरसेवकांचे नातेवाईक व हितचिंतक यांच्या हस्तक्षेपाने नियमित कामे करणेही अवघड झाल्याने वैतागलेल्या मुख्याधिकार्‍यांनी नगरपंचायत सदस्यांना नियमावर बोट ठेवून कामकाजातील हस्तक्षेप थांबवण्याची तंबी दिली आहे.

याबाबत पाठविलेल्या पत्रात म्हटले की, नगरपंचायत कार्यालयात व कार्यालयाच्या कामकाजात आपले नातेवाईक व हितचिंतक यांचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आहे. आपण आपल्या संबंधीत नातेवाईक अथवा हितचिसंबंधीत कार्यालयीन कामकाजामध्ये हस्तक्षेप करणार नाही याची दक्षता घ्यावी. हस्तक्षेप केल्यास अथवा कर्मचार्‍यांवर दबाव आणल्यास शासन निर्णय व नगरपरिषद अधिनियमांतील तरतुदींनुसार सदस्य अपात्र होऊ शकतो. आपण दखल न घेतल्यास आपणाविरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावा लागेल.  दरम्यान या पत्राचा हस्तक्षेप करणार्‍या नातेवाईकांनी व संबंधित नगरसेवकांनी धसका घेतला आहे.

LEAVE A REPLY

*