‘वाहन ४.०’ ने चोरीला आळा

0
नाशिक | दि. ७ प्रतिनिधी- प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या ‘वाहन ४.०’ या ऑनलाईन प्रणालीमुळे चोरी गेलेले वाहन पुन्हा विक्री करणे अशक्य असल्याने सर्व प्रकारच्या वाहनचोरीला आपोआप आळा लागत असल्याचा दावा नाशिक आरटीओच्या वतीने करण्यात आला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जानेवारी २०१७ पासून राज्यभरात सारथी ४.० व वाहन ४.० ही संगणक प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे मागील पाच महिन्यांच्या कालावधीत आरटीओच्या जवळपास सर्व सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. याद्वारे शिकाऊ किंवा कायमस्वरूपी परवाना काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून अपॉईंटमेंट घ्यावी लागते. व परिक्षाही ऑनलाईन होत आहेत. यासह नवीन वाहन नोंदणी, नूतनीकरण, परवाने, विविध कर अशी विविध कामे आता ऑनलाईन करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना आरटीओतील कामांसाठी हेलपाटे मारणे व वेळ वाया घालवण्याची गरज पडणार नाही.

नाशिक परिवहन विभागातही वाहन ४.० ही संगणक प्रणाली जानेवारी २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीनुसार नवीन वाहन कंपनीकडून डिलरकडे आल्यानंतर लगेच या वाहनाची चेसी क्रमांकासाह सर्व कागदपत्रांची ऑनलाईन पूर्तता करणे डिलरला बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यावेळी हे वाहन प्रत्यक्ष ग्राहकाला विक्री होईल, त्यावेळी केवळ ग्राहकाचे नाव या प्रणालीत भरले की त्या वाहनाची सर्व इंतभूत माहिती ऑनलाईन दिसून सर्व परवाने तात्काळ उपलब्ध होत आहेत.

ग्राहकांकडून केवळ ऑनलाईन विविध कर भरणे अपेक्षित आहे. या नव्या पद्धतीमुळे कोणतेही वाहन चोरीला गेले तरी चोरणारा या वाहनाची परस्पर विक्री करू शकत नाही. आरटीओकडे या वाहनासंबंधित कोणतेही कागदपत्र आले तरी लगेच या वाहनाचा मूळ मालक व त्याची संपूर्ण माहिती संगणकावर दिसणार आहे. यामुळे मूळ मालकाशिवाय कोणालाही वाहन विक्री शक्य होणार नाही. तसेच वाहनास केवळ दुसरा क्रमांक अगर चेशीतील वाहन क्रमांकात खाडाखोड करूनही ते विक्री करणे कदापि शक्य होणार नाही. यामुळे वाहन चोरीला आपोआप आळा बसणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित वाहन परवान्यासह विविध कामांसाठी ऑनलाईन अर्ज भरताना नागरिकांना अनेकदा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) आपले सरकार हे सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे स्कॅन करून ती अपलोड करणे जमणार नाही. यांच्यासाठी या केंद्रांमध्ये नागरिकांना अशा विविध ऑनलाईन सेवा उपलब्ध असणार आहेत.

महाराष्ट्रामध्ये अशी सुमारे १६ हजार केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये ऑनलाईन अर्ज भरून कागदपत्रांचे स्कॅन केले जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार कागदपत्रे अपलोड केली जातील. आरटीओच्या संबंधित कामाचे शुल्क मात्र कार्यालयात भरावे लागणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली.

बहुउपयोगी प्रणाली
जानेवारी २०१७ पासून नाशिक आरटीओतील सर्व कार्यालयांमध्ये वाहन ४.० ही संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीने अनेक सेवा ऑनलाईन झाल्याने नागरिकांचे विनाकारण होणारे हेलपाटे टळत आहेत. यासह वाहन चोरीला या प्रणालीने लगाम लागत असल्याने नागरिकांचे लाखो रुपये वाचणार आहेत. यामुळे ही संगणक प्रणाली बहुउपयोगी ठरत आहे.
– राजेंद्र कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी

LEAVE A REPLY

*