काय घडलं आजच्या नाशिकमधील सुकाणू समितीत? जाणून घ्या एका क्लिकवर

0
नाशिक : आज नाशिकमध्ये शेतकरी संपाची दिशा ठरविण्यासाठी शेतकरी प्रतिनिधी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, रघुनाथ दादा पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक संघटन सोबत हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आज दुपारी एक वाजता नाशिकमधील तूपसाखरे लौन्स येथे बैठक पार पडली. या बैठकीचा घटनाक्रम असा होता.

गोल्फ क्लब येथील रेस्ट हाउस येथे शेतकरी प्रतिनिधी आणि आलेल्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सुकाणू समिती बैठकीत कोणी कोणी काय काय बोलायचं याबाबत नियोजन करण्यात आले. रेस्ट हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत ही नेतेमंडळी बसली होती. बाहेर त्यांचे कार्यकर्ते दरवाजा राखत होते.

कोणालाही आत प्रवेश नव्हता. त्यानंतर कॉंग्रेसचे भाई जगताप याठिकाणी आपल्या मोठ्या ताफ्यासह (कार्यकर्ते व पदाधिकारी) यांच्यासह आले. ते थेट बैठकीतील चाललेल्या चर्चेत सहभागी झाले. त्याच्या उपस्थितीत १२ तारखेचा तहसील कार्यालयावरील ठिय्या आणि १३ तारखेचा रेल रोको याबाबत सांगण्यात आले. कोणी कोणी बोलायचे कसे बोलायचे हे ठरविण्यात आले.

त्यानंतर सर्वांचा ताफा मुख्य बैठकीकडे आला. या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. छावणीतून मार्ग काढत कार्यकर्ते सुकाणू समितीच्या आवारात दाखल झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या नेत्यांचे मोठ्या घोषणांनी स्वागत केले.

स्टेजवर ही मंडळी बसली त्यात भाई जगतापदेखील होते. एक शेतकरी उठला त्याने प्रचंड गोंधळ घातला. त्यानंतर भाई जगताप यांना मोठा विरोध झाला. भाई जगताप शेतकार्यांमध्ये जाऊन बसले. सूत्रसंचालन सुरु असतांना एक मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणवून घेणाऱ्या कल्पना इनामदार नामक बाई स्टेजवर आल्या. मला दोन मिनिटे बोलू द्या अशा विनवण्या करू लागल्या. त्यानंतर त्यांनी माईक घेत थेट राजकीय नेते खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू यांचा शेतकरी आंदोलनातील सहभागी झाल्याबाबत आक्षेप घेतला. 

नाशिकमधील राजू देसले आणि इतर शेतकरी प्रतिनिधींनी माईक हिसकावत त्या बाईंना तेथुन जाण्यास सांगितले. पोलिसांनी घटनेची गांभीर्यता लक्षात घेत या बाईंना संरक्षण देत सुरक्षितपने बाहेर नेले.

त्यानंतर कार्यकर्त्यांनी या बाईंना भाजपने पाठवलेले पिल्लू होते असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पुढे, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील, बीजी कोळसेपाटील, बळीराजा संघटना, पुणतांबा येथील शेतकरी यांचे यावेळी भाषणे झाली.

आमदार बच्चू कडू यांच्या भाषणाला सुरुवात झाली. त्यांनी सांगितले जर सरकार तलवारी चालवेल तर आम्ही बॉम्ब फेकू, आम्ही रेल्वेच नाही तर विमानपण रोकु, पोलिसांनी कारवाई केली तर पोलीस महासंचालकांच्या घरावर मोर्चा काढू, आता गनिमी कावा करण्याची वेळ आली आहे, लढाई सुरु झाली आहे आता लढून यशस्वी करून दाखवू अशा अनेक फटकारांनी बच्चू कडू यांनी उपस्थितांची मने जिंकली.

आता वेळ आली राजू शेट्टींची. राजू शेट्टी स्टेजवर येताच घोषणाबाजी झाली. राजू शेट्टींनी सरकारवर तसेच स्वभिमानीचे मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर प्रचंड टीका केली. आंदोलनाचा आवाज दिल्लीपर्यंत जायला हवा असेही ते म्हणाले. तत्पूर्वी शेट्टी यांनी भाषणाला सुरुवात करताच माधवराव खंडेराव मोरे यांचे नाव घेतले आणि सुरुवात केली.

शेतकऱ्यामध्ये काही शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते त्यांनी यावेळी थोडासा गोंधळ घातला आणि शरद जोशींचे नावही घ्यावे असा आग्रह धरला होता. राजू शेट्टी यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत भाषणाच्या पुढच्या अध्यायाला सुरुवात केली.

याआधी सूत्रसंचालन करतांना मोठा गोंधळ याठिकाणी बघावयास मिळाला होता. एकजण कार्यक्रम आटोपण्याच्या पवित्र्यात होता तर एकजन शेतकरी संपाला पाठींबा दिलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींना आपले मनोगत करण्यासाठी जीव काढत होता. त्यामुळे सर्वांसमोर या दोघांमध्ये संघर्ष दिसून आला होता.

सर्वांची भाषणे संपली. शेतकरी घराकडे निघाले. वाहतूक थोड्याफार प्रमाणत कोंडीत अडकली होती. पण शेतकरी बिचारा उद्या मार्केटला आपला माल काढावा लागेल. गेल्या आठ दिवसांपासून माल काढलेला नाही. खरीपाची तयारी करावयाची आहे. याच विचारात घराकडे गेला.

सुकाणू समितीने सरकारला अल्टीमेटम दिले आहे. सरकारने चर्चा करायला बोलावले तर चर्चा करू असेही अनेक शेतकरी प्रतिनिधी सांगत आहेत. आता राजू शेट्टी सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. काय होईल हे सांगणे आता तरी शक्य नाही. पण येत्या सोमवार आणि मंगळवारी होणारा शेतकऱ्यांचा ठिय्या आणि रेलरोको शेतकऱ्यांची लढाई यशस्वी करेल की नाही याचे चित्र स्पष्ट करणार आहे.

LEAVE A REPLY

*