राज्यातील प्राध्यापकांचे आज मुंबईत जेलभरो आंदोलन

0
पुणतांबा (वार्ताहर) – महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या आदेशानुसार राज्यातील वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठीय प्राध्यापक आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज 4 सप्टेंबर रोजी मुंबई येथे दुपारी 12 ते 2 या कालावधीत आझाद मैदान येथे स्वत:ला अटक करवून घेऊन जेलभरो आंदोलन करणार असून आज काळा दिवस पाळणार आहेत, अशी माहिती प्राध्यापक संघटनेचे पदाधिकारी डॉ. तृप्ती मुखोपाध्याय, डॉ. एस. पी. लंवाडे, डॉ. मधू परांजपे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिल्याची माहिती प्राध्यापक संघटनेचे माजी जिल्हा सहसचिव डॉ. एस. आर. बरवळे यांनी दिली. 2015 पासून प्राध्यापकांच्या जागा भरण्यास बंदी केलेली आहे.

ती बंदी उठवावी, 1 मार्च ते 10 मे 2013 या कालावधीतील 71 दिवसांचा थकीत पगार तातडीने अदा करणे प्राध्यापकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी तक्रार निवारण समितीची स्थापना करणे, सातव्या वेतन आयोगाची तातडीने अंमलबजावणी करणे, नवीन पेन्शन योजना रद्द करणे, विना अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांना वेतन अदा करणे, कंत्राटी व तांत्रिक तत्त्वावरील शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम, समान वेतन निर्णयाची अंमलबजावणी करणे सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे इ. मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापकांनी सहा ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे.

20 व 27 ऑगस्ट रोजी पुणे येथे शिक्षण उपसंचालक व संचालक यांच्या कार्यालयासमोर प्राध्यापकांनी धरणे आंदोलन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. शासनाने अद्यापही या प्रश्नात लक्ष न घातल्यामुळे आज मुंबई येथे जेलभरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाला जाग आली नाही तर 5 सप्टेबर, 11 सप्टेबर व 15 सप्टेबर रोजी टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार असून या सर्व आंदोलनास सरकारने प्रतिसाद न दिल्यास 25 सप्टेबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई येथील जेलभरो आंदोलनास मोठ्या संख्येने प्राध्यापक सहभागी होणार असल्याचे डॉ. बखळे यांनी स्पष्ट केले.

 

LEAVE A REPLY

*