राज्यातील 40 हजार प्राध्यापकांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन

0

महाविद्यालये व विद्यापीठांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता

पुणतांबा (वार्ताहर) – राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील तसेच विद्यापीठीय शिक्षक आपल्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज 25 सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती प्राध्यापक महासंघाचे महासचिव डॉ. एस. पी. लवांडे, एस पुक्टोचे सरचिटाणिस प्रा. डॉ. के. पी. गिरमकर यांनी दिली आहे. प्राध्यापकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्राध्यापकांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मात्र प्राध्यापक महासंघाने मुंबई येथे 17 जून रोजी घेतलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

मागण्यांचे व आंदोलनाचे पत्रक 20 जून रोजी राज्य सरकारला दिले होते. शासनाकडून अद्यापही सकारात्मक प्रतिसाद नसल्यामुळे नाईलाजाने आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे चर्चेनुसार प्रश्न सुटू शकतात. मात्र, शासन चर्चेलाच तयार नाही. त्यामुळे राज्यातील 40 हजार प्राध्यापक 100 टक्के आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठे यांची कामे ठप्प होणार आहेत. त्यास शासन जबाबदार राहणार आहे. पुणे विद्यापीठाअंतर्गत 4500 प्राध्यापक व अहमदनगर जिल्ह्यातील 1150 प्राध्यापक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. सेवानिवृत्तीजवळ आलेल्या प्राध्यापकांनी सुध्दा सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. के.पी. गिरमकर व माजी सहसचिव प्रा. डॉ. बखळे यांनी केले आहे.

आज शिक्षण मंत्र्यांसमवेत बैठक
आज दुपारी 3 वाजता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत शिक्षक संघटना पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात काय निर्णय होतो यावर सर्वकाही अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

*