Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

राज्यात राष्ट्रपती राजवट, सेना ‘वेटिंग’वर

Share

मुंबई : जनतेने निवडून दिलेले राजकीय नेते सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरल्यानं, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या शिफारशीवर राष्ट्रपतींकडून स्वाक्षरी करण्यात आली आहे. राजभवनाकडून राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीचं पत्रक ट्विटरवर शेअर करण्यात आलं होतं. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने वेळ वाढवून मागितली होती. परंतु मुदतीत सत्ता स्थापनेचा दावा करण्यास राष्ट्रवादी असमर्थ असल्याचा निष्कर्ष काढत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. त्यावर अखेर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं.

मोदी ब्राझील दौर्‍यावर निघण्यापूर्वी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. त्या शिफारसीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केलीय. त्यामुळं सत्तास्थापन होईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असणार आहे.  राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याने या घटनेचा काँग़े्रस-राष्ट्रवादी, मनसे यांच्याकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री साडेआठ वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. मात्र दिलेला हा वेळ पुरेसा नाही असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. राज्यपाल हे भाजपचे बाहुले आहेत का?, असा सवाल त्यांनी केला आहे. इतर पक्षांना पुरेसा वेळ देण्यात आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला वेळ संपण्याची वाटही न पाहता राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे, हे खरे असेल तर त्यांची भूमिका त्यांच्या टोपीच्या रंगाला साजेशी ठरेल, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा  ‘तूर्तास’ निर्णय नाही

राज्यात तीन मोठे पक्ष सत्तास्थापन करू शकले नाहीत म्हणून सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यानंतर सत्तापेच सोडविण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे शरद पवारांना भेटण्यासाठी मुंबईत दाखल झाले. शरद पवार आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यामध्ये सखोल चर्चा झाली. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात आणखी चर्चा करणार आहेत. अद्यापही काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेला वेटिंगवर ठेवलं आहे. तूर्तास आघाडीनं शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतलेला नाही.  शिवसेनेनं पहिल्यांदाच 11 नोव्हेंबर रोजी अधिकृतरीत्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संपर्क केला होता. त्यामुळे सर्व विषयांवर चर्चा करणं गरजेचं होती. ती काल (दि. 12) झाली.

आणखी देखील चर्चा होणार आहे. दरम्यान, राज्यपालांनी आम्हाला चर्चा करण्यासाठी भरपुर वेळ दिला आहे, आम्हाला गडबड नाही असं मिश्किलपणे शरद पवार म्हणाले. पत्रकार परिषदेत अहमद पटेल म्हणाले, मी राष्ट्रपती राजवट लागू केल्याची निंदा करतो. सध्याच्या केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात मनमानी केली आहे. सध्या सरकारनं लोकशाहीची थटा केली आहे. राज्यपालांनी काँग्रेसला निमंत्रण दिलं नाही हे चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या मुंबई झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, केसी वेणुगोपाल यांच्या राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक तसेच काँग्रेसचे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते.

भाजपच्या शुभेच्छा स्वीकारल्या, आम्ही आघाडीसोबत जातोय : उद्धव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा शिवसेना आमदारांशी चर्चा करुन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा कायम असल्याचं सांगितलं. तसंच राज्यपालांवरही अप्रत्यक्ष टोलेबाजी केली. इतका दयाळू राज्यपाल पहिल्यांदाच पाहिल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. भाजपने शिवसेनेला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते आम्हाला मित्र मानत होते की नाही, माहीत नाही. पण आम्ही त्यांना मित्र मानत होतो, मानतो, त्यामुळे मित्रांनी आम्हाला शुभेच्छा दिल्याने आम्ही आघाडीसोबत नक्कीच जाऊ. मी काँग्रेस-राष्ट्रवादीला काही नवी सुरुवात करता येईल का हे विचारलं. त्याप्रमाणे आम्ही चर्चा करत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला जो वेळ दिला होता तो वेळ काल सायंकाळी संपणार होता. त्याआधीच राज्यपालांनी शिवसेनेला विचारणा केली. त्यात त्यांनी आमदारांच्या पाठिंब्याच्या सहीसह पत्र मागितलं. काँग्रेस-राष्ट्रवादीशी आम्ही काल संपर्क केला. त्याप्रमाणे काल राज्यपालांना देखील आम्ही दावा करताना पाठिंब्याचं पत्र दाखवण्यासाठी 48 तासांचा वेळ मागितला होता. राज्यपालांनी काल आम्हाला 7.30 पर्यंतची मुदत दिली. ती मुदत संपण्यापूर्वी म्हणजे भाजपला दिलेल्या वेळेतच आमच्या वेळेची मुदत देण्यात आली. त्या पत्रात आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्या हव्या होत्या. काल आम्ही पहिल्यांदाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संपर्क साधण्यात आला. आमचा मित्रपक्ष आम्ही भाजपपेक्षा आघाडीशी संपर्कात आहे असं म्हणत होता, त्यांना ते उत्तर होतं.

महाराष्ट्रासारखं राज्य चालवणं म्हणजे पोरखेळ नाही. म्हणून आम्ही आमच्यामध्ये स्पष्टता येण्यासाठी चर्चा सुरु केली. आम्ही राज्यपालांकडे 48 तास मागितले त्यांनी आम्हाला 6 महिने देतो म्हणून सांगितलं. इतका दयाळू राज्यपाल पहिल्यांदीच एखाद्या राज्याला मिळाला असेल.
जशी काँग्रेस-राष्ट्रवादीला काही मुद्द्यांवर स्पष्टता हवी, तशी शिवसेनेलाही काही मुद्द्यांवर स्पष्टता हवी आहे. आम्ही दोन विचारधारेचे पक्ष आहे. हे पक्ष एकत्र कसे येणार हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. याचं उत्तर सर्वांना लवकरच मिळेल. मात्र, मेहबुबा मुफ्ती आणि भाजप, नितीशकुमार-मोदी, चंद्रबाबू नायडू आणि मोदी हे कसे एकत्र येऊ शकतात याची माहिती मी मागितली आहे. त्यामुळे आम्ही वेगळे विचारधारा असलेले पक्ष एकत्र कसे येणार हे लवकरच सांगू.

भाजपसोबत जे ठरलं होतं त्यात अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत निश्चित निर्णय झाला होता. त्यांनी मला खोटं ठरवलं त्यामुळे माझा संताप झाला. मी असं ऐकलं की भाजपने जेव्हा सत्तास्थापन नकार दिला तेव्हा त्यांनी शिवसेनेला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते आम्हाला मित्र मानत होते की नाही, माहित नाही. पण आम्ही त्यांना मित्र मानतो, त्यामुळे मित्रांनी आम्हाला शुभेच्छा दिल्याने आम्ही आघाडीसोबत नक्कीच जाऊ.

भाजपशी संपर्क आहे. मात्र, प्रत्येकवेळी वेगळं ठरत असेल, तर त्याला काही अर्थ नाही. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करतो. मात्र, भाजप हिंदुत्व म्हणत खोटं बोलणार असेल तर ते योग्य नाही. मी अरविंद सावंत यांना धन्यवाद देतो. या कडवट शिवसैनिकाने शिवसेना पक्षप्रमुखांचा शब्द म्हणून तात्काळ राजीनामा दिला. असा शिवसैनिक असणं याचा मला अभिमान आहे.

मी काँग्रेस-राष्ट्रवादीला काही नवी सुरवात करता येईन का हे विचारलं. त्याप्रमाणे आम्ही चर्चा करत आहोत. राष्ट्रपती राजवटीविरोधात आम्ही याचिका केलेली नाही. आम्ही 48 तासांची मागणी केली, त्यांनी 6 महिने वेळ दिला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही याचिका करणार नाही. काँग्रस-राष्ट्रवादीने आम्ही काल पहिल्यांदा संपर्क केल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यावरुन भाजप जो आरोप करत होता की आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलायला वेळ आहे. पण आमच्याशी बोलण्यासाठी वेळ नाही, असं म्हणत होते. ते खोटं असल्याचं स्पष्ट होतं. राज्याला नवी दिशा देता येईन का यावर आम्ही चर्चा करत आहोत.आतापर्यंत आम्ही केवळ एकदा चर्चा केली, अजून भेटही झालेली नाही. आधी आम्हाला भेटू द्या. मग आम्ही ठरवू. भाजपचा पर्याय मी संपवलेला नाही, त्यांनी संपवला. लोकसभा निवडणुकीच्यावेळी ते सत्तेत येणार की नाही हे स्पष्ट नव्हतं तरी मी त्यांच्यासोबत गेलो. त्यावेळी युती करताना जे ठरलं होतं ते त्यांनी पाळलं नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतः आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही निर्णय घेऊ.

शिवसेनेकडून आव्हान; आज सुनावणी

महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा पेच सुटत नसल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला यासंबंधीचं पत्र पाठवलं आहे. सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत आज बुधवारी सुनावणी होणार आहे.  सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आवश्यक वेळ न दिल्यामुळे शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल हे शिवसेनेची बाजू मांडणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.

सेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे तीन दिवसांचा वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्याला नकार दिल्याने सेनेने त्यावरच आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, सत्तास्थापनेसाठी आपल्याला किमान 3 दिवस मिळायला हवेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. आजच ही सुनावणी घेण्याची मागणी देखील शिवसेनेने केलीये. सेनेकडून पक्षकार म्हणून अनिल परब यांनी याचिका दाखल केली आहे.

भाजपच सरकार स्थापन करणार, जे शक्य ते सर्व प्रयत्न करणार : राणे
भाजप सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला तसेच, सत्तास्थापनेसाठी जे काही करावं लागेल ते करेन, असंही राणे म्हणाले. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी सर्वांनाच कल्पना आहे. आज मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांनी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करु असं सांगितलं. आता आम्ही (भाजप) सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार आहोत. लवकरच भाजपचं सरकार स्थापन होईल, असा दावा नारायण राणे यांनी केला. तसेच, मी भाजपमध्ये आहे, सत्ता येण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेन असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुनगंटीवारांच्या उत्तराने राणेंची पंचाईत
सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी आणि राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकार स्थापनेचा नारायण राणेंचा दावा फेटाळला आहे. नारायण राणे यांचं सरकार स्थापनेविषयीचं मत त्यांचं व्यक्तिगत आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंचा आमदारांसोबत हॉटेल द रिट्रीटमध्येच मुक्काम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रिट्रीट हॉटेलमधून मातोश्रीकडे निघाले, आदित्य ठाकरे आज आमदारांसोबत हॉटेल द रिट्रीटमध्येच मुक्काम केला.

लवकरच सत्तेचे नवे समीकरण : छगन भुजबळ
बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, त्यांच्याशी शरद पवार आणि अहमद पटेल बोलले आहेत, जी बैठक झाली त्या संदर्भात माहिती देण्यात आली. लवकरच यावर तोडगा निघून सत्तेचे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल असे छगन भुजबळ म्हणाले.

जनादेशाच्या अनादरामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली – मुनगंटीवार
जनादेश असल्यामुळे लवकर सरकार स्थापन व्हावे ही इच्छा होती. आम्ही कुठल्याही पर्यायाचा शोध घेतला नाही.पण आमच्या मित्रपक्षानं इतर पर्याय असल्याचं म्हटलं आहे, असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. कोअर कमिटीची बैठक झाली, भाजप राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आज राष्ट्रपती शासन लागू झालं. काही राजकीय पक्षांनी जनादेशाचा आदर केला. शेतकरी संकटात आहे, अनेक समस्या आहे, जनादेशाच्या अनादरामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली असेही ते म्हणाले.

काँग्रेस नेता आज मांडणार शिवसेनेची बाजू !
सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आवश्यक वेळ न दिल्यामुळे शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात येणार असून न्यायमूर्ती शरद बोबडे ही सुनावणी घेणार आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल हे शिवसेनेची बाजू मांडणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात तिसर्‍यांदा राष्ट्रपती राजवट
महाराष्ट्रात तिसर्‍यांदा राष्ट्रपती राजवट लागली आहे. राज्यात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला होता. भाजप – शिवसेना युतीत चर्चा न झाल्याने भाजपने सत्ता स्थापन करणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर शिवसेनेला विचारणा करण्यात आली. मात्र, संख्याबळ न झाल्याने शिवसेनेला अपयश आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण राज्यपाल यांनी दिले. त्यांना आज रात्री 8.30 वाजण्याची वेळ दिली होती. त्याआधीच संध्याकाळी राज्यपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे राज्यात ही तिसर्‍यांना राष्ट्रपती राजवट लागली आहे.

राष्ट्रवादीला वेळ दिली असताना दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र राज्यातील राजकीय परिस्थिचा अंदाज आणि राष्ट्रपती लागू करण्याचा प्रस्ताव दिल्लीत पाठवला होता. राज्यपालांनी मात्र ट्विट करून मराष्ट्रपती राजवटीची शिफारस सूचित करणारे पत्र पाठवण्यात आल्याचेफ स्पष्ट केले होते. राज्यपालांनी घटनेच्या कलम 356 नुसार केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर केला अशी माहिती राजभवनाने दिली. राज्यपालांनी घटनेच्या कलम 356 नुसार अहवाल सादर केला होता.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत राष्ट्रपतींनी राज्यपालांच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. याआधी 1980 मध्ये राष्ट्रपती राजवट लागली होती. त्यानंतर 2014 आणि आता 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!