राज्य सरकारच्या कुटील धोरणाविरोधात संघर्ष करणार : ढाकणे

0

ग्रामसेवक युनियनच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) –पंचायत राज अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र सरकारचा देशपातळीवर नेहमीच गौरव होत असतो. ग्रामीण भागातील योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या देशपातळीवर होणार्‍या कौतुकात ग्रामसेवकांचा सिंहाचा वाटा आहे. परंतु, राज्य सरकार ग्रामसेवकांचे महत्त्वाचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारच्या या कुटील धोरणाविरोधात आगामी काळात तीव्र संघर्ष करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिला.

राज्य ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकारिणीस मार्गदर्शन करताना श्री.ढाकणे बोलत होते. या बैठकीस जि.प.कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, राज्य सरचिटणीस अशोक थूल या विशेष अतिथींसह ग्रामसेवक युनियनचे राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, कार्याध्यक्ष नंदकुमार वानखेडे, मानद अध्यक्ष हनुमंत मुरूडकर, उपाध्यक्ष उध्दव फडतारे, कोषाध्यक्ष बापूसाहेब अहिरे आदी उपस्थित होते.

या बैठकीत ग्रामसेवकांचे प्रलंबित प्रश्‍न, आतापर्यंत केलेली आंदोलने, संघटनेची भविष्यातील ध्येयधोरणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. राज्याध्यक्ष ढाकणे पुढे म्हणाले की, राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करताना ग्रामसेवकांना अच्छे दिन यावे यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. ग्रामसेवकांच्या कंत्राटी सेवा तात्काळ नियमित कराव्यात, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, पदोन्नती, रिक्त पदांची भरती, मेडिक्लेम, अपघाती विमा संरक्षण लू करणे, जोखीम भत्ता मिळावा आदी मागण्यांसाठी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे.

राज्यभरातील ग्रामसेवक एकजुटीने आपल्या न्याय मागण्यांसाठी लढा देत असून भविष्यात हा लढा आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
जि.प.कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष चिलबुले म्हणाले की, जिल्हा परिषद संवर्गातील 17 संघटनांचा मिळून महासंघ कार्यरत आहे. महासंघातर्फे राज्य सरकारच्या कंत्राटीकरणाच्या धोरणाला तीव्र विरोध करण्यात येत आहे.

कंत्राटी सेवेत असलेल्यांना किमान 18 हजार रुपये वेतन मिळावे तसेच कोणतीही पदे कंत्राटी पध्दतीने न भरता कायमस्वरुपी भरावीत. राज्य सरकारची अनेक धोरणे कर्मचार्‍यांना वेठबिगार ठरविणारी आहेत. या विरोधात महासंघ राज्यस्तरावर आंदोलन उभारणार असून यात ग्रामसेवक युनियनचे सहकार्य अतिशय मोलाचे असणार आहे.

ग्रामसेवक युनियनचे राज्य सरचिटणीस जामोदे म्हणाले की, राज्य कार्यकारिणीच्या या बैठकीत ग्रामसेवकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा होवून आगामी काळातील वाटचालीचा उहापोह करण्यात आला. ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

या बैठकीस संघटनेचे भगवान भोसले, एन.डी.कदम, संजय पाटील, विलास खोब्रागडे, बबनराव कोल्हे, महिपती बेनके, साहेबलाल तांबोळी, चाँद कुरेशी, मनोहर चांदूरकर, नारायण पवार, शरद भुजबळ, रश्मी शिंदे, मिनाक्षी बनसोड, नंदा कांगणे, दीपाली उगलमुगले, जयश्री चितळे, श्रध्दा वाळूंज, शुभांगी म्हस्के, संजीवनी निकम, विठ्ठलराव चव्हाण, देवेंद्र बर्डे, मनोहर कुमरे, संजय पालवे, संदीप ठवाळ, पुंडलिक म्हस्के आदींसह राज्यातील ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस तसेच वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*