शिवछत्रपतींनी  दाखविलेल्या मार्गानेच राज्याचा कारभार चालेल – मुख्यमंत्री ठाकरे

शिवछत्रपतींनी  दाखविलेल्या मार्गानेच राज्याचा कारभार चालेल – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई | प्रतिनिधी

सामान्य रयतेच्या कल्याणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषित, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्राचा कारभार चालेल, असा विश्वास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज  पुणे जिल्ह्यातील दौ-यात व्यक्त केला.

किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यानंतर “शिवकुंज” सभागृहातील राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर ते बोलत होते.

यावेळी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, आमदार अतुल बेनके,  माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, माजी आमदार शरद सोनवणे,  जुन्नरच्या उपनगराध्यक्षा अलका फुलपगार, जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुश आमले, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री  म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर  मुंबईच्या बाहेर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. या शिवजन्मभूमीत राजमाता जिजाऊ आणि शिवछत्रपती यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांना अपेक्षित असणारे रयतेचे राज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

सामान्य रयतेला दिलासा देणारे, त्यांना न्याय देणारे कामच या ठिकाणी केले जाणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही मोठी जबाबदारी असून सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवू या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  शिवजन्म स्थळी दर्शनाला जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  जमिनीवरील माती उचलून कपाळी लावली. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, शिवप्रेमी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com