Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

राज्यातील कारखान्यांना गळीत हंगाम सुरू करण्यासाठी 25 नोव्हेंबरपासून परवानगी द्या

Share

साखर आयुक्तालयाचा प्रधान सचिवांकडे प्रस्ताव

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- राज्यातील साखर कारखान्यांचा 2019-20 चा गळीत हंगाम दिनांक 25 नोव्हेंबर पासून सुरु करावा या मागणीचा प्रस्ताव साखर आयुक्तालयाने सहकार विभागाचे प्रधान सचिवांकडे पाठविला आहे. प्रधान सचिव (सहकार) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांना साखर आयुक्तालयाने सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या आगामी बैठकी करिता दिनांक व वेळ मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

तथापि निवडणुकामुळे ही बैठक यापूर्वी होवू शकली नाही. मध्यंतरीच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे देखील गाळप हंगाम सुरू होण्यास विलंब होत आहे. गळीत हंगाम नक्की केव्हा सुरू करावा याबाबत वेगवेगळ्या संस्थांकडून, कारखान्यांकडून देखील अभिप्राय विचारात घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने गळीत हंगाम 1 डिसेंबर 2019 पासून सुरू करावा अशी मागणी केली आहे.
खाजगी साखर कारखान्यांचे नेतृत्व करणार्‍या विस्मा संघटनेने गाळप हंगाम दिनांक 1 नोव्हेंबर 2019 पासून सुरु करावा अशी मागणी केली होती. तथापि त्यानंतर अवकाळी पाऊस झाल्यामुळे ही मागणी वस्तुस्थितीला धरून नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने गाळप हंगाम केव्हा सुरु करावा याबाबत अभिप्राय दिले नाहीत. राज्यातील काही साखर कारखान्यांनीही गळीत हंगाम सुरु करण्यासाठी अवगत केले आहे. कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंबड यांनी 1 डिसेंबर पासून, आदिवासी सहकारी साखर कारखान्याने 15 नोव्हेंबरपासून, इको केन शुगर एनर्जी कारखान्याने 20 ऑक्टोबर, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना पुणे यांनी दि.1 नोव्हेंबर पासून, विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नर, जि. पुणे यांनी दि.1 नोव्हेंबर पासून, सदाशिवराव मंडलीक कागल, तालुका सहकारी साखर कारखाना लि., सदाशिवनगर यांनी दि.15 नोव्हेंबर पासून गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी सूचना साखर आयुक्तालयाकडे केली होती.

हंगाम नेमका कधी पासून सुरू या तारखे बाबद राज्यातील साखर कारखान्यांमध्ये मतभिन्नता होती. त्यातच मंत्री समितीची बैठक होत नसल्याने पेच निर्माण झालेला आहे. त्यातच कर्नाटक राज्याचा गळीत हंगाम सुरु झाला असल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस कर्नाटक मध्ये जाण्याची भीती व्यक्त करुन हे कारखाने 25 नोव्हेंबर 2019 च्या आसपास सुरु करावेत अशी मागणी कारखान्यांनी केली आहे.

मराठवाड्यातील कारखान्यांनी गळीत हंगाम फार अल्प कालावधीसाठी 70 ते 90 दिवस टिकणार असल्यामुळे व यावर्षी मराठवाड्यात अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे देखल गळीत हंगाम 1 डिसेंबर 2019 च्या आसपास सुरु करावा अशी मागणी केली आहे.

असा आहे साखर आयुक्तालयाचा प्रस्ताव
सर्व साखर कारखान्याचे अभिप्राय विचारात घेता सन 2019-20 चा गळीत हंगाम दिनांक 25 नोव्हेंबर 2019 पासून सुरु करावा असा साखर आयुक्तालयाचा प्रस्ताव आहे. सर्वसाधारणपणे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीमध्ये दरवर्षी गळीत हंगाम कोणत्या तारखेपासून सुरु करावा याचा निर्णय होत असतो. गळीत हंगामाची ही प्रस्तावीत तारीख विचारात घेता व आज रोजी मंत्रीमंडळ अस्तित्वात नसल्यामुळे मंत्री समितीची बैठक होण्यास विलंब लागण्याची शक्यता वाटते. अशा परिस्थितीत सदर प्रस्ताव मुख्यमंत्री यांचेकडे पाठविण्यात यावी व गळीत हंगाम दिनांक 25 नोव्हेंबर 2019 पासून सुरु करण्यास परवानगी द्यावी असा प्रस्ताव राज्याचे साखर आयुक्तांनी सहकार विभागाचे प्रधान सचिवांकडे पाठविला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!