Saturday, April 27, 2024
Homeनगर‘एक होता बांबुकाका’ नंबर वन, ‘मोमोज’ही अंतिम फेरीत

‘एक होता बांबुकाका’ नंबर वन, ‘मोमोज’ही अंतिम फेरीत

राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल । ‘रात संपता संपेना’ तृतीय । दिग्दर्शनात देशमुख, लोटकेंची बाजी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत नगरच्या केंद्रावर रंगकर्मी प्रतिष्ठानच्या ‘एक होता बांबूकाकाने’ नंबर वन होण्याचा मान मिळविला. अहमदनगर जिल्हा हौशी नाट्य संघाने सादर केलेल्या ‘मोमोज’ व घोडेगाव येथील समर्थ युवा प्रतिष्ठानच्या ‘रात संपता संपेना’ या नाटकाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. नगर केंद्रातून ‘एक होता बांबुकाका’ व ‘मोमोज’ या दोन नाटकांची नाशिक विभागाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली.

- Advertisement -

विनोदी आणि तितकीच भावूक व्यक्तीरेखा असलेल्या ‘बांबुकाका’ने प्रेक्षकांना चांगलेच हसविले होते. ‘मोमोज’ या नाट्यकृतीने मोबाईलमधील जीवघेण्या गेम्सचा मुलांवर होणार्‍या परिणामांची दाहकता दर्शविली होती, तर ‘रात संपता संपेना’ (संदीप येळवंडे दिग्दर्शित) या नाट्याने शेतकर्‍यांच्या स्थितीचे धगधगते वास्तव मांडले होते.

अन्य निकाल पुढीलप्रमाणे. दिग्दर्शन – शैलेश देशमुख (प्रथम, ‘एक होता बांबुकाका’), उर्मिला लोटके (द्वितीय, ‘मोमोज’) प्रकाश योजना – मुन्ना सय्यद (प्रथम, ‘एक होता बांबुकाका’), रवी रहाणे (द्वितीय, ‘अमन या शांती’). नेपथ्य – अनंत रिसे (प्रथम, ‘दास्ताँ’), संभाजी पिसे (द्वितीय, ‘शापित माणसांचे गुपित’. रंगभूषा – नाना मोरे (प्रथम, ‘अमन या शांती’), ज्योती कराळे (द्वितीय, ‘शापित माणसांचे गुपित’)
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक – राहुल सुराणा (‘एक होता बांबुकाका’) व रेणुका भिसे (‘शापित माणसांचे गुपित’).

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र (महिला) – प्राजक्ता प्रभाकर (‘अमन या शांती’), पूर्वा खताळ (‘लहान माझी बाहुली’), आम्रपाली गायकवाड (‘मलिका’), दिव्या पाटील (‘रात संपता संपेना’) व रविना सुगंधी (‘दास्ताँ’). पुरूष – श्रेणिक शिंगवी (‘दास्ताँ’), सुरेश चौधरी (‘रात संपता संपेना’), नवनाथ वाबळे (‘शेवंता जित्ती हाय’), श्रीराम गोरे (‘अमन या शांती’) व मार्दव लोटके (‘मोमोज’).

अतिशय उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण 17 नाटके सादर करण्यात आली. शहराबरोबरच ग्रामीण भागातील नाटकांनीही रंगमंचावर चांगलीच धमाल उडवून दिली. अनुभवी, कसदार कलाकारांसह अनेक नवख्या हौशी कलाकारांनीही आपला अभिनय रंगमंचावर सादर केला. स्पर्धेचे परीक्षण रामदास तांबे, श्रीकांत सागर व पी. एन. कुंदा यांनी केले.

समन्वयक सागर मेहेत्रे, सहसमन्वयक जालिंदर शिंदे यांनी सहकार्‍यांच्या मदतीने स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले होते. त्यांना माऊली सभागृहाचे कर्मचारी यशवंत शिंदे व मयूर पाटील यांनी चांगले सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या