Type to search

maharashtra सार्वमत

हव्यासाच्या विकृतीचं ‘प्यादं’

Share

राज्य नाट्य स्पर्धा

संदीप जाधव

पत, प्रसिध्दी आणि पैसा यांच्या हव्यासापोटी वाट्टेल ते करणार्‍या महाभागांची संख्या समाजात वाढत चाललीय. दूरचित्रवाणीवर सध्या रिअ‍ॅलिटी शोचे पेव फुटलेय. गडगंज आर्थिक फायदा आणि प्रसिध्दी त्यास कारणीभूत आहे. अशा लोभास बळी पडणारे अनेकदा कौटुंबिक सुखापासून वंचित राहतात. असाच एक सुप्रसिध्द डायरेक्टर उकिरड्यावर सापडलेले बाळ दत्तक घेतो. त्याला 24 वर्षे सलग रिअ‍ॅलिटी शोमध्ये अडकवून प्रसिद्धी मिळवत विश्‍वविक्रमाचा बेत आखतो. मात्र, त्याचा हा अनोखा खेळ अंतिम टप्प्यात असतानाच सगळी स्थिती कशी बदलते याचे रहस्यमयी चित्रण सोमवारी राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या ‘प्यादं’ या नाट्यकृतीत प्रेक्षकांनी अनुभवले. भिंगार येथील स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळाने प्रस्तूत केलेल्या या दोन अंकी नाटकाचे लेखन केले आहे अनिकेत जोशी आणि रुचिता सूर्यवंशी यांनी, तर संहितेस रंगमंचावर खुबीने उतरविण्याचा प्रयत्न केला आहे दिग्दर्शक किशोर पराते आणि अभय रायकवाड यांनी.रिअ‍ॅलिटी शो करणार्‍या व पाहणार्‍यांनाही या नाटकाने चांगलीच चपराक दिली आहे.
समाजात वाढत चाललेली ही प्रवृत्ती वेळीच बदलली नाही तर त्याचे दूरगामी परिणाम होतील, असा संदेश या नाट्यात देण्यात आला आहे. काही अनुभवी कलाकारांसोबतच नवख्यांनी केलेली अभिनय अदाकारी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. पडदा उघडताच एका कीर्तनकाराचे तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन चालू असते. पित्याची पहती कशी महत्त्वाची असते हे सांगून कीर्तनकार समारोप करतात. मात्र ते ऐकून श्रोत्यांमधील ज्ञाना हा तरुण भान हरवून बसतो. त्याला वडिलांची आठवण सतावते. वडिलांचा आपल्या हट्टामुळेच नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या अपराधी भावनेने तो व्याकूळ होतो. तेव्हापासून तो नदीपल्याड जाण्याची इच्छा मनी बाळगून असतो. मात्र त्याचे सारे विश्‍व नदीने वेढलेल्या गावातच असते. येथेच त्याला मिळालेले मित्र पंढर्‍या, पक्या, प्रियसी आलकी, म्हातारबा, आई हे सर्वच आपली भूमिका हेतूपुरस्सार बजावत असतात. नंतर ते सगळेच संशयास्पदपणे वागू लागतात. त्याला वडिलांची आठवण आली की तो नदीकडे जायचा. मात्र तेथे जाण्यास सर्वच जण त्याला विरोध करायचे.

एके दिवशी मित्र पंढर्‍याने त्याला नदीवर नेले नि नदी पार करून पळून जाण्याचे सांगितले. आपल्यामागे ज्ञाना येईल या आशेने त्याने नदीत उडी टाकली खरी, पण तोच नदीत वाहत गेला. मित्र वाहून गेल्याच्या दुुःखाने त्याला ग्रासते. नाट्यात सन्पेन्स निर्माण होऊन पहिला अंक संपतो. या अंकातील अनेक दृश्यांतील अभिनय कलाकारांनी चांगला केला. मात्र काही प्रसंग रेंगाळले. दुसर्‍या अंकात मात्र नाटकाने चांगलीच गती घेतली. भिंगार लाईव्ह या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी डायरेक्टर नितीन सरदेसाईंची मुलाखत घेण्यासाठी त्या गावात येतात तेव्हा मात्र रिअ‍ॅलिटी शोचा सगळा उलगडा होतो. याबाबत ज्ञानाची आई प्रिन्सला सांगते. डायरेक्टर पतीच्या स्वार्थापोटी कौटुबिक समाधान हरपल्याने व्यतिथ झाल्याचे प्रिन्सला सांगते. हे सर्व ज्ञानाला समजते. सर्व प्रकार त्याला उमगतो.

ज्ञाना हा डायरेक्टर नितीन सरदेसाई यांना कचराकुंडीवर सापडलेला असतो. त्याला कायदेशीरपणे दत्तक घेऊन त्याच्यासोबत 24 वर्षांपासून दीर्घ ‘रिअ‍ॅलिटी शो’चा खेळ खेळला जात होता. या शोचा विश्‍वविक्रम होणार असतो. त्याच्याभोवतालची सर्वच पात्रे पैशासाठी रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम करीत होती. ज्ञाना हा सर्वांचं ‘प्यादं’ बनलेला असतो. बेमालूमपणे ज्ञानाचीही सही कॉन्ट्रॅक्टवर घेतलेली असते. संतापलेला ज्ञाना आईला व सरदेसाईंसह सर्वांनाच त्याचा जाब विचारतो. सारेच निरूत्तर होतात. मग तो निघून जातो. नंतर तो नदीत बुडाल्याची माहितीही मिळते. ते ऐकून अस्वस्थ झालेला त्याचा मित्र पंढर्‍या (तो नदीत न बुडता वाचलेला असतो) सर्वांनाच फैलावर घेतो. रिअ‍ॅलिटी शोचा बाजार कसा घातकी आहे याचे बाळकडू सर्वांनाच पाजतो. डायरेक्टर सर्व पॅकअप करतो. शेवटच्या प्रसंगात ज्ञाना नदीतून बाहेर येतो नि आता तो ‘प्यादं’ न राहता स्वतंत्रपणे आपली वाटचाल करू लागतो. वास्तववादी परिस्थितीसंदर्भात प्रबोधनात्मक संदेश देण्यात ‘प्यादं’ नक्कीच यशस्वी झाले. दिग्दर्शक किशोर पराते आणि अभय रायकवाड यांनी उभं केलेलं ‘प्यादं’ प्रेक्षकांना चांगलंच भावलं.

शीर्षकाला समर्पक ठरवत ‘प्यादं’ झालेल्या ज्ञानाला दिवाकर गोसावी यांनी अभिनयाच्या जोरावर चांगलेच रंगवले, रडवले. नैसर्गिक हावभावास त्यांची बॉडी लँग्वेज पूरक ठरली. ज्ञानाची आई आणि डायरेक्टर सरदेसाईंची पत्नी माधुरी ही दुहेरी भूमिका विद्या जोशी यांनी सहजपणे हाताळली. त्यांच्या चेहर्‍यावरील भाव अनेकदा संवाद साधत होते. फ्लॅश बॅकमधील बा अभय रायकवाड हे छान अभिनय करत पाण्यात बुडाले! छोटा हट्टी ज्ञाना अश्‍विन पराते यांनी रंगमंचावर आणला. पंढर्‍या व प्रणव या भूमिका सचिन पोटे यांनी केल्या. उत्तरार्धात प्रणवने प्रेक्षकांसमोर मांडलेला अभिनययुक्त विचार प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यात पोटे कमी पडले नाहीत. पक्या-प्रिन्सला अथर्व धर्माधिकारी यांनी सादर केले. प्रेयसी आलकीला रोमँटिकपणे शीतल धोंगडे यांनी साकारले. ज्ञानाला प्रेमाचा अर्थ सांगताना त्यांनी अनेक वाक्ये रिपिट केली. कीर्तनकार राजश्री कडलग यांनी सलग कीर्तन करत रंगमंचावरच्या प्रेक्षकांबरोबरच खर्‍याखुर्‍या प्रेक्षकांनाही खिळवून ठेवले. किरकोळ अडखळ सोडता त्यांचे पाठांतर चांगले होते. केतकी (वेदश्री मुळे), निलेश (रोहन रायकवाड) व सत्या (तन्मय बनकर) यांनीही चांगली साथ दिली. म्हातारबा व डायरेक्टर नितीन सरदेसाई यांना परिपक्व किशोर पराते यांनी उत्तमरित्या वठवले.

नेटकेच असलेले नेपथ्य प्रेमराज पराते आणि अमृता रायकवाड यांनी साकारले. ज्ञानाच्या घराला केवळ पडदा होता. घरात आणखी चीजवस्तूंची उपस्थिती प्रभावी ठरली असती. सुरुवातीपासूनच नाटकाचे संगीत प्रसंगांत जान आणत होते. पाण्यात दगड टाकल्यानंतर येणारा ‘डुबूक’ आवाज नैसर्गिक वाटत होता. संगीताची लय शेवटपर्यंत टिकून ठेवण्यात प्रवीण तांबे यांनी चांगला प्रयत्न केला. एका प्रसंगात मात्र संगीत संवादाला अडथळा ठरले. सुमीत मिरपगार यांनी केलेली प्रकाशयोजना बरेच काही सांगून जात होती. नदीतील पाण्याच्या लहरी लाईटस्द्वारे पडद्यावर खुबीने दाखवण्यात ते माहीर असल्याचे दिसले. मात्र वडील बुडाल्याच्या प्रसंगात व्याकूळ ज्ञानावर उशिरा स्पॉट आला. पार्श्‍वगायक शीतल धोंगडे यांचा आवाज सुमधूर होता. रंगभूषा विद्या जोशी यांनी, तर वेशभूषा मनिषा पराते यांनी उत्तम करण्याचा प्रयत्न केला. किरकोळ अडखळते प्रसंग, विंगेत जाण्यापूर्वीच लाईटस् ऑन होण्याच्या चुकाही घडल्या. तसेच पहिल्या प्रसंगातील आलेले चहाचे कप बराच वेळ रंगमंचावर होते. शेवटच्या प्रसंगात विंगीतून रंगमंचावर फेकलेली शाल सर्वांनी पाहिली. नाटकात प्रथमच भूमिका करणार्‍या कलाकारांनी चांगली तयारी केल्याचे दिसले. अनाठायी स्वार्थापोटी दुसर्‍यांना ‘प्यादं’ करून कालांतराने स्वतःचेच नुकसान होते हे या नाट्याने सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!