सेना-भाजपाचा कलगीतुरा म्हणजे बिनपैशाचा तमाशा : तटकरे

0
शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिवसेना व भाजप हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. त्यांचा हा चाललेला कलगीतुरा म्हणजे बिनपैशाचा तमाशा असल्याची टीका राष्ट्वादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी शिर्डीत येऊन साईसमाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी आ.जयंत जाधव, पतिंगराव शेळके, सुधाकर शिंदे, सुधीर म्हस्के, महेंद्र शेळके, राकेश कोते, नंदकुमार सदाफळ, अलका कोते, अमित शेळके, दीपक गोंदकर, विशाल भडांगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले की, राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांत करोडो रूपये जाहीरातीवर खर्च करून मी लाभार्थी अशा खोट्या जाहिराती करून राज्यातील जनतेची दिशाभूल केली आहे.
89 लाख शेतकर्‍यांना 34 हजार कोटी रुपयांची छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान प्रामाणिक कर्जमाफी योजना असे सरकारने म्हटले होते. आता आम्ही या योजनेच्या नावात बदल करून प्रामाणिक ऐवजी अप्रामाणिक खोटारडी केलेली योजना असे संबोधणार आहोत.
कर्जमाफीची साडे सहा हजार कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झालेले असल्याचा दावा सरकार करत आहे मात्र वास्तविक पाहता नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली आदीसह मध्यवर्ती बँका शेतकर्‍यांना पीककर्ज देतात. या बँकामधून एक शंभराअंश इतके सुध्दा पैसे जमा झालेले नाहीत. शेतकर्‍यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाला दीडपट हमी भाव दिला जाणार होता तो दिला गेला नाही. किमान आधारभूत किंमतीवर खरेदी केंद्र सुरू केलेली नाहीत अथवा त्या केंद्राचा शेतकर्‍यांना फायदा झालेला नाही.
नोटाबंदी व जीएसटीच्या माध्यमातून 2 कोटी बेरोजगारी निर्माण झालेली आहे. त्यामुळे राज्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आलेले आहे. महिला, बालके, वृध्दांवर प्रशासन अन्याय अत्याचार करू पाहत आहेत. त्यामुळे राज्यात कुठेही कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. 90 टक्के शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला असे राज्यसरकार सांगत असेल तर सरकारने श्‍वेत पत्रिका जाहीर करावी.
देश आणि राज्य सरकार पुरोगामी विचारांचे राहिलेले नाहीत. गेल्या तीन वर्षात भाजप नेत्यांची वक्तव्य, विधाने आक्षेपार्ह राहीलेली आहेत. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे.
गुजरातमध्ये राहूल गांधींच्या सभेला चांगलाच प्रतिसाद मिळाला असल्याने भाजपाचे दिग्गज नेते तळ ठोकून आहेत. त्यामुळे यंदा गुजरातमध्ये सत्ताधारी पक्षाची दमछाक होणार आहे. शिवसेनाला सावरण्यासाठी भाजपाने दोन पावले मागे घेत नारायण राणेंचे तिकीट कापले असे तटकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

*