एसटीला 58 लाखांचे उत्पन्न; तिसर्‍या श्रावणी सोमवारची कमाई; फेर्‍यांत घट

0
नाशिक । तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वला ब्रह्मगिरी फेरीसाठी गेलेल्या भाविकांमुळे एसटीच्या तिजोरीत 58 लाख रुपयांची भर पडली आहे. एसटीने सुमारे पावणे पाच हजार फेर्‍यांंतून प्रवासी भाविकांची वाहतूक करून उत्पन्न कमावले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत 16 फेर्‍यांची घट झाली आहे.

तिसर्‍या श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणेसाठी जाणार्‍या भाविकांंची होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटीने 300 जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले होते. नाशिकरोड, निमाणी आणि मेळा बसस्थानक परिसरातून एसटीने रविवारी दुपारपासून जादा गाड्या सोडल्या होत्या.

नाशिकरोडहून 150 तर निमाणी आणि मेळा बसस्थानकाहून 150 गाड्यांंच्या फेर्‍या सुरू करण्यात आल्या होत्या. फेरीसाठी त्र्यंंबकेश्वरला जाणार्‍या आणि फेरीनंतर तेथून परतणार्‍या शिवभक्तांमुळे एसटीच्या फेर्‍यांना प्रवासी मिळत होते. त्यामुळे 300 बसगाड्यांनी दोन दिवसांत सुमारे 4 हजार 734 फेर्‍या करून प्रवासी वाहतूक केली. गेल्या वर्षी एसटीने 56 लाख 422 रुपयांचे उत्पन्न कमावले होते.

सोमवारी मध्यरात्री आणि सकाळी गाड्यांना मोठी गर्दी होती. नाशिकहून नाशिकरोडसह निमाणी आणि मेळा बसस्थानकांवर बाहेरगावाहून येणार्‍या शिवभक्तांची गर्दी अधिक होती. त्यामुळे एसटीला प्रवासी अधिक मिळत होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वरला दर्शनाला जाणार्‍या भाविकांची गर्दी चांगली होती. मात्र दुपारनंतर नाशिकला वर्दळ घटली होती. त्यामुळे एसटीची प्रवासी वाहतूकही रेंगाळली होती.

एसटी महामंडळ, त्र्यंबक नगरपालिका आणि मनपाने तिसर्‍या श्रावणी सोमवारचे नियोजन केले होते. लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सोई-सुविधा देण्यात आल्या होत्या. शहरात टिळकपथ आणि शिवाजीरोडवर वाहतूक वळवण्यात आली होती.

बसस्थानकावर अधिक बॅरिकेड करून भाविकांच्या गर्दीला नियंत्रित करण्यात आलेे होते. तसेच काही क्षणात गाड्या सोडण्याचे नियोजन एसटीकडून करण्यात आलेले होते.

LEAVE A REPLY

*