Thursday, April 25, 2024
Homeनाशिकएसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी खर्चात कपात!; महामंडळाची 23 डिसेंबरला आढावा बैठक

एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी खर्चात कपात!; महामंडळाची 23 डिसेंबरला आढावा बैठक

नाशिक । प्रतिनिधी

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट असून ती सुधारण्यासाठी, खर्चात कपात व उत्पन्नवाढीसाठी एक आढावा बैठक एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून घेण्यात येणार आहे. पुण्यात 23 डिसेंबरला होणार्‍या या बैठकीचे पत्रक काढताना आर्थिक स्थिती बिकट असल्याची कबुली महामंडळाने दिली आहे.

- Advertisement -

या बैठकीला राज्यातील सर्व विभागांचे विभाग नियंत्रक, वित्तीय सल्लागार व मुख्यलेखा अधिकारी, उपमहाव्यवस्थापक (प्रशिक्षण) यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. एसटी महामंडळाला होणारा नफा व तोटा, भारमान, उत्पन्नवाढीसाठी केलेल्या उपाययोजना व उत्पन्न घसरणीची कारणमीमांसा, खर्चात कपात करण्यासाठी उपाय, प्रवाशांनी केलेल्या विविध प्रकारच्या तक्रारी, वातानुकूलित आणि विनावाहक सेवांचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाचे 250 पैकी 180 आगार तोट्यात आहेत. गेल्या दोन महिन्यांत आगारातील कर्मचार्‍यांचे वेतन अंशत: दिले जात आहे. त्यातच गेल्या वर्षी एसटीचा 4 हजार 549 कोटी रुपये असलेला संचित तोटा पाच हजार कोटींपर्यंत वाढण्याची भीतीही महामंडळाकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्ताने पुण्यात ही बैठक घेतली जाणार आहे. दरम्यान, ही बैठक पार पडल्यावर महामंडळात काय बदल होतात व नफा किती वाढतो हे येत्या काही महिन्यात दिसणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या