Friday, May 3, 2024
Homeनगर85 टक्के एसटीच्या बसेस आगारातच

85 टक्के एसटीच्या बसेस आगारातच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांनी केलेल्या काम बंद आंदोलनामुळे गुरूवारी बर्‍याच आगारातून बस बाहेरच पडल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सणासुदीच्या दिवसांत एसटीला मोठी गर्दी असते. परंतु त्याच दिवसांत हे आंदोलन सुरू झाल्याने प्रवाशी फलाटावरच अडकून पडले. यामुळे जिल्ह्यातील 80 ते 85 टक्के वाहतूक थप्प होती.

- Advertisement -

करोना काळात राज्यात सुमारे 30 एसटी कर्मचार्‍यांनी आर्थिक विवंचनेपोटी आत्महत्या केल्या. तरीदेखील राज्य मार्ग परिवहन कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने नाईलाजाने सर्व संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून 27 ऑक्टोबरपासून राज्यभर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे राज्य मार्ग परिवहनच्या कर्मचार्‍यांना 28 टक्के महागाई भत्ता त्वरित लागू करावा, मान्य केल्याप्रमाणे घरभाडे भत्ता 7, 14, 21 टक्केवरून 8, 16, 24 टक्के करण्यात यावा, वेतन वाढीचा दर शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे दोन टक्केवरून तीन टक्के लागू करावा, अग्रीम उचल शासनाच्या नियमाप्रमाणे 12 हजार 500 दिवाळीपूर्वी देण्यात यावी, दिवाळीचा बोनस 15 हजार देण्यात यावा, मासिक वेतन नियोजित तारखेस करावे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी गुरूवारी नगर जिल्ह्यातील अनेक आगारांतून बस बाहेर पडल्या नाहीत. तसेच बाहेरील जिल्ह्यातूनही बस न आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. सध्या करोनामुळे ग्रामीण भागातील बस आधीच बंद आहेत. केवळ तालुका व जिल्हास्तरावर बस सुरू असून सद्यस्थितीत सुमारे साडेचारशे बस नगर जिल्ह्यातून सुरू होत्या. परंतु गुरूवारी यातील 80 ते 85 टक्के बस जागेवरच उभ्या होत्या. अनेक भागात प्रवाशी अडकून पडल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. आज शुक्रवारीही कामबंद आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनांनी दिली.

खासगी वाहतुकीचा रेट दुप्पट

एसटी बस बंद असल्याचा फायदा उठवत अनेक खासगी प्रवाशी वाहतूक करणार्‍यांनी उठवला. अनेक ठिकाणी प्रवाशांकडून दुप्पट भाडे घेण्यात आले. तरीही प्रवाशी वाहतूक जोमात होती. सणासुदीच्या दिवसांत शहरातून गावाकडे येणारे प्रवाशी अधीक असून या एसटी बंदचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसला.

एसटी स्टँडच्या बाहेर प्रवासी ताटकळले

एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाची माहिती काही नागरिकांना नव्हती. यामुळे मिळले त्या साधानाने नगरला आलेले अनेक प्रवासी नगरमध्ये एसटी एसटी स्टँडच्या बाहेर ताटकळलेले दिसले. आधीच करोनामुळे आर्थिक अडचणीत असणार्‍यांची एसटीच्या आंदोलनाने आणखी फरफट होतांना दिसली.

- Advertisment -

ताज्या बातम्या