आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटनमध्ये ‘श्रमशक्ती’ला उपविजेतेपद

0
संगमनेर (प्रतिनिधी)-राहुरी विद्यापीठातंर्गत घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील श्रमशक्ती शैक्षणिक संकुलातील महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेसाठी एकूण 30 कृषी महाविद्यालयीन महिला संघांनी सहभाग घेतला होता.
नाशिक येथे पार पडलेल्या या स्पर्धेत श्रमशक्ती शैक्षणिक महाविद्यालयाने कृषी महाविद्यालय धोंडाईचा, कृषि महाविद्यालय बारामती, रेठरे कोल्हापूर यांना हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तेच विजेते होतील, असे वाटत होते. बॅडमिंटन या खेळात अनेक वर्षे प्रभूत्व गाजविणार्‍या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय राहुरी या संघाला शेवटपर्यंत झुंज देत मालदाड महाविद्यालयाच्या संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट डावपेच व सांघिक कौशल्यावर विजय मिळवून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. अंतिम सामन्यात गतविजेता कृषी महाविद्यालय पुणे या संघासोबत श्रमशक्ती शैक्षणिक महाविद्यालयाच्या खेळाडूंनी चांगली लढत दिली. त्यामुळेच त्यांना उपविजेतेपद पटकावता आले आहे.
या संघामध्ये कर्णधार रेणुका क्षीरसागर, म्रिणाल जोंधळे, प्रतीक्षा कर्पे, किरण जाधव, शीतल नागरगोजे यांचा समावेश आहे. या खेळाडूंना क्रीडासंचालक प्रा. लहू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व खेळाडूंचे सेवा संस्कार संस्थेचे अध्यक्ष साहेबराव नवले, श्रमशक्ती शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

*