Friday, May 3, 2024
Homeनाशिकमहापालिकेला टाळे ठोकण्याचा सभापतींचा इशारा

महापालिकेला टाळे ठोकण्याचा सभापतींचा इशारा

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक महापालिकेतील अंदाजपत्रकातील महिला बाल कल्याण समितीचा पाच टक्के निधी इतरत्र विभागातील कामांना वळविल्यास समितीच्या सर्व सदस्या महापालिकेला टाळे ठोकून उपोषणाला बसतील, बजेटच्या प्रति फाडून टाकु असा इशारा महिला बाल कल्याण समिती सभापती स्वाती भामरे व सदस्या सत्यभामा गाडेकर यांनी दिला.

- Advertisement -

समितीच्या सदस्यांच्या आक्रमक पवित्रा लक्षात घेत अतिरीक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टेकर यांनी समितीच्या प्रस्तावानुसार निधीची तरतुद करण्याचे निर्देश यांनी संंबंधीत विभाग प्रमुखांना दिले.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत महिला बाल कल्याण समिती चांगलीच गाजली. स्थायी सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झालेल्या सभेत महिला बाल कल्याण समितीच्या निधीचा मुद्दा सदस्या सत्यभामा गाडेकर यांनी उपस्थित केला. महिला बाल कल्याण समितीच्या 5 टक्के निधीचा वापर करण्याचा अधिकार कोणाचा ? असा प्रश्न उपस्थित करीत यासंदर्भात खुलासा करण्याची मागणी गाडेकर यांनी केली.

दरवर्षी समितीचा निधी परस्पर पळविला जात असुन बांधकाम व इतर विभागाकडुन हा निधी वळविण्याचे बजेटमध्ये कळते. असे उद्योग आता करु नका, आता बजेट चालु असल्याने निधी हा समितीच्या कामांनाच वापरला गेला पाहिजे असे त्यांनी सांगितले. यानंतर सभापती भामरे यांनी निधीच्या वापरासंदर्भात संताप व्यक्त करीत प्रशासनाला गंभीर इशारा दिला.

या चर्चेनंतर सभापती गिते यांनी निधी वापरासंदर्भात अतिरीक्त आयुक्त अष्टेकर यांना खुलासा करण्यास सांगितले. आता बजेट करण्याची प्रक्रिया सुरु असल्याने आता महिला बाल कल्याण समितीकडुन येणार्‍या प्रस्तावानुसारच कामांचा अंतर्भाव करावा, असे सर्व विभागाला सुचित करतो असे स्पष्टीकरण डॉ. अष्टेकर यांनी सांगितले.

यानंतर सभापती भामरे यांनी महिला प्रशिक्षण, अंगणवाडी सेवकांचा विमा काढावा, अंगणवाड्यातील सकस आहार पुरवठा महिला बचत गटांना द्यावेत, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी, मातृत्व दुध बँक योजना सुरू करावी आदी प्रस्तावांना मंजुरी देण्याची मागणी केली. यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात लवकरच वाढ केली जाणार असल्याचे डॉ. अष्टीकर यांनी सांगितले.

तसेच या चर्चेनंतर महिला प्रशिक्षणाचा विषय पुढच्या स्थायी समितीच्या सभेत ठेवावा, सेंट्रल किचन प्रमाणेच अंगणवाडी सकस आहारासंदर्भात निर्णय घेऊन नंतर त्यांच्यामार्फत महिला बचत गटांच्या अटी शिथील करुन काम द्यावेत असे निर्देश सभापती गिते यांनी दिले.

वालदेवीतील सांडपाण्याचा प्रश्न सुटणार

नाशिकरोड विभागातील देवळाली गाव शिवारात वालदेवी नदीत येणारे मिलीटरी भागातील सांडपाणी कधी थांबविणार ? असा प्रश्न सत्यभामा गाडेकर यांनी उपस्थित केला. भूमिगत गटारी करणारा ठेकेदार ऐकत नसेल तर कारवाई करा, अशा मागणीनंतर भूमिगत गटार विभागाचे अधिक्षक अभियंता संदिप नलावडे यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. देवळालीचे ब्रिगेडीयर यांना भेटून 10 दिवसात हा प्रश्न सोडवू असे त्यांनी सांगितले.

वॉटरग्रेस चौकशी समितीची बैठक मंगळवारी

महापालिकेची ठेकेदार कंपनीच्या कारभारासंदर्भात स्थायी समितीकडुन गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक अद्याप झालेली नसल्याकडे सदस्य कमलेश बोडके यांनी लक्ष वेधत तातडीने बैठक घेण्याची मागणी केली.

यावर सभापतींनी येत्या सोमवार किंवा मंगळवारी (दि.9) समितीची बैठक लावण्याचे आदेश सभापती गणेश गिते यांनी दिली. तसेच दीड लाख पगार घ्यायचा काम करायचे नाही, असे होत असेल तर विद्युतचे वनमाळी यांची बदली करा, नाहीतर सोडून द्या असे निर्देश सभापतींनी बडगुजर गंभीर यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाला दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या