Type to search

Breaking News Featured ब्लॉग मुख्य बातम्या

माझा सोनगिरी ट्रेक..!; अंजली राजाध्यक्ष

Share

मी हाडाची ट्रेकर नाही. मला ते टिपिकल जिप्सी लाईफ इतके पसंत नाही वा फिटनेसचाही फार शौक नाही. परंतु मला गिर्यारोहणाचे भयंकर आकर्षण आहे. जेव्हा ते करायला हवे होते तेव्हा तसा ग्रुप मिळाला नाही. आता साठीनंतर या गोष्टी करण्याचे वय नाही. पण मनात तीव्र इच्छा असली की गोष्टी घडतात.

माझे सोनगिरी पर्वतावरील ट्रेकिंगचे असेच झाले. ते पूर्वनियोजित नव्हते. ऐनवेळी मुलीच्या ऑफिसमधील एक सहकारी गळाली व तिने मला विचारले. मी पटकन हो म्हणाले. साने सरांबरोबर केलेले भंडारदरा, लोहगड व कर्जतचा धबधबा याने मी जरा नको तेवढी धाडसी झाले होते. परंतु मी सर्व सीनिअर सिटिझन्स ना सांगू इच्छिते, असे काही ठरवताना जरा थांबा, विचार करा व स्वतःस प्रश्न करा की मला हे करायचेच आहे का? उत्तर होकारार्थी असेल व शरीर साथ देत असेल, तेवढी मदत आणि पाठिंबा देणारी यंत्रणा असलेला ग्रुप असेल तर जरूर ट्रेक करा.

उन्हाळ्याच्या होरपळीअखेर पाऊस सुरू झाला तेव्हा वर्षा सहलीवर जाण्याचे मनात खूप आले. तेव्हाच नेमकी ही संधी पुढे येऊन ठाकली. पटकन हो म्हटले व 30 जूनला मुलीसोबत मी निघाले. 50/60 जणांचा ग्रुप होता. सर्व अनोळखी, वेगवेगळ्या क्षेत्रातील. पण मला निसर्ग सान्निध्यात निःशब्दपणे एक दिवस घालवायचा होता. त्यात गाणी, मैत्री व हुल्लडबाजीस स्थान नव्हते. कर्जत स्टेशनपासून पळसदारीला बेसकॅम्प आहे तेथून हा ट्रेक सुरू होतो. तेथील वस्तीमागे इतक्या मोठमोठ्या पर्वत रांगा दिसतात की मन थक्क होऊन जाते. तो सर्व ट्रेक पावसात अतिशय अवर्णनीय आहे. आम्ही सकाळी 11 वाजता चढण्यास सुरुवात केली. उतरण्यास 6 वाजले. प्रत्येक उंचीवर वेगवेगळे सुंदर दृश्य, वेगवेगळ्या वनस्पती, किडे, फूलपाखरे दिसली. या ट्रेकमध्ये पावसाळी किडा पाहण्यास मिळाला. तो दिसला की पावसास सुरुवात होते अशी श्रद्धा आहे.

चढत असताना, कधी संपणार चढण? या प्रश्नास एक स्टॅण्डर्ड उत्तर यायचे, ते म्हणजे हे काय आलेच! जवळपास 90 टक्के चढण चढल्यावर अजून वर 100 फुटांवर चढण होती. तुम्ही सर्व वर चढा, मी मागे तुमचे सामान पाहते. मला हे निसर्ग सान्निध्य फार भावले, माझी आणखी चढण्याची कुवत नाही व मला आग्रह करू नका, असे मी सगळ्यांना सांगितले. मुलीसही मी वर चढण्यास सांगितले. यावर माझ्या बरोबरच असलेला अभिजित मागे राहिला. अभिजितने हा ट्रेक पावसाळ्यातच केला होता, त्यामुळे त्याला मागे थांबण्यात काही प्रॉब्लेम नव्हता. तो हाडाचा ट्रेकर. अनेक कठीण चढाया त्याने केल्या आहेत. त्याच्या कितीतरी हकीकती त्याने मला त्या दोन-तीन तासात सांगितल्या. अभिजितने शेवटपर्यंत माझी पाठ सोडली नाही. उतरण्यासही मदत केली.

सर्व वर गेल्यावर आम्ही दोघेच राहिलो, आजूबाजूस फक्त दरी व वर पर्वताचा कडा. पण मनात किंतू वा कसलीच भीती नव्हती. अगदी एकटी राहिले असते तरी. परमेश्वराचे उंच ठिकाणी अधिष्ठान असते म्हणतात ते खोटे नाही. निसर्गाचे रौद्र, सौम्य व प्रेमळ रूप मी त्या तीन तासात पाहिले. धुके जसजसे दरीतून वर चढू लागले, 3/4 फुटापलीकडचे दिसणे कठीण झाले. तो नजारा, ती हवा मी भरभरून मनात व शरीरात साठवून ठेवली. नंतर जोरात पावसास सुरुवात झाली.

भिजण्याखेरीज गत्यंतर नव्हते. अंगावर रेनकोट असूनही. पावसाचे बरसणे जवळपास एक तास चालले. अभिजितच्या पूर्वी केलेल्या ट्रेक्सच्या गंमतीशीर गोष्टी भरपूर ऐकून झाल्या. मग मात्र मी मंत्रमुग्ध होऊन शांतपणे आजूबाजूचे परमेश्वराचे रूप पाहत राहिले. ती हिरवाई, वनराई, पावसाचे क्षणाक्षणास बदलणारे रूप मला मंत्रमुग्ध करून गेले. त्या क्षणाला मला कवी पाडगावकरांचे ‘श्रावणात घन निळा बरसला’ आठवले..हिरकणीची गोष्ट आठवली..विशालगडाच्या तोफांचे आवाज आठवले..

तानाजी मालुसरेंची घोरपड आठवली.. शिवरायांचे मावळे आठवले. माझा राकट व कणखर दगडांचा देश मी याचि देही याचि डोळा पाहत होते. मला प्रकर्षाने जाणवलेली आणखी एक गोष्ट. तरुणांमध्ये पर्यावरण व राष्ट्रीय संपत्तीबद्दलची जागरुकता. कोठेही अचकट विचकट भाषा, गाणी, प्लॅस्टिक कचरा, लांछानस्पद वर्तन दिसले नाही. अभिजित तर सांगत होता, त्यांची संघटना गड पर्वतांवरील कचरा साफ करतात. या गोष्टी मनास स्पर्श करून गेल्या. पर्वत उतरतानाचा अनुभव मात्र आल्हाददायक नव्हता. खूप पाय दुखले. अतिपावसाने पावलोपावली निसरडे झाल्याने घसरण्याची भीती वाढू लागली. परंतु सांघिक शिस्त, डोंगर चढण शिकलेले 4/5 ट्रेकर मदतीस धावून आले. एकेक करून सर्व थकून भागून खाली उतरलो. जेऊन झाल्यावर पळसदरी स्टेशनला चालत जाण्याखेरीज पर्याय नाही, अशी सुवार्ता समजली. एक क्षण राग आला. शहरी सुविधांना सोकावलेल्या माझ्या शरीरास ती गैरसोय मान्य नव्हती.

पळसदरी हे अगदी छोटे खेडे. तेथे 10/12 घरांच्या समूहात काय काय सुविधा असणार? पर्वतावर सर्व भव्यदिव्य अनुभवल्यानंतर असले क्षुद्र विचार मला नकोसे झाले. शेवटी स्वत:ला बजावले, इतके चाललो, आणखी अर्धा तास सरळ वाट चालू की आणि खरे सांगते, सोनागिरी डोंगराइतकीच ती नयनरम्य वाट चालता चालता कशी झपझप संपली कळलेच नाही. इतकी स्वच्छ व शुद्ध हवा, खळाळते झरे व जवळ जवळ निर्मनुष्य रस्ता. मागे परत वळून वळून ढगांमध्ये झाकलेल्या पर्वतराजी बघत होते. त्यातील एकीला मी नुकतीच भेट दिलेली. मनातल्या मनात भरलेले डोळे पुसून मी निसर्गासमोर
नतमस्तक झाले.

– अंजली राजाध्यक्ष, ब्लॉगर, मुंबई

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!