Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सोनई-करजगाव पाणी योजनेची जबाबदारी ‘एमजेपी’चीच

Share

चालविण्यासाठी शासन देणार पैसे, अपूर्ण कामे झाल्यावरच पुढील कार्यवाही

खरवंडी (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील सोनई-करजगावसह 16 गावे पाणी योजनेतील अनेक कामे अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण झाल्याशिवाय योजनेची पुढील हस्तांतरणाची कारवाई होणार नाही. त्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करून घ्यावीत. तोपर्यंत ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेच चालविण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. योजना चालवण्यासाठी निधी नसल्याने शासन जीवन प्राधिकरणाला निधी देणार आहे.

गेल्या दोन वर्षापासून सोनई-करजगाव पाणी योजनेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब असल्याने अनेकदा आंदोलने झाली आहेत. मध्यंतरी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जीवन प्राधिकरणाने ही योजना सुरू केली आहे. योजनेसंदर्भात नुकतीच पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मुंबईत बैठक घेतली. योजनेतील अनेक कामे अपूर्ण असल्याचा आरोप झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी कामाची तपासणी केली होती. त्यात अनेक कामे अपूर्ण असल्याचे समोर आले. हा अहवाल भोर यांनी बैठकीच्या वेळेस सादर केला. योजना पूर्ण असल्याचा दावा यापूर्वी जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांकडून करण्यात येत होता. हा दावा खोटा असल्याचे यावेळी निष्पन्न झाले.

त्यामुळे पाणी पुरवठा मंत्र्यांनी योजनेतील कामे पूर्ण झाल्याशिवाय पुढील कारवाई करू नये, तसेच योजना पूर्ण करून वर्षभर चालविल्यानंतरच त्याचे हस्तांतरण करण्याचे आदेश दिले. योजनेची कामे तपासणी अहवाल व मूळ इस्टिमेंटप्रमाणे झाली आहेत की, नाही याची खात्री जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेतून तब्बल 80 हजार नागरिकांना पाणीपुरवठा होणार आहे. शासनाने आत्तापर्यंत 75 कोटींचा निधी योजनेसाठी दिला असूनही योजना अपूर्ण असल्याने अनेक गावे पाण्यावाचून वंचित आहेत.

राहुरी तालुक्यातील गावांना फुकटचे पाणी
या योजनेतून राहुरी तालुक्यातील तीन गावांना टंचाईच्या कालावधीत पाणी पुरवठा करण्याचे आदेश होते. त्यासाठी थेट मुख्य पाईप लाईनला जोड देऊन पाण्याचे कनेक्शन घेण्यात आले. त्यामुळे योजनेचे मुख्य लाभार्थी असलेल्या टेलच्या गावांना पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या तीन गावांचे पाणी तोडण्याचे आदेश दिलेले असतानाही, या गावांना पाणी देण्यात येत असल्याने योजनेत समाविष्ट गावांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

गडाख यांच्या आरोपावर शिक्कामोर्तब
योजनेतील कामे अपूर्ण असल्याचा आरोप माजी आमदार शंकरराव गडाख यांनी अनेकदा केला आहे, मात्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांकडून योजना पूर्ण झाल्याचे सांगत, योजना हस्तांतरित करण्याचा आग्रह होत होता. पाणीपुरवठा मंत्र्यांसमोर झालेल्या सुनावणीत ही योजना अपूर्ण असल्याचे समोर आले, त्यामुळे गडाख यांनी केलेल्या आरोपांवर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!