Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

Video : कधीकाळी काळारामाचे पायर्‍यांवरुनच घडायचे मुखदर्शन; वाचा सविस्तर

Share

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक । प्रतिनिधी

ऐतिहासिक व पौराणिक महत्व असलेल्या पंचवटीतील श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाज्या समोर खोदकाम करताना सापडलेल्या तीन दगडी पायर्‍या नाशिककरांसाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. पुर्वी या पायर्‍यांवर उभे राहिल्यावर श्री राम मुख दर्शनाचा लाभ घेता यायचा. पहिल्या पायरीवरुन मुकूट परिधान केलेले रामाचे मस्तक, दुसर्‍या पायरीवरुन रामाची छाती तर तिसर्‍या पायरीवरुन रामाच्या हाताचे दर्शन व्हायचे. जे मंदिरात जाऊ शकत नव्हते ते या पायर्‍यांवरुन श्री राम दर्शनाचा लाभ घ्यायचे, अशी माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली.

श्री काळाराम मंदिर परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. आ.बाळासाहेब सानप यांच्या निधीतून साडेचार कोटी रुपये खर्च करुन मंदिर परिसराचा कायापालट केला जात आहे. तीर्थ क्षेत्र नेवासेच्या धर्तीवर दगडाचे काम या ठिकाणी केले जाणार आहे.

त्यासाठी मंदिराच्या पूर्व दरवाज्या समोरील डांबरीकरण खोदण्याचे काम सुरु आहे. हे काम करत असताना गुरुवारी या ठिकाणी पुरातन काळातील दगडी तीन पायर्‍या आढळल्या. या पायर्‍या पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

पुरातन काळी मंदिराची विशिष्ट रचना असायची. पेशव्यांचे सरदार रंगवडेकर यांनी 1792 मध्ये हे मंदिर बांधले. पूर्व दरवाजा हा मंदिराचा मुख्य दरवाजा.

यासमोर या तीन दगडी पायर्‍या बांधण्यात आल्या होत्या. दरवाज्यासमोर तीन ते पाच फूट खाली या पायर्‍या आहेत. येथे उभे राहिल्यावर दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना थेट सरळ समोर असलेल्या श्री काळा रामाच्या मुर्तीचे दर्शन घडायचे. प्रत्येक पायरीची रचनाही ही वैशिष्यपूर्ण होती.

पुर्वी येथून येणारे जाणारे भाविक या पायरीवरुन रामाचे दर्शन घेऊन पुढे जायचे. मंदिरात यायला नाही जमले तरी बाहेरुन दर्शन घडावे, या उद्देशाने अतिशय वैशिष्टपूर्ण पध्दतीने दरवाज्यासमोर या पायर्‍यांची रचना करण्यात आली होती.

ब्रिटिश जरी परकीय होते तरी स्थापत्य कलेची जाण असल्याने त्यांच्या काळात देखील या पायर्‍या कायम होत्या. मात्र, स्वातंत्र्यानंतर नगरपालिका, महापालिका यांच्याकडे शहराचा कारभार गेला. नियोजन शून्य व दुरदृष्टीचा अभाव असलेल्यांनी मंदिर परिसर सुशोभिकरणाच्या नावाखाली पायर्‍या बुजवत मुळ रचनेला धक्का दिला.

तेथे सिमेंट काँक्रीट व डांबरीकरण करण्यात आले. दरम्यान, पुन्हा एकदा मंदिर परिसराचे सुभोभिकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने खोदकामात या पायर्‍यांचे दर्शन नाशिककरांना घडले आहे.


दरवाज्या समोर जलकुंड

पायर्‍या सापडलेल्या मंदिराच्या पूर्व दरवाज्यासमोर जलकुंड उभारले जाणार आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर जलकुंडाची रचना असेल. येणार्‍या भाविकांनी पाय धुवून मंदिरात प्रवेश करणे, हा त्या मागचा उद्देश आहे. मात्र, जलकुंडाच्या नादात पायर्‍या पुन्हा बुजविल्या जाण्याची शक्यता आहे.


पायऱ्या बुजवू नयेत

खोदकाम करताना सापडलेल्या पायर्‍या या बुजविल्या जाऊ नये. विश्वस्तांनी या बाबत पुरातत्व खात्याला माहिती देऊन त्यांच्याशी चर्चा व सल्ला मसलत करुन योग्य निर्णय घ्यावा.

– गिरिश टकले, इंटॅक, नाशिक


रविवारी निर्णय 

मंदिराची जबाबदारी विश्वस्त मंडळाकडे असून ते पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येत नाहीत. पायर्‍या ठेवायच्या की नाही याबाबत रविवारी निर्णय घेतला जाईल. आ. सानप व महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित राहतील.

– पांडुरंग बोडके, विश्वस्त, श्री काळाराम मंदिर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!