आंदोलकांनी समाजकल्याण अधिकार्‍यावर शाई फेकली : माजी नगरसेवकासह चौघांना अटक

0
अहमदनगर (प्रतिनिधी) –  शोषित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. सूरज दुर्गिष्ट या विद्यार्थ्यास वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शिष्यवृत्ती न मिळाल्याने चर्मकार उठाव संघाच्यावतीने बोल्हेगाव येथील जिल्हा समाजकल्याण कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संतप्त झालेल्या काही आंदोलकांनी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या सहायक समाजकल्याण आयुक्त पांडुरंग वाबळे यांच्या अंगावर शाई ओतली. या प्रकरणी माजी नगरसेवकासह अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागासवर्गीय कुटुंबातील सूरज दुर्गिष्ट (रा. तरवडी, ता. नेवासा) या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्याचे आईवडील मोलमजुरी करून जीवन जगत आहेत. हलाखीच्या परिस्थितीत त्यांना मुलाच्या शिक्षण खर्च उचलणे कठीण झाले आहे. सूरजच्या बारावी नंतर आयआयटीसाठी घारवाडला (कर्नाटक) नंबर लागला असता ग्रामस्थांनी लोकवर्गणी करून त्याला पुढील शिक्षणासाठी पाठविले.

अशा पध्दतीने सुरजचे शिक्षण सुरू असून, या विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती मिळावी यासाठी चर्मकार उठाव संघाच्या वतीने जिल्हा समाज कल्याण कार्यालयास वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.

मात्र, या विद्यार्थ्यास न्याय न मिळाल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे, राष्ट्रीय सचिव विजय घासे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, गौतम सातपुते, बाळासाहेब भोसले, रावसाहेब कानडे, माणिकराव नवसुपे, संतोष कानडे, प्रकाश पोटे, विनोद सिंह, रामेश्‍वर उदे, सोपान वाढे, योगेश कडवे, संतोष खरुळे, संजय बाविस्कर, नितीन खामकर, रावसाहेब सोनवणे, बबन शेंडे, नारायण कांबळे, लखन साठे, राजू डोईफोडे, धनराज भगत, नितीन एडके आदि सहभागी झाले होते.

दीड वर्षापासून मदतीची याचना करून सुरज शिक्षण घेत आहे. मात्र, समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने त्याला एक रुपयाची देखील मदत मिळाली नाही. आर्थिक परिस्थितीअभावी मुलास शिक्षण देता येत नसल्याने त्याचे वडिल शंकर दुर्गीष्ट यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आंदोलना स्थळी त्यांनी रॉकेलची बाटली देखील आणली होती. यामुळे संतप्त झालेल्या चर्मकार उठाव संघाच्या दोन कार्यकर्त्यांनी समाज कल्याण अधिकारी वाबळे यांच्या डोक्यावर दोन बाटल्या शाई ओतून त्यांचे तोंड काळे केले. हा प्रकार एमआयडीसी पोलिसांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आंदोजलनकर्त्यांना रोखले. तसेच माजी नगरसेवक अशोक कानडेसह तिघांना ताब्यात घेतले.
…………..
प्रशासकीय गलथान कारभारामुळे सुरज सारख्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अधिकार्‍यांना काळे फासणे या घटनेशी आंम्ही सहमत नसून, मात्र अशा परिस्थितीमध्ये नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रीया उमटणे सहाजीक आहे.
अशोक कानडे माजी नगरसेवक.
…..
माजी नगरसेवक कानडे (रा. सावेडी), प्रकाश मोहन पोटे (रा. निंबोडी, ता. नगर), लखन भाऊसाहेब चाळे (रा. अकोळनेर, ता. नगर), विजय जगन्नाथ घासे (रा. संभाजीनगर, केडगाव) या चौघांना अटक करण्यात आली आहे. यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना जामीनावर मुक्त केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली.

LEAVE A REPLY

*