सोशल मीडियावर, पोलीस अधीक्षक जय हो!

0

शर्मा ठरले खाकीचे बाहुबली

अहमदनगर (प्रतिनिधी) – चित्रपट सृष्टीतील सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा बाहुबली चित्रपट जनमानसांच्या मनावर कोरला गेला आहे. जनतेची दु:ख जाणणारा राजा म्हणून बाहुबली जय हो असा नारा देताना दाखविला आहे. असाच प्रकार सध्या पोलीस दलात पहावयास मिळत आहे. एसपी रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस दलातील सर्व नियम बाजूला ठेवत कर्मचार्‍यांच्या हीताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शर्मा हे खाकीच्या हृदयावर कोरले गेले आहेत. म्हणून पोलीस कर्मचार्‍यांनी सोशल मीडियावर पोलीस अधीक्षक जय हो! असा नारा दिला आहे. तर बहुतांश पोलीस ग्रुप व वैयक्तीक प्रोफाईलवर शर्मा यांचा फोटो पहावयास मिळत आहे. त्यामुळे हे एसपी खात्याचे बाहुबली ठरले आहेत.

गेल्या अनेक दशकांपासून पोलीस खात्यात बदल्यांमुळे पोलीस नाक मुरडून काम करीत होेते. पाच वर्षेे किंवा कुचराईचा अहवाल गेला की कोठे बदली होते याची भीती मनात असायची. निवृत्तीला आलेल्या अनेक कर्मचार्‍यांना उतारवयात मोठा त्रास सहन करावा लागत असे. योग्य तेथे बदली करण्यासाठी अर्थपूर्ण तडजोडी कराव्या लागत असे. त्यामुळे बदली हा एकमेव विषय पोलीस खात्याला ढवळून टाकणारा होता. यापूर्वी कृष्णप्रकाश यांनी समाधानकारक बदल्या केल्या होत्या. तर लखमी गौतम यांनी पोलीस दलातील मक्तेदारी मोडीत काढली होती. अशा वेगवेगळ्या अधिकार्‍यांनी स्वत:चे फंडे वापरून खाकीला हवे तसे वळण देण्याचे काम केले. मात्र या सर्वांमध्ये पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा हे खाकीचे कैवारी म्हणून पोलीस खात्याला लाभल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

बाहुबली चित्रपटात माहीश्मती साम्राज्याचा राजा कसा असावा हे दाखविण्यात आले आहे. तो जनतेची काळजी करणारा असावा, साम, दाम, दंड, भेद अशी रणनिती असावी. अमर्त्या सारख्या अपराध्याला कडक शिक्षा देणारा असावा. जनतेत मिळून मिसळून काम करणारा असावा. समाजास सहज उपलब्ध होईल त्यांचे प्रश्‍न सहज सोडवेल असा असावा, अशा राज्याला जनता सहज स्वीकारते, तर माहीश्मतीच्या आसनावर विराजमान होणारा राजा समाजाची काळजी करणारा नसेल तर त्याला जनता स्वीकारत नाही. त्याची पुढे मागे चेष्टा, कुचेष्टा करीत असते. अशी संकल्पना दाखविण्यात आली आहे. तसेच पोलीस खात्याविषयीची संकल्पना आज दृढ झाली आहे. यापूर्वी काही पोलीस अधिकारी असे होते, त्यांनी पोलीस खात्यात अनेक मोठ्या अर्थपूर्ण तडजोडी केल्या. खात्याच्या विरोधात काही निर्णय घेतले. पोलीस कर्मचार्‍यांच्या मनमानी बदल्या केल्या. अधिकार्‍यांना अर्थपूर्ण तडजोडीने पोलीस ठाणे दिले. अशा अनेक वाच्यता पोलीस खात्यातील साम्राज्यातून ऐकू आल्या. या सर्व प्रवृत्तीचा नाश करून शर्मा यांनी खाकी साम्राज्याला पुन्हा नवे रुप व शिपायांना नवी स्फूर्ती निर्माण करून दिली आहे. त्यामुळे ते खाकी साम्राज्याचे लोकमान्य बाहुबली ठरले आहेत. त्यांच्या या उदारमतवादाच्या धोरणामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नावाचा जय हो ! सुरू आहे.

व्हॉटस्अ‍ॅपवर पोलीस दलाच्या प्रत्येक ग्रुपवर शर्मा यांचा फोटो ठेवण्यात आला आहे. साडेतीन हजार कर्मचार्‍यांपैकी दीड ते दोन हजार कर्मचार्‍यांनी शर्मा यांचा फोटो प्रोफाईलवर ठेवला आहे. त्यामुुळे पोलीस अधीक्षक पोलीस खात्याचेच नाही तर, जिल्ह्यातील तमाम जनतेचे बाहुबली ठरलतील अशी अपेक्षा जनतेचीही असणार आहे.

तेव्हा ते खरे बाहुबली
जिल्ह्यातील वाळू तस्कर, गुन्हेगार, अवैध धंद्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप करणारे पुढारी, दोन समाजात तेढ निर्माण करणारे समाजकंटक असे अनेक लोक जिल्ह्याच्या साम्राज्याला घातक ठरले आहेत. त्यांचा संहार करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात महिला, विद्यार्थी, व सामान्य नागरिकांना जेव्हा सुरक्षिततेची भावना निर्माण होईल तेव्हा शर्मा जनतेच्यादृष्टीने बाहुबली ठरणार आहेत.

LEAVE A REPLY

*