Type to search

Blog : सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुणाई

Breaking News ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुणाई

Share

आज अशी एकही व्यक्ती नाही जी सोशल मीडियाला ओळखत नाही कारण, वर्तमान परिस्थितीत संवादाचे सर्वात श्रेष्ठ माध्यम म्हणजेच सोशल मीडिया…! सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अगदी क्षणार्धात जगातील कोणत्याही ठिकाणी असलेल्या व्यक्तिपर्यंत इंटरनेटचा वापर करून आपले विचार,फोटो, व्हिडिओ, माहिती इत्यादी तात्काळ पाठवू शकतो.

एक काळ असा होता की, आपण पत्र लिहून पोस्टाच्या मार्फत पाठवत होतो व पोस्टमन ते पत्र संबंधित पत्त्यावर पोहचवत असे. हे पत्र पाठविण्यासाठी आणि पत्राचे उत्तर मिळवण्यासाठी साधारणतः १५ ते २० दिवसांचा कालावधी लागत होता. या संपुर्ण प्रक्रियेत वेळेचा अपव्यय होणे त्याचबरोबर आपला निरोप पोहचविण्यासाठीही खूप वेळ लागत होता. परंतू काळानुसार जग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून क्रांतिकडे वाटचाल करत आहे. यात सिंहाचा वाटा सोशल मीडियाचा आहे. याच माध्यमाने अनेक उणिवा भरून काढल्याने जग जवळ येत आहे. आपले विचार पोहचविण्यात जास्त वेळ लागत नसल्याने आपण व्यक्तीपर्यंत क्षणार्धात पोहोचतो.

सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, हाईक या लोकप्रिय साधनांच्या माध्यमातून जगातील परिचित-अपरिचित विविध लोक एकमेकांना जोडले गेले आहेत. अनेकदा अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री होऊन घट्ट मैत्रीचे रूपांतर प्रेमविवाहात होण्याच्या घटनाही पहावयास मिळतात. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक विधायक कार्यही काही स्वयंसेवी संस्थांकडून सुरु आहे. त्यात व्हाट्सअँप वर सर्व समाजाचे विवाह ग्रुप तयार करून अनेकांचे विवाह जुळण्यास मदतही झाली आहे.

आजच्या युगात संवाद मंच अशी ओळख सोशल मीडियाची झालेली आहे. तरुण पिढीच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्याने हीच युवाशक्ती आपली मते, विचार जगातील काना-कोपऱ्यात पोहचावीत आहेत. भारतात सुमारे ६५ ते ७० टक्के युवक असून सर्वांमध्ये सोशल मीडियाची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. राजकारण, समाजकारण, उपक्रम, जाहिरात इत्यादी सर्वच गोष्टींसाठी सोशल मीडियाचा १०० टक्के वापर होत असून त्याचा आपण जेवढा फायदा घेतो तेवढेच गंभीर दुष्परिणामही समाजाला बघावयास मिळत आहेत.

‘अति तिथे माती’ या म्हणीप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर,त्याचे अंतिमतः नुकसानच होते. आज अनेक उदाहरणे सांगता येतील ज्याद्वारे तरुण तरुणींना सोशल मीडियापायी आपला जीव जमाव लागला. तरुणांकडून सर्वच सोशल नेटवर्किंग मीडियाचा वापर होतो. कारण आजची तरूण पिढी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप पुढारलेली आहे. जवळपास सगळेच विद्यार्थी सातवी- आठवीपासूनच फेसबुक वापरायला लागतात. त्याचबरोबर इंस्टाग्राम, हाइक, व्हॉट्सअप मेसेंजरसुद्धा लोकप्रिय आहेत.

कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाचा वापर सर्वात आधी करण्याकडे त्यांचा कल असतो. अनेकदा ब्लॉगर, गूगल प्लस यांसारख्या साइट्समुळे चांगली माहिती तर मिळतेच आणि वेळ वायाही जात नाही. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच मोबाईलचा वापर करतात. परंतू साधारणतः १८ ते ४० वयोगटातील तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचे दिसून येते. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, हाईक इत्यादिंचा वापर करून दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुणाई भरकटत चालली आहे.

दिवस-रात्र इंटरनेटचा वापर करून फोटो, माहिती,व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करतात. अनेकदा तरुणांकडून अश्लिल फोटो,समाजविरोधी माहिती विविध साईट्सवर टाकली जाते ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन दंगली, जाळपोळ, लुटमारी, खून अशा भयानक घटनाही घडत असतात. या गोष्टी होऊच नये म्हणून तरुणांनी विविध तत्वांचा व नियमाचा उपयोग करून गरजेपुरता सोशल मिडीयाचा वापर केला पाहिजे व समाजविरोधी घटना घडणार नाहीत याची काळजी आवर्जून घेतली पाहिजे. केव्हाही प्रायव्हसी सेटिंग्ज योग्य प्रकारे सेट करून नंतरच आपले फोटो किंवा मेसेज शेअर केले पाहिजेत. एखादी पोस्ट नको असल्यास ती काढून टाकली जाऊ शकते.

मेसेज शेअर किंवा लाइक करताना आपण काही चुकीचं पाठवत नाही ना..? याचे भान आपणच राखले पाहिजे. कारण,अर्धवट ज्ञान नेहमी घातक असते. काहीवेळा पटकन माहिती शेअर करण्याच्या नादात चुकीची माहिती शेअर केली जाते. हा सोशल मीडियाचा सर्वात मोठा दुष्परिणाम आहे. तो तरुण वर्गाने लक्षात घेतला पाहिजे.

कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती शेअर करू नये. आपण माहिती शेअर केल्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण,सोशल मीडियातून झटपट माहिती पोहचल्याने गैरप्रकारदेखील घडल्याची उदाहरणे आहेत. कोणतीही माहिती बरोबर असल्याची खात्री केल्याशिवाय ती शेअर करू नये. अनेकदा वादग्रस्त संदेश शेअर करून तरुणांना भडकवले जाते. काही तरुण त्याला बळी पडतात. अतिरेकी संघटनासुध्दा याच माध्यमांचा वापर करुन आपली ताकद वाढवत असल्याचे आपणांस दिसून येते.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार श्री.नरेंद्र मोदी यांचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा १०० टक्के उपयोग करून फेसबुक, व्हाट्सअँप इत्यादींच्या माध्यमातून विविध विचार, फोटो, व्हिडिओ, जाहीरनामा जनतेपर्यंत पोहचविण्यात भाजपा हा पक्ष अग्रेसर ठरला व २०१४ च्या निवडणुकीत भाजपा बहुमताने विजयी होऊन सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाले होते.

सोशल मीडियाचे आरोग्यावरील दुष्परिणामही बघण्यास मिळतात. सोशल मीडियाचा अति वापर केल्यामुळे आपल्याला थकवा येतो. त्यामुळे तणाव, हृदयविकार यांसारख्या आरोग्याच्या समस्या अत्यंत कमी वयात तरुणांमध्ये दिसू लागल्या आहेत. तसेच मोबाइलच्या अतिवापरामुळे रेडीएशनचा त्रास होतो त्यातून कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येकाने उत्तम आरोग्यासाठी इंटरनेटचा व सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास योग किंवा इतर बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकता येऊ शकतात. परंतु आपण सोशल मीडियाला कोणत्या नजरेने पाहतो, हे महत्वाचे आहे.

एकूणच सोशल मीडियाचा वापर केल्याने अनेक विपरीत घटना घडल्या असल्या तरी, याच सोशल मीडियाचा आधार घेऊन विविध समस्यांचा उलगडा लावण्यात अनेकजण यशस्वी झाले आहेत. आज गरज आहे ती फक्त आणि फक्त तरुणांनी सोशल मीडियाचा अतिरेक न करता मर्यादित व योग्य वापर करण्याची, असे झाले तरच सोशल मीडिया व तरुणाईच्या विचारांचा विजय होईल.

-विशाल रविंद्र बेनुस्कर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!