जीवघेणा व्हिडिओ व्हायरल झाला अन्‌ महावितरणचं वायर हललं

0

चांदवड (हर्षल गांगुर्डे) ता. २५ :  महावितरण कंपनीतील सावळा गोंधळ, ढिम्मपणा सर्वश्रृत असून याची प्रचिती गेले काही दिवस हिवरखेडे ता. चांदवड येथील काही शेतकरी घेत होते.

अखेर या त्रस्त शेतकर्‍यांनी वीज वितरण जाळ्यातील जीवघेणे वास्तव समाज माध्यमांत पसरविताच सदर कार्यक्षेत्र ज्यांच्या अखत्यारित्या आहे त्या यंत्रणेला खडबडून जाग आल्याचे अनुभवयास मिळाले.

महावितरण कंपनीच्या कामकाजात देयकातील त्रृटी, वीज जोडण्या देण्यात चाल-ढकल, वीज जोडणी नसतांना वीज देयक सुरू करणे, अव्वाच्या सव्वा वीज देयके, देखभाल दुरूस्तीकडे काना डोळा आदी प्रकारचा सावळा गोंधळ सर्वश्रृत आहे.

तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात महावितरणचे कर्मचारी माहिर आहेत. असाच काहीसा अनूभव गेल्या दोन-अडीच वर्षापासून तालुक्यातील हिवरखेडे येथील शेतकरी घेत होते.

हिवरखेडे-न्हनावे रस्त्यालगत घोलप वस्तीवरील रोहीत्रातून गेल्या दोन अडीच वर्षापासून सदोष वीज पुरवठा सुरू होता. परिसरातील वीज पंपावरील मीटर, घरगुती मीटर जळण्याच्या अनेक घटना घडल्या आहे. याबाबत येथील शेतकर्‍यांनी संबंधित चांदवड ग्रामीण कक्षाला लेखी व तोंडी वारंवार कळवूनही शेतकर्‍यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती.

चांदवड कार्यालयासह मुंबई कार्यालयाकडे ऑनलाईन तक्रार नोंदवली. तसेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी च्या ग्रामसभांमध्ये सदर समस्येचे निराकरण करण्याबाबतचा ठराव करण्यात येऊन त्याच्या प्रती संबंधितांना देण्यात आल्या परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या यंत्रणेने सोपस्कारापलीकडे ठोस दखल घेतली नाही. आर्थिंग मधील वीज प्रवाहाने अनेकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडलेल्या असतांना ढिम्म यंत्रणा हलायला तयार नव्हती. तीन वर्षापासून शेतकरी या समस्येने ग्रस्त होते.

येथून तीन कर्मचारी बदलून गेले तरी समस्या कायम राहिली परंतू महावितरणचे कर्मचारी आकसाने देयक देतील वा कारवाईच्या भितीतून आक्रमकपणे कुणी धजावत नव्हते. नुकतेच एक तरूण शेतकर्‍याला शेतात वीज पंप चालू करण्यासाठी गेले असता शॉक लागला होता. त्या

तून तरूण शेतकर्‍यांनी जमिनीची आर्थिंग देऊन महावितरणच्या आर्थिंग मधील प्रवाहाने बल्प लागल्याचे प्रात्यक्षिक दाखविल्याचे चित्रीकरण करून समाज माध्यमांत प्रसूत केला. झपाट्याने या चित्रीकरणाचा प्रसार होताच महावितरणच्या संबंधित कर्मचार्‍यांना खडबडून जाग आली. आज दिवसभर हिवरखेडे येथे कक्ष अधिकार्‍यांसह इतर कर्मचार्‍यांनी वीज प्रवाहातील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले अखेर दुपारी दोन वाजता वीज प्रवाहातील दोष दूर करण्यात महावितरणच्या कर्मचार्‍यांना यश आले. दोषमुक्त वीज प्रवाहाचे प्रात्यक्षिक समस्याग्रस्त शेतकर्‍यांना दाखविण्यात आले.

अशा प्रकारचा सदोष वीज प्रवाहाच्या समस्या गावा-गावात आहे. शेतकरी, ग्राहक हे ढिम्म महावितरणच्या कारभारापुढे हात टेकून समस्येचा सामना करीत असतो. कुणाच्या तरी जीवावर बेतल्यावर महावितरणला जाग येणार का हा प्रश्‍न आहे.

सोशल मीडियाचा खुबीने वापर

वीज वितरणातील समस्येबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. यात दोन-अडीच वर्षे गेली. समस्येचे जीवघेणे चित्रीकरण वीज वितरणातील भयावह वास्तव सोशल मीडियात व्हायरल करताच संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली. दुसर्‍याच दिवशी सुरळीत वीज पुरवठा करण्याचे अनुभूती आली आहे._

LEAVE A REPLY

*