चिमुकल्यांनी जागवले सामाजिक भान

चिमुकल्यांनी जागवले सामाजिक भान

नाशिक । प्रतिनिधी

बालकामगार ही समाजाची मोठी समस्या. अनाथ मुलांच्या व्यथा व त्यांच्याप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी, माणसांच्या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाची व पशुपक्षी, प्राणी यांची होणारी अपरिमित हानी, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध विषयांवरील सामाजिक भान चिमुकल्यांनी जागवले.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे सुरू असलेल्या द्वितीय दिव्यांग बाल नाट्य स्पर्धेत आज सहा नाटकांचे सादरीकरण झाले. सुरुवातीला नाशिकच्या महानॅब स्कूलच्या वतीने ‘मुक्त मी’ हे नाटक सादर झाले. समाजामध्ये अनेक अत्याचार होताना आपण पाहतो. त्या अत्याचारांना वाचाही फोडली जाते. बालकामगार ही एक त्यातीलच मोठी समस्या आहे. खेळण्या-बागडण्याच्या व शिकण्याच्या वयात मुलांना वेठीस धरले जाते. त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला. भाग्यश्री काळे यांनी लेखन व वर्षा साळुंके यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते.

दुसरे नाटक सादर झाले ‘डेस्टिनी’. धनंजय वाबळे लिखित व दिग्दर्शित या नाटकात अनाथ मुलांच्या व्यथा मांडल्या आहेत. अनाथ मुलांच्या व्यथा, कथा व्यक्तिपरत्वे निरनिराळ्या असतात. त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न या नाटकातून केला आहे. उपस्थितांना आपल्या लेखणीतून धनंजय वाबळे यांनी अनाथांच्या दाहकतेचे दर्शन घडवले आहे. रचना विद्यालयातर्फे सादर झालेल्या या नाटकात रोहन सोनवणे, लौकिक मगर, लोकेश चांदवडे, मेघा हिंडे, अथर्व वाघ, प्रतीक्षा शर्मा या कलाकारांनी भूमिका साकारल्या.

त्यानंतर लातूर येथील सुशीलादेवी देशमुख विद्यालयाच्या वतीने ‘प्रलय’ हे नाटक सादर झाले. या नाटकात माणसाच्या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाच्या होणार्‍या हानीवर भाष्य करण्यात आले. माणसाने वातावरणात प्रचंड प्रदूषण केले. त्याचा त्रास येथील पशुपक्षी-प्राण्यांना भोगावा लागतो आहे. त्यातून नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. तेव्हा माणसाने याचा विचार करावा व निसर्गाबरोबर मैत्रीपूर्ण भावनेने राहावे, असा संदेश या नाटकातून देण्यात आला. सुनीता कुलकर्णी यांनी या नाटकाचे लेखन केले आहे.

त्यानंतर सोलापूर पंचायत समितीच्या वतीने ‘जांभूळवाडा’ हे नाटक सादर झाले. उमेश कुचेकर लिखित व दिग्दर्शित या नाटकाची कथा ग्रामीण भागातील आहे. गावात एक जुना वाडा असतो ज्यात जांभळाची झाडे असतात. त्या वाड्यात सरदाराचे भूत वावरत असल्याची अंधश्रद्धा येथील गावकर्‍यांची असते. पण नाटकातील गोट्या नावाचे पात्र आपल्या कृतीतून लोकांची ही अंधश्रद्धा घालवून लावतो अशा आशयाचे हे नाटक होते.

यानंतर नागपूरच्या इंदिरा भारती विद्यालयाचे ‘पाईड पाईपर ऑफ हॅमलिन’ हे नाटक सादर झाले. मुकुंद मोरे लिखित व दिग्दर्शित हे नाटक होते. आजच्या दिवसाचा शेवट ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या इगतपुरी येथील अनुसुयात्मजा विद्यालयाच्या वतीने सादर झालेल्या नाटकाने झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com