Blog : शाळकरी मुलीला ठरवले पोलिसांनी भिकारी; भोगाव्या लागल्या नरकयातना

0
शाळकरी मुलीला पोलिसांनी भिकारी समजून उचलून नेले. त्यानंतर या दहा वर्षीय मुलीला प्रचंड नरकयातना सहन कराव्या लागल्या. पोलिसांनी या मुलीला उचलून चाईल्ड होममध्ये भरती केले. एका सामाजिक कार्यकर्तीने पाठपुरावा केल्यानंतर या मुलीची सुटका झाली आणि सत्य बाहेर आले ते अशा प्रकारचे होते. वाचा हे धक्कादायक वास्तव याच समाजसेविकेच्या शब्दांतून…

दिवस होता २० नोव्हेंबर २०१७. रात्री उशिरा माझा भाऊ सारीश डोळसचा फोन वाजला. त्याने सांगितले की, मी राहत असलेल्या परिसरात एका सफाई कामगार जोडपे राहते. त्यांच्या दोन्ही मुली एक हेमा(वय १४ वर्षे), दुसरी रोहिणी (वय १० वर्ष) रस्त्याने आपल्या आई-वडिलांकडे जात होत्या.

रस्त्यावर इतर भिक्षुक मुली याठिकाणी भिक मागत होत्या. पोलिसांनी या मुलींसोबत रोहिणीलादेखील उचलले तेव्हा हेमाने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तिलाही उचलून नेले.

रोहिणी, हेमा आणि त्यांचे सफाई कामगार आई-वडील

त्यानंतर पोलिसांनी हेमाला सोडून दिले. पण रोहिणीला सोडत नाहीयेत… असे सारीशने मला सांगितले. सफाई कामगारांच्या दोन्ही भीक मागत नाहीत. माझ्या मुली भिक मागत नाहीत असे हेमा आणि रोहिणीची आई सांगत होती. त्यानंतर माझी सामाजिक संस्था ‘स्नेहश्री फौंडेशन’ मध्ये ही तक्रार नोंदवून घेतली तेव्हापासूनच शोधाला सुरुवात केली.

रोहिणीला मानखुर्द चिल्ड्रन होमला ठेवण्यात आले होते. पण त्याआधी रोहिणीच्या आईने सांगितले ते खरे का खोटे हे माहित करणे गरजेचे होते. म्हणून रोहिणीला जिथून उचललं गेले तिथे आणि ती राहते तिथे एक दिवसभर चौकशी केली. सगळीकडून एकाच उत्तर मिळालं की या मुली कधीही भीक मागत नाहीत. मनाचे समाधान झालं मग मोर्चा पोलीस स्टेशनकडे वळवला.

स्नेहश्री फौंडेशनच्या स्नेहल कांबळे समवेत रोहिणी, हेमा आणि त्यांचे सफाई कामगार आई-वडील…

पोलीस स्टेशनला त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या हवालदार मॅडमकडे चौकशी केली. त्यांना मुलींना का पकडले याबाबत काही पुरावे वगैरे आहेत का? अशी विचारणा केली. तेव्हा मात्र मॅडम लालबुंद होऊन भडकल्या.  त्यांनी अरेरावीला सुरुवात केली.

रोहिणी आणि हेमाची आई

तुम्हा NGO वाल्यांना काही कामं नाहीत. मला खूप काम आहे म्हणत टाळाटाळ करू लागल्या. मला काही देणे घेणे नाही म्हणत त्यांनी जणू हकालालेच. मीही काही हलायला तयार नव्हती. तेव्हा मॅडमनी मला ACP कडे घेऊन जाण्याची धमकी दिली.

मी आनंदाने म्हटले, चला. शेवटी म्हणाल्या की, आम्हाला DCP साहेबांनी अशी मुले उचलून आणायला सांगितली आहेत. हे ऐकून तिथून निघालो… पण एक गोष्ट लक्षात आली की माणुसकी आणि पोलीस वर्दी यांचा खरोखरच दूर-दूर पर्यंत संबंध नाही ते.

रोहिणीच्या आईला एका दुसऱ्या NGO मधील हसीना नावाची मुलगी सारखी फोन करून भेटून त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत होती की, तुम्हाला सांभाळायला जमत नाहीये तर तुमच्या मुलीला आपण हॉस्टेलला घालू. पण रोहिणीच्या आई-वडिलांची तशी इच्छा नव्हती.

हसीना रोहिणीच्या शाळेत तिच्या हजेरी बद्दल चौकशी करायला आली. ती येणार आहे हे आम्हाला रोहिणीच्या आईने आधीच कळवलं होते. रोहिणीची आई, हसीना आणि आम्ही 4 लोक तिच्या शाळेत पोहोचलो. हसीनाला बिलकुल आवडलं नव्हतं ती आम्हाला जमेल तेवढं टाळत होती.

आमचं लक्ष नसताना ती गुपचूप स्कूल टीचरला हजेरी पट बघायला घेऊन गेली. परंतु आमच्या लक्षात येताच आम्ही मागोमाग गेलो तर टीचर हसीनाला सांगत होत्या की, रोहिणी कधीतरीच येते शाळेत… हसीना मनात खूप खुश झाली तिला हवा तसं टीचर बोलली होती.

चिल्ड्रन होममधून सुटका केल्यानंतर रोहिणी आणि स्नेहल कांबळे यांचा फोटो

मी टीचरला हजेरीपट दाखवायला सांगितलंय आणि त्यानुसार रिहिणीची हजेरी 90% हुन अधिक होती. टिचर खोटं सांगत होत्या का माहित नाही. अर्थात टिचर ला थोडं झापलंच.

हसीनाला भयंकर राग आल्यामुळे तिने आम्हाला बाहेर काढलं आणि तुम्ही कोण माझ्या कामात का दखल देत आहेत चालते व्हा…म्हणून हाकलू लागली. मी तिच्याकडे तिचे संस्थेचे ओळखपत्र आणि तिला हे काम करण्यासाठी मिळालेला परवाना मागितला. तर तिने तमाशा घातला…म्हणाली तुम्हाला कोणाकडे जायचंय तिथे जा मी काहीही दाखवणार नाही.

रोहिणी हेमाचे आई-वडील

मला कायदे माहित आहे तुम्हाला काही कळतं का! आणि इंग्लिश मध्ये बरळु लागली. शेवटी तिला इंग्लिशमध्येच कायद्याच्या भाषेत उत्तर द्यावं लागलं.

तिला संगीतलं की तू तुझं काम थांबवं.. जे काही करायचंय ते आम्ही करू… कारण आमचा तिच्यावर विश्वास नाहीये. तिने प्रचंड थयथयाट केला. तिथून ती निघून गेली. आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की, काहीही करून हसीनाला नकारात्मक प्रस्ताव बनवायचा आहे.

त्यानंतर हसीना रोहिणीच्या आईला सांगू लागली की, तू अशा लोकांना सांगितलं तर मी तुझी मुलगी परत देणार नाही. त्यानंतर रोहिणीचे वडील घाबरले… त्यांना धीर देऊन लवकरात लवकर आपण रोहिणीला सोडवू असे वचन दिले.

चिल्ड्रन होममधून मुलीला सोडविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी पाठपुरावा करावा लागला. रोहिणीला घेऊन जेव्हा तिची आई बाहेर आली, तेव्हा मी दुसऱ्या केस संदर्भात देवनार झोपडपट्टीत गेले होते.

तिथून परत आली तर तिथेच रोहिणीही आलेली दिसली. तेव्हा रोहिणीला तिच्या आईने सांगितले की, ह्या ताईमुलेच तू परत आली. तेव्हा दहा वर्षांची रोहिणी धावत माझ्याकडे आली. तेव्हा आईने डोळ्यातून अश्रूंना मार्ग करून दिला.

तिथून आम्ही टॅक्सीने रोहिणी आणि तिच्या आईला घरी सोडायला गेलो. रोहिणीला टॅक्सीच्या खिडकीत बसायचं होतं. प्रचंड खुश होती… ती आणि अर्थात मी सुद्धा… खूप खुश होते. एका आई आणि मुलीला भेटवून देण्याचा आनंद काय असतो याची प्रचीती आली.

रोहिणी आणि तिच्या बहिणीला आम्ही जुन्नर येथील वसतीगृहात पाठवत आहोत. तिथे त्यांचा मोठा सख्खा भाऊ आधीच शिक्षण घेत आहे. हेमा आणि रोहिणीचे शिक्षण आता अजून चांगल्या प्रकारे होईल.

स्नेहल कांबळे
स्नेहश्री फौंडेशन, मुंबई

LEAVE A REPLY

*