‘स्मार्ट सिटी’च्या पहिल्या टप्प्यात नेवासाकरांना गढूळ पाणी

0

उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांची गंभीर टीका

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – लोकप्रतिनिधींशी असलेल्या नातेसंबंधाचा पाणीपुरवठा ठेकेदाराने घेतलेला गैरफायदा तसेच त्याच्या कृष्णकृत्यांवर घालण्यात येणारे पांघरूण यामुळेच नेवासकरांवर त्यांच्या ‘स्मार्ट सिटी’च्या पहिल्या टप्प्यात गढूळ पाणी पिण्याची दुर्दैवी वेळ ओढवल्याचा आरोप उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील व पाणीपुरवठा सभापती फारूक आतार यांनी केला आहे.
शहराच्या नळ पाणीपुरवठा योजनेतून गढूळ आणि दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ नेवासकरांनी नुकतेच नगर पंचायत कार्यालयास टाळे ठोकले होते. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, सदरची योजना खूप जुनी तसेच वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात अपूरी पडत असल्याने असताना 2013-14 मध्ये विशेष प्रयत्न करुन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 2 कोटी 48 लाखांचा विशेष दुरुस्ती निधी मंजूर करुन घेतला. मात्र त्याच दरम्यान बाळासाहेब मुरकुटेंच्या आमदारकीचा कार्यकाल सुरु झाल्यानंतर त्यांच्याशी जवळचे नातेसंबंध असलेल्या या योजनेच्या ठेकेदाराने संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुन गोलमाल अंदाजपत्रक तयार करुन घाईघाईने या योजनेचे कामही पूर्ण केल्याचा दावा त्यांनी याद्वारे केला आहे.
योजनेच्या विद्युत पंपासाठी पँथर अँड प्लॉट कंपनीचे जे कोटेशन सादर करण्यात आले होते त्यात विद्युत पंपाची किंमत 19 लाख 38 हजार इतकी दाखवल्याचा आरोप करुन प्रत्यक्षात खुल्या बाजारात याच विद्युत पंपाची किंमत केवळ 8 लाख 37 हजार इतकी असल्याचा दावा केला.
याबाबत जिल्हा परिषदेने विचारणा केली असता सदर कोटेशन आपण दिलेलेच नसल्याचा धक्कादायक खुलासा सदर कंपनीने केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. तरीही सदर ठेकेदाराने संबंधित विभागाच्या अधिक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंत्यांशी तडजोडी करुन याच चुकीच्या अंदाजपत्रकाला मंजूरी मिळवत घाईघाईने या योजनेचे काम पूर्ण केल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. या अंदाजपत्रकात या योजनेच्या फिल्ट्रेशन प्लँटच्या नूतनीकरणाच्या कामाचा समावेश असल्याकडे लक्ष वेधून त्याअंतर्गत वाळू बदलण्यासह इतर बाबींसाठी 20 लाख रुपयांचा खर्च बिलात दाखविण्यात येऊनही प्रत्यक्षात ही विशिष्ट प्रकारची वाळू बदललीच गेली नसल्याने नेवासकरांना गढूळ पाणी पिण्याची वेळ ओढवल्याचा आरोप केला.
लाखो रुपये घातलेली मोटार बंद आहे या योजनेची सखोल चौकशी करुन भरीव निधी मिळूनही नेवासकरांवर गढूळ, दूषित पाणीपुरवठा होण्याची वेळ आणणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

*