छोट्या शहरातील विमानसेवेमुळे देशाच्या विकासाला चालना : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

0

आर्थिक प्रगतीमुळे रोजगार संधी निर्माण होतील

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीसह महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सत्कार केला.
शिर्डी(प्रतिनिधी) – छोटी शहरे मोठ्या शहरांशी विमानसेवेने जोडल्यामुळे नागरिकांना प्रवासाच्या सुविधा उपलब्ध होणार असून, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.
साईबाबा समाधी शताब्दी व शिर्डी आंतराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रपतींच्या पत्नी श्रीमती सविता कोविंद, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अशोक पी. गजपती राजू,
पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार दिलीप गांधी, सदाशिव लोखंडे, आमदार स्नेहलता कोल्हे, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती म्हणाले, भौतिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या दोन प्रदेश जोडले गेल्याने विकासाला चालना मिळते. भारतीय संस्कृतीत धर्मासोबत अर्थालादेखील महत्त्व आहे.
आर्थिक विकासामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्या दृष्टीने लहान शहरातील विमानसेवा महत्त्वाची आहे. शिर्डी येथील आंतराष्ट्रीय विमानतळामुळे जगातील साई बाबांच्या भक्तांना कमी वेळात शिर्डीत येण्याची सोय निर्माण झाली आहे. यामुळे जगाचा कानाकोपर्‍यांतून भाविक शिर्डी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मी अनेक वर्षांपासून भाविक या नात्याने शिर्डीस येतो. परंतु आज श्री साईबाबांच्या समाधी शताब्दी उद्घाटनासाठी या भूमीत आल्याने मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. साईबाबांच्या वास्तव्यामुळे ही भूमी पावन झाली आहे. शिर्डीची भूमी ही महाराष्ट्राच्या धार्मिक वैभवात भर घालणारी आहे.
जगातील अनेक देशात साईबाबांचे भाविक आहेत. शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेने मंदिर परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेला आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
शिर्डी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यावर 800 कोटींचा खर्च करण्यात आला असून एकूण आराखडा 3200 कोटींचा आहे. लवकरच दुसर्‍या टप्प्यातील विकासकामांना सुरवात करण्यात येईल. साईबाबांवर श्रद्धा असणारे भाविक जगभरात असल्याने शिर्डी जगाच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
येथे येणारे भाविक जात, धर्म, पंथ असा भेदभाव करीत नाहीत. महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकात्मतेचा हा संदेश दिला जावा. साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीची शिकवणूक दिली आहे. या विचारांमुळे जीवनात दुःख होत नाही. महोत्सवाच्या निमित्ताने हा विचार जगभरात पोहोचविण्यात यावा अशी अपेक्षा करत मंदिर हे सामाजिक सुधारणेचे केंद्र आहे.
या माध्यमातून सामान्य व्यक्तींच्या जीवनातील दुःख आणि समस्या दूर करण्याचे प्रयत्न होणे गरजचे आहे. साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून गरिबांची सेवा करण्याचे कार्य विश्वस्त व्यवस्थेने करावे असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्रीय विमानवाहतूक मंत्री राजू म्हणाले की, देशात विमान वाहतूक क्षेत्र वेगाने विस्तारते आहे. त्यात शिर्डी विमानतळाच्या माध्यमातून आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विमानसेवेचा आणखी विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना सहकार्य करेल.
साईबाबांचे विचार प्रत्येक क्षेत्रासाठी उपयुक्त असून महोत्सवाच्या माध्यमातून ते भाविकांपर्यंत पोहोचवावेत. डॉ. सुरेश हावरे यांनी प्रास्ताविकात शताब्दी महोत्सवाविषयी माहिती दिली. महोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधन आणि श्री साई पादुका दर्शन अशा पंचसूत्रीच्या आधारे कार्यक्रमांचे आयोजन होईल असे ते म्हणाले.

विमानतळामुळे विकासाला चालना : मुख्यमंत्री  –   मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस म्हणाले शिर्डी विमानतळ राज्य शासनाने विकसित केलेले आणि चालविण्यास घेतलेले देशातील पहिले विमानतळ आहे. या विमानतळाचा  विस्तार करण्यात येऊन धावपट्टीची रुंदी 2500 मीटरवरून 3200 मीटरपर्यंत वाढवून नवी टर्मिनल इमारत उभारण्यात येईल. जगातील मोठे विमान उतरू शकेल अशा पद्धतीने दुसर्‍या टप्प्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. डिसेंबरपर्यंत नाईटलँडिंगची सुविधा करण्यात येईल. विमानतळ केवळ वाहतुकीसाठी महत्त्वाचे नसून विमानसेवेच्या माध्यमातून परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळते. विस्तारीकरणानंतर शिर्डी विमानतळाच्या माध्यमातून 25 ते 50 हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आदरातिथ्य व्यवसायालादेखील चालना मिळेल. दहा कंपन्यांनी येथून हवाई सेवा सुरू करण्यात रस दाखविला असल्याचेही त्यांनी सांगितले.

नव्या वादाची शक्यता –
साईबाबांचे जन्मगाव परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील आहे, अशी काही भक्तांची श्रध्दा आहे. त्या गावाचाही विकास होणे आवश्यक आहे, असेे वक्तव्य राष्ट्रपती कोविंद यांनी केले आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आजवर साईबाबांचे जन्म नाव, गाव व जात याचा कुठेही उल्लेख आढळत नाही. साई चरित्रातही तसा संदर्भ नाही. बाबा हयात असताना त्यांनी कधीही नाव, गाव व जात सांगितले नाही. सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणूनच शिर्डीची जगभर ओळख आहे. या ओळखीला तडा देण्याचे काम सुरू असल्याची चर्चा आहे. त्यात राष्ट्रपतींच्या या संदर्भाने भर पडली आहे. महामाहिम राष्ट्रपतींना चुकीची माहिती कोणी आणि का पुरवली, यावरून शिर्डीत चर्चा सुरू झाली होती. साईभक्तांमध्ये यावरून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.

विमानसेवेमुळे शिर्डी देशातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार : ना. विखे  – विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शिर्डी येथील विमानतळ लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या विमानतळाचे काम कमी वेळेत पूर्ण झाले. विमानतळामुळे शिर्डी हे शहर देशातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी, सहकारी उद्योगांना याचा मोठा लाभ होणार आसल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, विमानतळाच्या माध्यमातून शिर्डी जगभराशी जोडले गेले आहे. विमानतळाच्या माध्यमातून संकल्पाचे सिद्धीत रुपांतर होत आहे.

LEAVE A REPLY

*