Blog : आकाशझेप!

0
शेतकर्‍यांनी घामाने पिकवलेल्या मालाला न मिळणारा भाव. आरोग्य आणि शिक्षणापासून वंचित असलेली लाखो बालके. भारताच्या ग्रामीण भागातील कमालीचे दारिद्य्र. रोजगाराच्या घटणार्‍या संधी. अशा चहूबाजूंनी निराशेचा सूर असताना भारताने अवकाशाला घातलेली गवसणी एकप्रकारे आनंदाची फुंकर ठरावी.

गंमतीने ‘फॅट बॉय’ म्हणून उल्लेख झालेल्या जीएसएलव्ही मॅक-3 या अवाढव्य अग्निबाणाचे भारताने यशस्वी प्रक्षेपण केले. नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवले, त्याचवर्षी म्हणजे 1969 मध्ये भारताच्या अंतराळ मोहिमेचा प्रारंभ झाला. इस्त्रो अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना तेव्हाचीच! गेल्या 50 वर्षात भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्राने अनेक चढउतार पाहिजे. अनेक अपयश पचवले आणि यशही साजरे केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोंडीपासून निधीच्या कमतरतेवर मात करत अवकाशभेदी तंत्रज्ञान विकासातील भारताची वाटचाल अभिमानास्पद आहे. महिन्याभरापूर्वीच एकाचवेळी 104 उपग्रह अवकाशात सोडण्याची किमया भारतीय शास्त्रज्ञांनी केली होती. आताचे यश त्यापुढचे!

श्रीहरिकोटा केंद्रावरून सोमवारी झेपावलेल्या जीएसएलव्ही मॅक-3 या अग्निबाणाची उंची 140 फूट आणि वजन 640 टन. भारताकडून सोडण्यात आलेला आजवरचा हा सर्वाधिक वजनाचा अग्निबाण. या उपग्रहाच्या निर्मितीसाठी वैज्ञानिकांचे 15 वर्षे खर्ची पडले, यावरून या यशाचे महत्त्व अधोरेखित व्हावे. स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनचा यात वापर झाला, याचीही नोंद घेतली पाहिजे.

भारताने अलिकडे अवकाश संशोधन क्षेत्रातील आपले वेगळेपण वारंवार सिद्ध केले आहे. कधीकाळी अमेरिकन आणि रशियन तंत्रज्ञानासाठी याचक असलेला भारत आता स्वावलंबी झाला आहे. भारताची कोंडी करण्यासाठी रशियावर दबाव टाकणार्‍या अमेरिकेलाही आता भारताची मदत हवी, यावरून भारतीय शास्त्रज्ञांनी केलेली प्रगती नजरेत भरावी! भारताची ही आस्तेकदम वाटचाल आंतराष्ट्रीय स्तरावर सन्मान वाढविणारी आहे.

तरिही अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. अवकाश संशोधन क्षेत्रात आजही अमेरिका, रशिया आणि फ्रांस यांचे वर्चस्व आहे. या व्यवसायातील तब्बल 75 टक्के हिस्सा याच देशांकडे आहे. तर भारताचा हिस्सा केवळ अर्धा टक्क्यांच्या आसपास! त्याचवेळी शेजारील चीनने मात्र तीन टक्क्यांपर्यंत प्रगती केली आहे. अंतराळ उद्योगात प्रगतीची उत्तम संधी भारताकडे आहे. त्यामुळेच आजवर सरकार याबाबत गंभीर आहे. जगाच्या तुलनेत भारतीय अंतराळ उद्योग कमी खर्चात चालता, ही फायदेशीर बाब आहे.

सर्वात कर्मी खर्चात केवळ भारतच उपग्रह प्रक्षेपण करू शकतो, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे जग भारतीय तंत्रज्ञानाकडे आकर्षित न झाले तर नवल! कदाचित यामुळे दरवर्षी अंतराळ संशोधनावर सरकारकडून केली जाणारी वाढीव तरतूद योग्यच म्हटली पाहिजे. भारतासाठी अंतराळ उद्योगाची कवाडे या यशामुळे विस्तारत आहे. जगातील विकसनशील देश आपल्या उपग्रह प्रक्षेपणासाठी भारतीय तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतील, तो दिवसही आता फार दूर नाही. भारतातील दूरसंचार तंत्रज्ञानही यामुळे अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

*