Type to search

जून महिना कोरडा जाणार

Featured maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

जून महिना कोरडा जाणार

Share

स्कायमेटच्या सुधारीत अंदाजामुळे चिंतेचे ढग । मान्सून केरळात 4 जूनला धडकणार

मुंबई- नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल. मात्र, त्यापुढे मान्सूच्या देशभरातील वाटचालीत अडथळे येतील. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात मान्सून उशीराने दाखल होईल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.

यापूर्वी स्कायमेटने राज्यात सरासरीइतका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, आता स्कायमेटच्या नव्या अंदाजानुसार मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमन लांबणार आहे. तसेच दुष्काळग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्यात पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असेल, असेही स्कायमेटने म्हटले आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाडा आणि विदर्भवासियांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.

तसेच यंदा देशभरात मान्सूनची वाटचाल संथ राहील. काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल. पूर्व, ईशान्य आणि मध्य भारताच्या काही भागात देशातील इतर भागांच्या तुलनेत पर्जन्यमान अत्यंत कमी असण्याची शक्यता स्कायमेटच्या अहवालात नमूद करण्यात आलेय. भारतातील जवळपास 70 टक्के शेती मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे स्कायमेटच्या नव्या अंदाजाने शेतकर्‍यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

मध्य महाराष्ट्राला दिलासा
महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा हे भाग आताच दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहेत. त्यामध्ये आता सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यास येथील दुष्काळाची तीव्रता आणखीच वाढण्याची शक्यता आहे. मात्र मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण चांगले असेल या स्कायमेटच्या अंदाजाने दिलासा मिळाला आहे.

कधी येऊ शकतो मान्सून
मुंबईतही मान्सून नेहमीपेक्षा उशीरानेच दाखल होण्याची चिन्हे आहेत. एरवी 8 ते 10 जूनच्या दरम्यान मान्सून मुंबईत दाखल होतो. मात्र, यंदा मान्सूनचे आगमन 15 ते 18 जून, कदाचित 20 जूनपर्यंतही लांबण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी 9 जूनला मान्सून मुंबईत दाखल झाला होता, असे स्कायमेटच्या पत्रकात म्हटले आहे. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहांवर मान्सूनचे आगमन 22 मे रोजी होईल.

पाणी काटकसरीने वापरावे
महाराष्ट्रात पावसाचे आगमन लांबणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. तो खरा ठरल्यास नगर जिल्ह्यातही भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे. मुळा, भंडारदरा आणि निळवंडे या धरणांतील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचा सर्वांनाच काटकसरीने वापर करावा लागणार आहे. अन्यथा त्याची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

भारतीय हवामान विभागाचा अंदाज दोन दिवसांत

भारतीय हवामान विभागही मान्सून केरळात कधी दाखल होईल याबाबतचा अंदाज येत्या दोन दिवसांत जाहीर करणार आहे. यंदा देशभरात समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. गेल्या वर्षीही हवामान विभागाने 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता, परंतु प्रत्यक्षात 91 टक्के पाऊस झाला होता. जून ते सप्टेंबर या काळात 90 ते 95 टक्के मान्सूनचा पाऊस म्हणजे सरासरीपेक्षा कमी तर 96 ते 104 टक्के पाऊस म्हणजे सरासरी पाऊस मानला जातो. यंदा देशाच्या काही भागांत मे ते जूनदरम्यान तापमान 0.5 डिग्रीने वाढेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!